अब नहीं, तो कब?
By admin | Published: September 8, 2016 12:54 PM2016-09-08T12:54:43+5:302016-09-08T13:30:54+5:30
बलात्कारांच्या घटनांमुळे समाजमन काही काळ सुन्न होते. मग पुढे? काहीही घडत नाही.
- भक्ती सोमण
बलात्कारांच्या घटनांमुळे
समाजमन काही काळ सुन्न होते.
मग पुढे?
काहीही घडत नाही.
मुलींना सक्षम आणि
मुलांना सजग-संवेदनशील बनवण्यासाठी
काही प्रयत्नही होत नाहीत.
पण मुंबईतली कोरो संस्था
एक प्रकल्प राबवते आहे.
ज्यानं मुली खंबीर आणि
मुलं जबाबदार बनताहेत..
मीना रायगडे. शाळेत जाता येताना टवाळखोर मुले चिडवायची, छेड काढायची. तिने घाबरून हे आईला सांगितलं. आईने घाबरू नकोस, रडू नकोस असा सल्ला दिला. आणि त्या मुलांना सरळ न घाबरता बोल असंही सांगितलं. दोन दिवसांनी तिला मुलांनी पुन्हा चिडवलं. तेव्हा तिने आवाज चढवला. परिणाम म्हणजे ती मुले चिडवायची बंद झाली. कुणी तिला चिडवलंच तर ही उत्तर देते तिला चिडवू नका असा सल्ला त्या पोरांकडून इतरांना मिळायला लागला.
असंच मीनाच्या मैत्रिणीबाबत रीना ठाकूरसोबतही झालं. रीना दिसायला चांगली आहे म्हणून तू छान दिसते असे म्हणत अश्लील गाणे गात तिची छेड काढली. त्यावेळी कॉलेजमध्ये येऊन ती रडायला लागली. तिने हे मीनाला सांगितले. मीनाच्या सल्ल्यानुसार रीनाने आवाज उठवायचा असं ठरवलं. मीना आणि रीना कॉलेजमध्ये जाताना पुन्हा त्या मुलांनी रीनाकडे पाहून गाणी म्हणायला सुरुवात केली. तेव्हा त्या मुलांकडे जाऊन रीनाने सरळ एकाच्या कानशिलात लगावली. तो मुलगा सर्दच झाला. यामुळे आपला कॉन्फिडन्स वाढल्याचं रीनाला लक्षात आलं. त्यानंतर घरी येऊन रीनाने जे घडलं ते आईला सांगितलं. या सगळ्याचा परिणाम असा झाला की उत्तर देतात आणि पाणउतारा करतात म्हणून एरियातली मुले आता मीना-रीनाला चिडवतं नाहीत. मीना-रीनाने उत्तरे दिली.
पण बाकीच्या मुलींचं काय? मुलींमध्ये अशा आव्हानांना प्रत्युतर देण्यासाठी आवाज निर्माण करणंही खूप गरजेचं आहे. आणि तेच काम कोरो संस्था 'लर्निंग कम्युनिटी कार्यक्रम' अंतर्गत करते आहे. हे काम कोरो, अक्षरा, वाचा, स्त्रीमुक्ती संघटना, दोस्ती, आंगन अशा संस्था मिळून करत आहेत. मुंबईत गेली तीन वर्षे या उपक्रमाअंतर्गत मुलींच्या सक्षमीकरणावर काम होते आहे. त्याच्या मुख्य कार्यकर्त्या म्हणून सुषमा काळे आणि रोहिणी कदम या मार्गदर्शक म्हणून काम पहात आहेत. माझा भाऊ जयेश या संस्थेशी गेली कित्येक वर्षे संलग्न असल्याने त्याच्याकडूनही मुलींना येणाऱ्या समस्यांविषयी सातत्याने चर्चा व्हायची.
पण संस्थेत गेल्यावर या कार्यकर्त्यांशी आणि अनुभव आलेल्या मुलींशी बोलल्यावर तर एका बाजूला आपण त्यामानाने किती सेफ आयुष्य जगतोय, याचा प्रत्यय तर येतोच येतो. शिवाय या मुलींच्या समस्या किती वेगळ्या आहेत, त्याचीही जाणीव होते; मात्र समस्या असल्या तरी त्या सोडविण्याचे चांगले मार्ग आणि उपाय कोरो संस्थेतल्या कार्यकर्त्या मुलींबरोबर अवलंबवत आहेत.
