फिजिकल डिस्टन्स पाळाच; इमोशनल डिस्टन्सचं काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 03:09 PM2020-07-23T15:09:51+5:302020-07-23T15:18:20+5:30
फिजिकल डिस्टन्स पाळाच; पण मनांचं काय? मनानं दूर जाणं, मदत नाकारणं, माणसंच नाकारणं हे आपल्याला कुठं नेईल?
- गणोश पोकळे
सात-आठ महिने झाले कोरोना उद्भवला.
आज गावखेडय़ात लोक सहज म्हणतात की काय हा आजार, माणसात माणूस राहिला. कोरोनाने माणसा-माणसात अंतर पाडलं.
सामाजिक अंतराचा शाप घेऊन हा आजार आला. जगभरातली मानवी गजबज होत्याची नव्हती केली. कोटींच्या घरात लोकसंख्या असलेली शहरं मोकळी झाली. गावखेडय़ार्पयतचा मोकळा व्यवहार एका फटक्यात बंदिस्त झाला. गजबजलेल्या शहरासह गजबजलेले रस्ते एकाचवेळी निवांत झाले. प्रवाशांसह प्रवासही थांबला.
पण शारीरिक दुरी राखता राखता माणसा-माणसात जे मानसिक अंतर पडत चाललंय त्याचं काय, असाही प्रश्न आहेच. कोण आणि कशी मिटवणार ही दरी. एक काळ असा येईल कोरोना साथ जगभरातून पूर्णपणो नाहीशी झालेली असेल. पण वाढलेलं मानसिक अंतर कसं कमी होणार?
या आजाराचा प्रसार होऊ नये म्हणून शारीरिक अंतर पाळायचे आहे ही गोष्ट खरीच. पण हे अंतर पाळलंजातं तेव्हा समोरच्या व्यक्तीला जी वागणूक दिली जाते त्या नजरा कशा बदलणार?
शहरातून गावांत कुटुंब आले. काहींना आसरा आणि प्रेम मिळालंही. पण काहींच्या वाटय़ाला मात्र उपेक्षा आली. रक्ताच्या नात्याच्या माणसांनीही त्यांना जवळ करायला घरात घ्यायला नकार दिला. कुठं झाडाखाली त्यांना संसार मांडावा लागला. माणसांत, नात्यांत दुरावा आणि अविश्वास आला.
मनानं माणसं दूर झाली. माणसांपासून, आपल्याच माणसांपासून धोका आहे असा अविश्वास नजरेत कसा काय रुजला.
आणि तो आता कसा पुसला जाणार?
संकट येत असतात, जात असतात. मात्र, या आपुलकीचा, जिव्हाळ्याचा, स्नेहाचा, मायेचा ओलावा सुकणार नाही हे तरी आपण पाहिलं पाहिजे.
संकटकाळात माणसांना मदतीची गरज अस
ते, तेव्हा मदत नाही करणार तर कधी?
तेव्हा माणुसकी नाही जपणार तर कधी?
कोरोनाकाळात शारीरिक दुरी-अंतर हे महत्त्वाचं आहे. पण ते करताना मनंही जपली पाहिजे. हे अंतर ठेवताना आपण जे शब्द वापरतोय, जी वागणूक देतोय, ती जर मनाच्या आत ठेच पोहचवणारी असेल तर. शेवटी इतकंच की, वेळ आल्यावर हा आजार नक्की जाईल. तो जाण्यासाठी आणि आपल्याला न होण्यासाठी होईल ती काळजी जरूर घ्यावी. पण त्यापेक्षा अधिकची काळजी माणसा-माणसात आणि रक्ताच्या नात्यात अंतर पडणार नाही याची घ्यायला हवी.
(गणोश मुक्त पत्रकार आहे.)