वन वे तिकीट : काबिल बनण्याची कोशिश, घरदार सोडून मोठ्या शहरात स्वप्नांच्या मागे धावणारा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2017 01:19 PM2017-08-31T13:19:54+5:302017-08-31T13:20:07+5:30
वडिलांचा औजारं बनवण्याचा व्यवसाय. पण त्यांनी मला इंजिनिअरिंग करायला शहरात पाठवलं. आयटीत प्रवेश मिळाला; पण मी ठरवलं मेकॅनिकलच करायचं..
-भूषण राजेंद्र सूर्यवंशी
सायगाव (बगळी). गिरणा व मन्याड नद्यांच्या काठावर वसलेलं हे गाव. उत्तर महाराष्ट्रात सर्वात मोठी दत्ताची यात्रा भरणारं आणि पहिलवानांचं गाव. आता तर ‘महाराष्ट्र केसरीचं गाव’ म्हणून राज्यात माझ्या गावाची ओळख आहे. माझं दहावीपर्यंतचं शिक्षण हे गावातच झालं. आम्ही दोन भावंडं आणि एक लहान बहीण. माझे वडील शेती औजारं बनवतात. पंचक्रोशीत त्यांची राजू बाबा म्हणून ओळख आहे. मी घरात मोठा, अभ्यासात हुशार. त्याला शिक्षणासाठी माझ्याकडे पाठवा असं माझ्या मामांनी सुचवलं. वडिलांचं स्वप्न होतं की, मुलाला इंजिनिअरिंगला पाठवावं आणि त्यांनी मला नाशिक ब्रह्मा व्हॅलीला प्रवेश घेऊन दिला. २००९ मध्ये पहिल्यांदा घर सोडलं. राहायची सोय मामांकडेच झाली. आता आपण घर सोडून नवीन शहरात आलो हे जाणवलं. घरच्यांच्या आठवणीनं जीव व्याकूळ व्हायचा; पण मी स्वत:ला सावरायचो. इंजिनिअरिंगच्या दुसºया वर्षाला मी थ्री इडियट्स चित्रपट बघितला. आणि तो पाहून मी ब्रँच बदलायचा निर्णय घेतला. आयटीमधून मेकॅनिकला बदली करून घेतलं. आमचा व्यवसाय वेल्डिंग वर्कशॉपचा असल्यानं मेकॅनिकलची आवड होती. पण आयटी मिळालं म्हणून घेतलं होतं. पण थ्री इडियट्स सिनेमा पाहून मला एक शिकायला मिळालं की, आपल्याला ज्या गोष्टींची आवड आहे, तेच करावं. ‘कामयाब नही काबिल बनो’.
जे ठरवलं ते केलं. मी मेकॅनिकल इंजिनिअर झालो. आणि थोडे दिवस क्वालिटी इंजिनिअर म्हणून कंपनीत जॉब केला; पण तेथेही मन लागेना. एक दिवस जॉब सोडला आणि मनाशी खूणगाठ बांधली की, आता नोकरी करू तर सरकारी, नाहीतर आपला शेती अवजारांचा बिझनेस वाढवू.
नाशिकमध्ये बरेच मित्र मिळाले व नवजीवन गोष्टी शिकायला मिळाल्या. ज्ञानाबरोबर जीवनमान व मामासोबत राहून दुनियादारी समजली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला कमी वयात समाजकारणाची आवड निर्माण झाली. माझे मामा करत त्या कामात मी सहभागी होत होतो. समाज पाहत होतो. मामाच्या मार्गदर्शनाने व मित्रपरिवाराच्या सहकार्याने गावात गुरुकुल इंग्लिश स्कूल सुरू केलं. संस्थेला आईवडिलांचं नाव दिलं. गावात विविध उपक्रम सुरू केले. ग्रामीण भागात डिजिटल पद्धतीनं मुलांना शिक्षण देणं हा आनंद काही वेगळाच मिळाला.
मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं, त्या कौशल्याचाही उपयोग करतोय. छोटे ट्रॅक्टर बनवायचा प्रयत्न करतो आहे. २०१६ ला भंगारमधून एम-८० गाडी घेतली आणि तिची चारचाकी गाडी बनवली, इंग्रज काळातील मॉडेल सारखी. पूर्ण गाव जमायचा गाडी बघायला. काहीतरी नवीन दिसायचं म्हणून खूपच मजा यायची. असेच काही उपक्रम डोक्यात आहे. एक नक्की, बाहेरगावी गेलो, नवीन जग दिसलं. शिक्षणामुळे नवीन संकल्पना सुचवायला लागल्या. समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. आता प्रशासनात जाऊन काम करायचं आहे. म्हणून राज्य सेवा परीक्षेची तयारी पण करतोय.
काबिल बनण्याचा प्रयत्न सुरूच आहे..