मुलींची प्रमुख समस्या म्हणजे त्यांच्यावर होणारी छेडछाड. याची सुरुवात प्रामुख्याने मुलांनी मुलींना वाईट नजरेने बघणे, त्यानंतर अश्लील कमेंटने होते. पुढे पुढे हे सर्व सोकावत जाऊन लैंगिक अत्याचार असे प्रकार घडतात. म्हणून सुरुवातीलाच ब्रेक लागणे गरजेचे आहे.
जर एखाद्या मुलाने छेडले आणि मुलीने त्याला प्रत्युत्तर दिले तर घरच्यांना ते पसंत पडत नाहीत. तिच्यावर अनेक बंधने येतात. त्यामुळे आम्हा पालकांना विश्वासात घेऊन यांचा मुलगा चुकलाय याची जाणीव करून द्यावी लागते, असे रोहिणी कदमने सांगितले.
तशी केस मध्यंतरी घडली. संस्थेत येणाऱ्या काव्या (नाव बदलले आहे.) नावाच्या मुलीची काही जणांनी छेड काढली. तेव्हा तिने सरळ त्यांना शिव्या दिल्या. म्हणून तिचे आई-वडील तिला खूप ओरडले. अगदी तिच्या जिन्स घालण्यावर, घराबाहेर पडण्यावर निर्बंध आले. हे जेव्हा संस्थेत कळले तेव्हा कार्यकर्ते घरच्यांशी बोलले, पण फार परिणाम झाला नाही. मग त्यांनी कोरो संस्थेत एका पथनाट्यात तिला सहभागी करून घेतले. त्या पथनाट्यात काव्याला जिन्स घालायची होती पण तेही ती दुसऱ्यांच्या घरी जाऊन घालत असे. पथनाट्य बघायला घरचेही आले होते. त्या पथनाट्यात आपली काहीही चूूक नसताना केवळ त्या मुलांमुळे आपल्याला काय भोगावे लागत आहे हे काव्याने दाखवूून दिले. त्याचा परिणाम घरच्यांवर होऊन आपल्या मुलीची यात काहीच चूक नाही याची जाणीव त्यांना झाली. आज काव्या ताठ मानेने घरच्यांच्या सहकार्याने चांगले शिक्षण तर घेतेच आहे शिवाय आवडीचे कपडे घालायलाही तिला घरच्यांनी परवानगी दिली आहे. म्हणजेच पथनाट्याचा मोठा प्रभाव वस्तुस्थिती समजण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे होऊ शकतो. म्हणून संस्थेतर्फे ठिकठिकाणी पथनाट्यांचे आयोजन केले जाते.
फक्त छेडछाडच नाही तर समसमान अधिकार मिळायला हवेत यासाठीही 'लर्निंग कम्युनिटी कार्यक्रमाअंतर्गत प्रयत्न केले जातात. कित्येक मुलींना दहावीनंतर शिक्षण घेण्यासाठी अत्यंत झगडावे लागते. झोपडपट्ट्यांमध्ये तर हे प्रमाण जास्त आहे. अशा भागात मुलींना घराबाहेर पडण्याला बंदी असतेच शिवाय बोलण्याचं स्वातंत्र्यही नसतं. एखादी मुलगी मुलाशी बोलली तर त्याचं काहीतरी आहेच अशी अफवा समाज पसरवतो. त्यामुळे पुढे जाऊन शिक्षणावरही बंधनं येतात. हे सगळं टाळून तुमची मुलगी चांगलीच आहे, हे पालकांना पटवून देऊन त्या मुलींना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम कोरोतल्या कार्यकर्त्या करत असतात. समस्या कितीही आल्या तरी त्यातून मार्ग काढण्याचं तंत्र कोरोतला प्रत्येक कार्यकर्ता हा समाजाला देत असतो.
मुलींना घडवायचे काम करताना संविधानाच्या मूल्यांवर होणारा विकास आम्हाला महत्त्वाचा वाटतो, असे रोहिणी सांगते. याशिवाय पालकांबरोबर मुलांचा संवाद कसा वाढेल, यासाठीही आम्ही प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
मुली आणि मुलांचे प्रश्न खूप असले तरी आज गरज आहे ती त्याविरोधात ठामपणे आवाज उठवण्याची. त्यासाठी मात्र कोणाचं मार्गदर्शन मिळालं तर तेही महत्त्वाचं ठरू शकेल. आणि म्हणूनच मुलींना त्यांचा आवाज देण्यासाठी कोरो संस्था करत असलेले काम मोलाचं आहे.
(लेखिका लोकमत मुंबईमध्ये उपसंपादिका आहेत.)
