वर्क फ्रॉम होमच्या काळात ऑफिस पॉलिटिक्स होत नाही? - कोण म्हणतं?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 04:53 PM2020-08-13T16:53:29+5:302020-08-13T16:54:57+5:30
WFH आणि राजकारण
- नीला देवस्थळी
ऑफिसला जाणं कमी होऊन आता वर्क फ्रॉम होम वाढलं आहे.
आपण ऑफिसातच जात नाही, त्यामुळे कुणाची भेट नाही, त्यामुळे ऑफिस गॉसिप नाही, राजकारण नाही, साहेबाच्या मागेपुढे करणं नाही, असं कुणाला वाटत असेल तर तो भाबडा समज मनातून काढून टाका.
कारण उलट घरून काम करताना बॉसला आपलं काम दिसणं, आपल्या कामाचं क्रेडिट आपल्यालाच मिळणं, इतरांनी ते न ढापणं हेही पहायला हवं.
अधिक बोलकी माणसं इतरांचं क्रेडिटही घेऊन जातात आणि काही माणसं घरी रात्रंदिवस कामच करतात असंही होऊ शकतं.
त्यामुळे ऑफिस पॉलिटिक्सचा एक नवीन चेहराही आता दिसतो आहे, त्याविषयीही कोरोनाकाळात लोक विचार करत आहेत.
हे मान्य केलं की, आपण ऑफिस पॉलिटिक्स करणार नाही, मात्र तरी आपल्याला कुणी छळलं तर?
आपल्या कामाचं क्रेडिट हिरावलं, आपलं काम साहेबाला न दिसणं, त्यानं आपल्यालाच झापणं, चुका होणं किंवा काढणं, आपल्याविषयी कुणीतरी काहीतरी भलतंच पसरवणं, हे सारं होऊच शकतं, त्यामुळे सावध राहा.
आणि काही गोष्टींचं भान राखा आणि त्याविषयी सजगही राहा.
* समजदार को इशारा काफी है, हे लक्षात ठेवून जर कुणी तुमच्या कामाचं परस्पर क्रेडिट घेत असेल तर ऑफिसच्या झूम मीटिंगवर, व्हॉट्सअॅप ग्रुपवर आपण काय काम केलं, त्यातला आपला सहभाग हे स्पष्ट आणि सकारात्मक भाषेत लिहा.
* आपण जे काम केलं, ते लोक पाहतीलच असं न म्हणता, ते काम इतरांपुढे मांडायला शिका.
* केवळ सतत ऑनलाइन अलर्ट न राहता, बॉसला ऑनलाइन न दिसता, आपलं कामही चोख करा. त्यात चुका होणं याकाळात परवडणारं नाही.
*ऑफिसच्या ग्रुपवर कोण काय म्हणतं, याचं अन्यत्र ग्रुपवर, पर्सनलवर गॉसिप करू नका.
* फोनवर, मेसेजवर काहीही महत्त्वाचं शेअर करू नका, फार जवळचा मित्र असला तरी तो कलीग आहे याचं भान सोडू नका.
* घरून काम करताना ऑफिसच्या कामातून तास दोन तास ब्रेक घेतला तर तसं स्पष्ट बॉसला कळवा, त्या दिवशीचं काम त्याच दिवशी करा.
*सहका:यांशी उत्तम मैत्री असणं हे चांगलंच, मात्र तरीही ते सहकारी आहेत, शाळकरी वयातले मित्र नाहीत, हे विसरू नका.