एका साध्याशा रशियन मुलीला का बिचकून आहे रशियन सरकार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 03:47 PM2019-08-22T15:47:58+5:302019-08-22T15:48:20+5:30
एका रशियन तरुणीचे दोन फोटो सोशल मीडियात सध्या तुफान व्हायरल आहेत. पहिल्या फोटोत ती मुलगी सशस्त्र पोलिसांच्या घोळक्यात जमिनीवर शांतपणे बसून पुस्तक वाचताना दिसते. दुसर्या फोटोत पोलीस त्या मुलीची उचलबांगडी करताना दिसतात. कोण ही मुलगी?
- कलीम अजीम
गेल्या काही दिवसांपासून एका रशियन तरुणीचे दोन फोटो सोशल मीडियात सध्या तुफान व्हायरल होत आहेत. त्यातल्या पहिल्या फोटोत ती मुलगी सशस्त्र पोलिसांच्या घोळक्यात जमिनीवर शांतपणे बसलेली दिसते. हातात पुस्तकाची प्रत असून, ती काहीतरी वाचते आहे. दुसर्या फोटोत त्या तरुणीला पोलीस हात-पाय पकडून उलटं लटकवून फरफटत घेऊन जात आहेत.
Olga misik, pro-democracy movement आणि Peaceful या हॅशटॅगसह हे दोन फोटो सोशल मीडियावर महिनाभरापासून धुमाकूळ घालत आहेत.
कोण आहे ही मुलगी?
ओल्गा मिसिक. तिचं नाव. ती फक्त 17 वर्षाची असून, मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटीत शिक्षण घेते आहे. ओल्गा मॉस्कोच्या उपनगरातील निवासी आहे. हुकूमशाही राजवटीबद्दल लिहिणारे जॉर्ज ऑरव्हेल आणि अल्डस हॅक्सले तिच्या खास आवडीचे लेखक. सरकारच्या निषेधासाठी हजर असलेल्या हजारो लोकांपैकी ओल्गा एक होती. आज ती रशियाच्या लोकशाही समर्थक चळवळीची प्रतीक म्हणून जगभरात ओळखली जाते आहे.
येत्या सप्टेंबर महिन्यात रशियातील मॉस्कोत सिटी असेम्बलीच्या (डय़ूमा) निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत काही अपक्ष उमेदवारांना तांत्रिक कारणामुळे अर्ज भरण्यापासून वंचित ठेवण्यात आलं आहे. या निषेधार्थ 27 जुलैला हजारो लोकशाही समर्थक रस्त्यावर उतरले. पारदर्शक पद्धतीने निवडणुका घेण्यात याव्यात, असा या आंदोलकांचा आग्रह आहे. परंतु अपक्ष उमेदवारांना सरकार निवडणुका लढविण्यापासून लांब ठेवत आहे, असा आरोप करत मॉस्कोत निषेध- आंदोलने सुरू आहेत.
माध्यमांत प्रसिद्ध होणार्या बातम्यांनुसार, सरकारने हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी पोलिसी बळाचा वापर केला आहे. त्याचवेळी आपले संविधानिक अधिकार मिळावेत म्हणून ओल्गा दंगल रोखणार्या सशस्त्र पोलिसांच्या गराडय़ात जमिनीवर फतकल मारून बसलीय. बुलेटप्रुफ जॅकेट घातलेल्या ओल्गाच्या हातात देशाची राज्यघटना असून, तिचं वाचन ती करत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं रक्षण करणारे कलम ती वाचून दाखवत असताना हातात बंदुका घेतलेले पोलीस बघत आहेत. लोकशाही अधिकारांसाठी सत्याग्रह करणारी ही तरु णी बंदुका व रायफलच्या गराडय़ात अतिशय शांत बसली आहे.
ट्विटरवर या पीसफुल मार्चचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. अन्य फोटोंमध्ये ओल्गा पोलिसांच्या राउण्डमध्ये फिरून राज्यघटनेच्या अन्य कलमांचे वाचन करताना दिसतेय. ती म्हणते, ‘प्रत्येकजण निवडणुकीत भाग घेऊ शकतो, प्रत्येकाला स्वातंत्र्य मिळविण्याचा हक्क आहे. जनतेचे अधिकार व इच्छा ही देशासाठी सर्वात महत्त्वाची बाब आहे.’
ओल्गाच्या निषेधाचे हे फोटो सोशल मीडियावर हजारो वेळा शेअर केले गेलेत. काही जणांनी तिची तुलना बीजिंगमधील तियाननमेन स्क्वेअरच्या टँक मॅनशी केली आहे, जो 1989 मध्ये एका लष्करी रणगाडय़ाच्या समोर उभा होता. भारतातील काही नेटकर्यांना तिला पाहून मणिपुरात महिलांनी केलेल्या नग्न आंदोलनाची आठवण झाली. मणिपूरमधून अफ्स्पा हा कायदा हटवावा अशी त्यांची मागणी होती.
प्रत्येक जण आपल्या स्थानिक परिस्थितीशी ओल्गा मिसिकची हिंमत जोडून पाहतो आहे. जगभरातील नेटकर्यांची ती रोल मॉडेल बनलीय. अनेकांनी तिचे फोटो शेअर करत तिला पाठिंबा दर्शवला आहे. अनेकांनी तिच्याकडून प्रेरणा घेऊन लोकशाही व्यवस्थेचं समर्थन केलंय.
आंदोलनाबद्दल ओल्गानं बीबीसीला सांगितलं की, ‘मी कुठल्याही राजकीय पक्षाची समर्थक नाही. माझा निषेध फक्त आगामी निवडणुकांपुरता नाही, तर रशियन लोकांच्या अधिकारांचे सतत हनन होत असल्याच्या विरोधात आहे.’
या निषेध, आंदोलनापूर्वी विरोधी पक्षातील अनेक बडय़ा नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यांना लोकशाही समर्थक चळवळीत सामील होण्यापासून रोखण्यात आलं. परंतु, लोकशाही रक्षणासाठी मास्कोत हजारो लोकं रस्त्यावर उतरली. या निदर्शनानंतर रशियन पोलिसांनी सर्व आंदोलकांसह ओल्गालाही अटक केली.
अर्थात ओल्गाला गेल्या तीन महिन्यांत 4 वेळा ताब्यात घेण्यात आलं आहे. यावर ती म्हणते की, ‘प्रत्येक वेळी मी शांततेत निषेध करत असते तरीही पोलीस मला उचलतात.’ यावेळी तिला 12 तासांनंतर सोडण्यात आलं. विनापरवाना व बेकायदेशीरपणे सरकारविरोधी मार्चमध्ये भाग घेतल्याबद्दल तिला 20 हजार रूबल (21 हजार भारतीय रुपये) इतका दंड ठोठावण्यात आला आहे.
रशियात लोकशाही हक्कांच्या मागणीसाठी एक 17 वर्षाची मुलगी उभी राहाते आणि तिच्या शांत निदर्शनाला यंत्रणा वचकून असते, हीच तिची ताकद आहे.