महिलांसाठी शौचालयाचे प्रश्न
मुंबईत जिथे जिथे वस्त्या आहेत तिथे टॉयलेट्स घराबाहेर आहेत. दुपारी आणि रात्रीच्या वेळी मुलींना तेथे पाठविण्यास पालकांना भीती वाटते. कारण काही अत्याचार हे याच वेळी होतात. कोरो संस्थेच्या जवळच्या वस्तीत एकदा असा प्रसंग घडला होता. मुलगी टॉयलेटला गेल्यावर पाठीमागून मुलाने येऊन दरवाजा बंद करून त्या मुलीचा जोरात गळा दाबला. त्याचा आवाज बाहेर इतरांना ऐकू जाईल इतका मोठा होता. कोरोच्या आॅफिसातही तो ऐकूू आला. लोकं आणि संस्थेतील कार्यकर्ते क्षणात तिथे धावल्याने तिच्यावरील अतिप्रसंग टळला; मात्र त्या मुलीच्या गयाला चांगलीच दुखापत झाली. यासाठी इथे दुपारी आणि रात्री पोलिसांची गस्त वाढवली गेली. संस्थेकडून मुंबईतल्या वस्त्यांमध्ये अशी गस्त असावी यासाठी नगरसेवक, पोलीस यांची मदत घेतली जात आहे.
----------------------------
नववीतला मनीष आई-बहिणीसाठी लढतो तेव्हा..
चेंबूरच्या वस्तीतल्या कोरोच्या कार्यालयात मुलींची बैठक नेहमीच भरते. त्यावेळी त्यांच्या हक्कांविषयी, समस्यांविषयी चर्चा होते. अशीच चर्चा चालू असताना दाराआडूून नेहमी या वस्तीतला मनीष ही चर्चा ऐकायचा. त्याला मोठ्या ताई जे सांगत आहेत ते पटायचे. एकदा त्याने आपणहून येत मला मम्मीच्या अत्याचाराविषयी भाषण करायचं आहे असं सांगितलं. कारण त्याच्या घरात वडील सतत दारू प्यायचे. तर आई घरकाम करून घराला हातभार लावायची आणि वडिलांचा मार खायची. तसेच मुलींना घराबाहेर पडायचं नाही असा त्याच्या वडिलांचा दंडक होता. आणि हे चुकीचं आहे हे त्या वयात त्याला कळत होतं. त्या वयात मुलींना स्वत:चा आवाज आणि अस्तित्व असतं याची त्याची जाणीव खूपच होती. कोरोतल्या कार्यकर्त्यांशी मनीष या विषयावर बोलला. कार्यकर्त्या वडील आणि आईशी बोलल्या. मनीषही ठामपणे वडिलांना विरोध करायचा. त्याचा नकळत वडिलांवर परिणाम झाला. वडिलांच्यात बदल झाल्याने आता या मुली बाहेर पडून स्वत:चं शिक्षण घेत आहेत. तर हा मनीष संस्थेतच मुलींच्या अस्तित्वासाठी काम करतो आहे.
-----
असा वाढला मुलांचाही सहभाग
छेडछाड करणाऱ्या मुलांना आपण मुलींचं किती नुकसान करतोय याची जाणीव नसते. वाशी नाक्यावर राहणारा रणजित हा गुंड मुलगा. मुलींना खूप छेडायचा. कोरोतल्या सुषमा काळे या कार्यकर्तीला एकदा त्याने छेडले. तेव्हा सुषमाने त्याला तोंडावर उत्तर दिले. त्यामुळे नंतर त्याने सुषमाला छेडले नाही. पण इतर मुलींना छेडायचा. तेव्हा एक दिवस सुषमाने रणजितला संस्थेत यायला सांगितले. तिथे खूप मुली असल्याचे सांगितल्यामुळे रणजित संस्थेत आला. तेव्हा संस्थेत छेडछाडीचा मुलींवर कसा परिणाम होतो यावर चर्चा चालू होती. ते ऐकल्यावर रणजितचा चेहरा पाहिल्यासारखा झाला. त्यानंतर तो संस्थेत जसा येत गेला तसा त्याच्यात बदल होत गेला. त्याला कोरोने फेलोशिपही दिली. त्याने वर्षभर मुलांच्या ग्रुपमध्ये काम केले. सध्या तो छेडछाडीविरोधात आवाज उठवणाऱ्या मुलांच्या ग्रुपबरोबर काम करतोय. संस्थेत असा बदल झालेली अनेक मुले आहेत.
