हे माझे राष्ट्रपती नाहीत ... पेरूत तरुणांचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 07:57 AM2020-11-19T07:57:53+5:302020-11-19T08:00:11+5:30
पेरूत तरुणांचा एल्गार, काळजीवाहू अध्यक्ष पायउतार.
- कलीम अजीम
दक्षिण अमेरिकेतील पेरू हा देश सध्या राजकीय अस्थिरतेचा सामना करत आहे. देशात लोकशाही राज्यव्यवस्था हवी म्हणून तरुणांनी कंबर कसली आहे. या संघर्षात दोन युवकांचा मृत्यू झाल्यानं आंदोलन तीव्र झालं. सहा दिवस चाललेल्या या लढ्याला सोमवारी यश आलं. अखेर काळजीवाहू अध्यक्ष मैनुअल मेरिनो यांना राजीनामा द्यावा लागला.
पेरूची राजधानी लीमा शहरात हजारो युवकांनी रस्त्यावर येऊन ‘हे माझे राष्ट्रपती नाहीत’, ‘मेरिनो माझे राष्ट्राध्यक्ष नाहीत’, अशा घोषणा दिल्या. राजधानीसह पेरूच्या अन्य प्रमुख शहरांत सरकारविरोधी आंदोलनाचे लोण पसरलं. देशभरातील नागरिक माजी राष्ट्रपती मार्टिन व्हिजकारा (५७) यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर आले.
९ नोव्हेंबरला देशात वर्तमान राष्ट्रपती ‘मार्टिन व्हिजकारा’ यांच्याविरोधात महाभियोग चालवण्यात आला. अनियंत्रित भ्रष्टाचार, कोरोनाकाळात पुरेशा आरोग्य सुविधा पुरवण्यास सरकार असमर्थ ठरले, असे विविध आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले.
सत्तारूढ राष्ट्रपतींना पदावरून हटविण्यासाठी १०५ मेंबर ऑफ काँग्रेसने म्हणजे खासदारांनी मतदान केलं. अविश्वास प्रस्ताव जिंकताच संसदेनं वर्तमान राष्ट्रपती व्हिजकारा यांचे सर्व अधिकार काढून घेतले. विरोधी पक्षातील ज्येष्ठ नेते या नात्याने मैनुअल मेरिनो यांची अंतरिम राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली.
मात्र या निवडीचा विरोध करत नव्या अध्यक्षांविरोधात हजारो युवकांचं जनांदोलन उभं राहिलं. सोमवारी रात्रीतून देशभरात सरकारविरोधी मोर्चे, आंदोलनं, निदर्शनं सुरू झाली.आंदोलकांनी नव्या अध्यक्षांवर तख्तपालटाचा आरोप केला. काहींनी मेरिनोची तुलना घुसखोर म्हणत कोरोना व्हायरसशी केली.मंगळवार ते रविवार असे सहा दिवस हे आंदोलन सुरू होतं. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी बळाचा वापर केला.पोलीस रबरच्या गोळ्या आणि टीअर्सचा वापर करत होते.
ह्युमन राइट वॉच या मानवी हक्क संघटनेच्या मते, विरोध प्रदर्शनात पोलिसी बळामुळे १०० पेक्षा अधिक आंदोलक जखमी झाले असून, ४१ जण बेपत्ता झाले. तर दोन जणांचा मृत्यू झाला.
शनिवारी झालेल्या दोघांच्या मृत्यूनंतर सरकारवर राजीनाम्याचा दवाब वाढला. रविवारी नवनियुक्त राष्ट्रपती मैनुअल मेरिनो यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला.देशात येत्या एप्रिलला सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत..पुढे काय होईल, यासंदर्भात अनिश्चितता असली तरी तूर्त पेरुवियन नागरिकांच्या लढ्याला यश आलं असं म्हणता येईल.
(कलीम मुक्त पत्रकार आहे.)
kalimazim2@gmail.com