NOT Your डायरी

By admin | Published: February 15, 2017 05:47 PM2017-02-15T17:47:33+5:302017-02-15T18:05:56+5:30

आपल्या भावना, चिडचिड, आपला उद्वेग नियंत्रित करता येत नाही. म्हणून मग भडभडून बोलावं तसं अनेकजण आपल्या व्यक्तिगत जगण्याचा पसारा फेसबुकवर मांडून बसतात. साऱ्या दुनियेला सांगतात आपबिती.

NOT Your Diary | NOT Your डायरी

NOT Your डायरी

Next

 - आॅक्सिजन टीम

आपल्या भावना, चिडचिड, 
आपला उद्वेग
नियंत्रित करता येत नाही. 
म्हणून मग भडभडून बोलावं 
तसं अनेकजण आपल्या 
व्यक्तिगत जगण्याचा पसारा
फेसबुकवर मांडून बसतात.
साऱ्या दुनियेला सांगतात
आपबिती.
परिणाम,
कधी लोक उपदेश देतात,
कधी सहानुभूती व्यक्त करतात,
तर कधी टिंगल करतात.
आणि कधी तर त्या साऱ्यावरून
ब्लॅकमेलही करतात..

हे फेसबुक आहे, तुमची पर्सनल डायरी नव्हे..
- असं वयात येणाऱ्या मुलांना आता शाळाशाळांत जाऊन सांगायची वेळ आली आहे अशी चर्चा गेले काही दिवस समाजमाध्यमतज्ज्ञ आणि समाजवर्तनतज्ज्ञांत जोर धरते आहे..
त्या चर्चेला पुन्हा तोंड फोडलं ते अलीकडच्या एका घटनेनं..
एक किशोरवयीन मुलगी, अडनिड्या वयातली. तिनं फेसबुकवर लिहिलं की, मला मरावंसं वाटतंय!
त्यावर तिच्या मित्रयादीतल्या लोकांनी काय लिहिलं तर, मर पटकन. गो, किल युवरसेल्फ. तसाही जगून काय उपयोग? मेलीस तर कुणी अत्यंदर्शनालाही येणार नाही..
मानसिकदृष्ट्या एकाकी असलेली ही मुलगी. आपण कुणालाच आवडत नाही. आपण मेलो तरी लोकांना फरक पडणार नाही या विचारानं अशा वाटेवर पुढं निघून गेली की तिनं आत्महत्त्याच केली..
ही अशी एक घटना. 
पण जे आत्महत्त्या करत नाहीत, मात्र सोशल मीडियात सतत होणाऱ्या हेटाळणीनं त्रस्त असतात त्यांचं काय? जे आपल्या मनात जे जे येतं ते, आपल्यासंदर्भात जे जे घडतं ते ते सारं सोशल मीडियात शेअर करतात. ते कशामुळे?
डायरी लिहिल्यासारखं स्वत:विषयी (आणि संपर्कातल्या इतरांविषयीही) टाइमलाइनवर लिहून काढतात. आणि मग त्या शेअर करण्याची सवय लागते. मात्र हे ओव्हरशेअरिंग करून आपण जगाला स्वत:विषयी काय काय सांगतो आहे याचं मात्र भान राहत नाही. 
द वॉल स्ट्रीट जर्नल या वृत्तपत्रात अलीकडेच या विषयांवर एक मालिका प्रसिद्ध झाली. एलिझाबेथ बर्नस्टेन या पत्रकाराने लिहिलेली ही अभ्यासमाला. त्यांनी सोशल मीडियात रोज शेअर होणाऱ्या स्टेटसचा अभ्यास तर केलाच; पण इतरांनी लिहिलेली माहिती रोजच्या रोज वाचणाऱ्यांचाही अभ्यास केला. त्यांचं म्हणणं आहे की, आपल्या मनावर या गोष्टीचा दोन प्रकारे परिणाम होतो. ओव्हरशेअरिंग या नव्याच आजारानं आपल्याला गाठलेलं आहे. 
ओव्हरशेअरिंग करणाऱ्यांचा पहिला प्रकार म्हणजे काहीजण वाट्टेल ते लिहित सुटतात. त्यातले अनेकजण डिप्रेस्ट. आपल्या दु:खाच्या, अपमानाच्या, वेदनांच्या कहाण्या सांगतात. आणि लिहून, पोस्ट करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात. खरंतर अशा माणसांना आपल्या भावना, चिडचिड, आपला उद्वेग नियंत्रित करता येत नाही. म्हणून ते भडभडून बोलावं तसं भडभडूनच लिहितात.
आणि दुसरा प्रकार वाचणारे. असे अनेकजण जे उगाच हे सारं वाचत राहतात. ती निगेटिव्हिटी स्वत:च्या मनात भरून घेतात. त्यावर विचार करत दु:खीही होतात.
हे असं बहुसंख्यांच्या बाबतीत घडतं. पण त्यामुळे इतरांच्या दु:खालाही गांभीर्यानं न घेण्याची आणि ‘टेक केअर’ म्हणून विषय अत्यंत कॅज्युअली घेण्याची वृत्ती वाढते आहे.
त्यातून मग अनेकदा अपमान, भावनांची खिल्ली उडवली जाणे, फुकट उपदेश असेही प्रसंग घडतात.
परिणाम?
एकाकीपणा वाढतो. मन जास्त उदास होतं. आणि आपण आपल्या आयुष्याची डायरीच चव्हाट्यावर उघडून ठेवतो..
ती उघडायची की नाही, हा निर्णय सुदैवानं अजून तरी आपल्या हातात आहे..

 

Web Title: NOT Your Diary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.