----
करूया हक्कांची जाणीव
केवळ एका विशिष्ट स्तरावर मुलींवरचे अत्याचार होत नाहीत. तर अगदी प्रत्येक ठिकाणी हे पहायला मिळते. त्यामुळे शाळा, महाविद्यालये, आॅफिसेस अशा ठिकाणीही 'लर्निंग कमिटी प्रोग्रॅम'वर आधारित असलेले कार्यक्रम घेता येऊ शकतात. खरं तर शाळेतच मुला-मुलींना लिंगओळख (जेंडरची) चांगल्या पद्धतीने माहिती व्हायला हवी. त्यासाठी आम्ही काही शाळांमध्ये जेंडरवर आधारित असलेले सापशिडीसारखे खेळ घेतले आहेत. यातून पुरुषसुद्धा स्त्रियांची कामे करू शकतो हे दाखविले गेले आहे. तसेच सोशल नॉर्म्सवर चर्चाही घडविल्या जाऊ शकतात. याशिवाय 'सखी सहेली' आणि 'यारी दोस्ती' हे दोन उपक्रम मोठ्या प्रमाणात आम्ही राबवत आहोत. यात स्त्रीत्व म्हणजे काय, यावर विस्ताराने चर्चा सखी सहेली अंतर्गत मोठ्या प्रमाणात घेतल्या जातात. तर मर्दानगी म्हणजे नेमके काय, त्याचा वापर चांगल्या पद्धतीने कसा करता येईल, पुरुषांच्या समस्या यावर आधारित 'यारी दोस्ती' मध्ये पुरुषांशी चर्चा आयोजित केल्या जातात. त्याचा परिणाम समाजात मोठ्या प्रमाणावर घडू शकतो. याशिवाय मुलींना मुलांबद्दल आणि मुलांना मुलींबद्दल नेमकं काय वाटतं, याबद्दलही मोकळेपणे चर्चा घडू शकते. त्यामुळे दोघांचीही मानसिकता बदलायला यातून मदत होते.
मुला-मुलींशी मोकळेपणे बोलायला सुरुवात केल्यावर साहजिकच त्याचे सकारात्मक परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे. मुला-मुलींच्या डोक्यातले विचार समजायला यामुळे मदत होते. तसेच संवाद साधला गेल्याने मुला-मुलींना काय त्रास होतो याचीही जाणीव अधिक चांगल्या प्रकारे होते. समाजातले हे छोटे बदल टिपणं, ते बघणं आणि ते जास्तीत जास्त लोकांसमोर कसे जातील हे पाहणं सध्या आम्हाला महत्त्वाचं वाटतं आहे. त्यामुळेच मुला-मुलींना हक्काची जाणीव निर्माण होण्यास मदत होईल.
मुमताज शेख (कोरो प्रोग्रॅम को-आॅर्डिनेटर )
--------------
मी कधीकाळी छेड काढायचो..
चेंबूरजवळच्या वाशीनाका गणेशनगर या एरियात पूर्ण दिवस मित्रांबरोबर टाइमपास करण्यात घालवायचो. मुलींना आयटम म्हणून तर चिडवायचोच शिवाय एखादी सुंदर मुलगी दिसली की शिटी मारायचो. एक मुलगी आवडायचीही पण तिने काही प्रतिसाद दिला नाही म्हणून तिला मारायलाही गेलो होतो. हे सगळं जवळपास ७-८ वर्ष सुरू होतं. त्याच दरम्यान कोरोच्या सुषमालाही दोन-तीन वेळा छेडलं. तिने सरळ उलटा जवाब दिला. त्यामुळे ही आपल्या टाइपची नाही म्हणून दुर्लक्ष केले. मग नंतर सुषमा आपली फ्रेंड बनली. तिने काही दिवसांनी माझ्या आॅफिसमध्ये ये म्हणूून सांगितले. मी गेलो नाही तर मुली पण आहेत तिथे असे तिने सांगितल्यावर तर मी गेलोच. तिकडे लर्निंग कमिटी प्रोग्रॅम सुरू होता. मी टाइमपास करायचा म्हणून त्यांनी दिलेला फॉर्म भरायला सुरुवात केली. त्यात अनेक प्रश्न होते. शॉर्ट कपडे घातल्यावरच छेडता का?, मुली कशा असतात. ते प्रश्न वाचून का माहिती नाही त्रास झाला. मग परत दुसऱ्या दिवशी संस्थेत जावसं वाटू लागलं. भारी भारी वाटायला लागलं. मला अॅक्टिंगची लई आवड असल्याने मी गंमत म्हणून पथनाट्यात भाग घेतला. त्या पथनाट्यात नैनाने मुलाने छेडल्यावर काय त्रास होतो हे करून दाखवलं. आपला हक्क यांच्यामुळे डावलला जातो, हे सगळं ऐकल्यावर तर स्वत:चीच लाज वाटायला लागली. मग माझा मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. नैनाने तर मला राखीच बांधली. गेल्या दोन वर्षांपासून मी असले मुलींना छेडण्याचे प्रकार पूर्ण बंद केले आहेत. त्यानंतर मी वर्षभर मुलांच्या ग्रुपमध्ये काम केलं. मी छेडणाऱ्या मित्रांनाही सांगत असतो आता मुलींना छेडू नका म्हणून, आता तर कोरोने मला फेलोशिपही दिली आहे. मी आता चांगलाच वागणार आहे.
रणजित गणपती
----------
मी कोण ?
१५ वर्षांपूर्वी घाटकोपरच्या रमाबाई नगरातली सकाळ शिव्यांनी सुरू व्हायची आणि रात्र दारू पिऊन. दिवसभर मुलींना छेडणं हेच काम. कसाबसा १०वी झालो. पण नंतर मित्रांबरोबर मुलींना भरपूर छेडलं. अगदी छावी, आयटम बोलण्यापासूून टॉयलेटवरती नाव लिहिण्यापासून सगळं केलं. रोजच्या रोज यावरून भांडणं व्हायची. पण आम्ही मात्र त्याकडे दुर्लक्ष करायचो. तेव्हा तारुण्याची धुंदीही होती. दहीहंडीच्या दिवशी तर आतिश चित्रपटात ज्याप्रमाणे संजय दत्त शर्ट हाताला बांधून तलवार घेऊन धावतो, त्याप्रमाणे तलवार मिळवून मीही धावलो होतो. त्यामुळे सगळे मला टरकून असत. त्याचा गैरफायदा मी जास्त घेतला. मुलीने घरी सांगितलं तर त्यांच्या वडिलांना मारायलाही पुढे असायचो. एकदा तर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ४० जणांनी बदडलं होतं. असे अनेक प्रकार त्याकाळात केले. संडे म्हणजे आमचा फनडे असायचा. त्यावेळी माझा एक वागणुकीने चांगला मित्र होता. त्याने मला यारीदोस्ती प्रकल्पाविषयी सांगितलं. मी फक्त दारू प्यायची संडेला असं सांगितलं. मग मला त्याने दारू पिण्याच्या बहाण्याने कोरोत नेलं. कोरोचे डायरेक्टर महेंद्र रोकडे तेव्हा सेशन घेत होते. ते एकदम वेगळं वाटलं. आवडलं ते काय सांगत होते ते. त्यांनी नंतर सुमननगरला बोलावलं. २-३ दिवस सोबत ठेवलं. उपदेशाचे डोस न पाजता मला समजून घेतलं. ते फिलिंग जाम भारी होतं. मग त्यांनी कोर्सला ये म्हणून सांगितलं. केवळ त्यांच्या प्रभावाने गेलो तर तिकडे दुसरेच लोक शिकवत होते. त्याचा जाम कंटाळा आला. खूप आरडाओरडा केला तेव्हा. मग एका रविवारी सरांचं 'मी कोण' या विषयावर व्याख्यान होतं. त्याने मी पुरता हळहळून गेलो. सुमननगरला घरी जाताना 'मला काय करायचंय' हाच विचार मनात होता. मग ठरवलं चांगलं वागायचं. पण नेमकं काय करायचं कळत नव्हतं. त्यानंतर घरातल्या कामांमध्ये हातभार लावायला लागलो. छेडछाड बंद केली. कोणी करत असेल तर करू नका, असेही सांगायला लागलो. मी असे काम करतोय, पाणी भरतोय ते बघितल्यावर मला बायल्या म्हणून चिडवायला लागले. पण मी त्यांच्यावर रागावलो नाही. मग मी सरांच्या प्रभावाने कोरोत दाखल झालो. यावेळी हिरो म्हणून काय प्रतिमा असली पाहिजे याची प्रकर्षाने जाणीव झाली. रिस्क व्हॉयलन्स म्हणजे काय तेही कळले. हळूहळू वस्तुस्थितीची जाणीव होत गेली. त्यादरम्यान मी माझे बी.ए., एम.एस.डब्ल्यू. पूर्ण केले. आता जमिनी आणि पाण्याचे समान वाटप या विषयावर सध्या माझे मुंबईबाहेर काम सुरू आहे. मी १५ वर्षांपूर्वी कसा होतो ते आठवले की हसायला येते मला.
- सूर्यकांत कांबळे