ऑनलाइन बिझनेसचे हुनरबाज

By अोंकार करंबेळकर | Published: December 28, 2017 03:00 AM2017-12-28T03:00:00+5:302017-12-28T03:00:00+5:30

कॉलेजात शिकणारी, जेमतेम विशीची ही मुलं. त्यांनी ठरवलं ऑनलाइन शर्ट विकू आणि..

Online Business | ऑनलाइन बिझनेसचे हुनरबाज

ऑनलाइन बिझनेसचे हुनरबाज

googlenewsNext

स्टार्ट अप आणि नवउद्योग हे तसे चर्चेतले विषय. तरुणांच्या सुपीक डोक्यातून एखादी भन्नाट कल्पना निघते. त्याला नव्या जगाचं भान आणि धडपड करण्याची वृत्ती या भांडवलाची साथ मिळाली तर काहीच्या सुसाट धावते उद्योगाची गाडी. ती गाडी कशी पळवायची हे विचारा चेन्नईतल्या विशीतल्या दोघांना. आॅनलाइन टी-शर्ट विकून २० कोटींचा व्यवसाय करण्याची किमया त्यांनी करून दाखवली.
प्रवीण केआर आणि सिंधुजा. प्रवीण मूळचा बिहारचा, तर सिंधुजा पक्की हैदराबादी. दोघांनी चेन्नईच्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये पदवीसाठी प्रवेश घेतला. शिकत असतानाच त्यांच्या डोक्यात व्यवसायाच्या कल्पना येत-जात. सध्या बाजारात काय सुरू आहे, तरुणांना कोणते कपडे आवडतात, सोशल मीडियावर काय चाललंय यावर त्यांची बारीक नजर. आॅनलाइन संकेतस्थळावरून खरेदी करण्याचं प्रमाण वाढतंय असं त्यांचा अभ्यास सांगत होता. आपणही लवकरात लवकर काही केलं पाहिजे हा विचार दोघांच्याही मनात आला. पण २०१४ साली या दोघांच्या कोर्सची सातवी सेमिस्टर सुरू होती. एकीकडे अभ्यास तर दुसरीकडे डोक्यात येणाºया आॅनलाइन प्रॉडक्ट विक्रीच्या कल्पना, अशा गमतशीर कोंडीत ते अडकले. अभ्यास सुरु ठेवूनच एक आॅनलाइन विक्री केंद्र सुरू केलं. आता त्यावर विकायचं प्रॉडक्टही दोघांनी ठरवलं होतं. टी-शर्ट. शाळा-कॉलेजांच्या फेस्टिव्हलमध्ये, त्यांच्या खेळांच्या स्पर्धांमध्ये आपल्याला हवे तसे टी-शर्ट छापून घेणं याला महत्त्व आलं आहे. प्रवीण आणि सिंधुजाने नेमकं हेच हेरलं. दोघांनी कॉलेजांमध्ये जाऊन त्यांना हव्या त्या डिझाइननुसार टी-शर्ट तयार करुन द्यायला सुरुवात केली. दहा लाख रुपयांच्या भांडवलावर त्यांनी टीशर्ट उद्योगाच श्रीगणेशा केला. आॅनलाइन मार्केटमध्ये थेट दिल्ली, कोलकाता, ईशान्य भारतात त्यांच्या टी-शर्टची धडाक्यात विक्री होऊ लागली. दोन वर्षांमध्ये देशातल्या १०० कॉलेजांमध्ये ते पोहोचले. त्यांचा स्वत:चा 'यंग ट्रेंडझ' हा ब्रॅण्डच तयार झाला आहे.
चेन्नईमध्ये हातपाय मारल्यावर त्यांच्या लक्षात आलं की तामिळनाडूतल्या तिरुपूरमध्ये उद्योग स्थापन करणं तुलनेत जास्त चांगलं ठरेल. तामिळनाडूत व्यवसाय सुरू करायचा तर तिथली भाषा यायला हवी. दोघांनाही तामिळचा गंंधही नव्हता. पण कामचलाऊ भाषा शिकत त्यांनी व्यवसायात जम बसवला. सातव्या सेमिस्टरमध्ये एका बाजूला अभ्यास, परीक्षा आणि व्यवसाय याचं त्यांनी प्लॅनिंग केलं. त्यांची धडपड बघून त्यांना मदत करायला कॉलेजातले काही प्राध्यापकही तयार झाले. प्रवीण आणि सिंधुजा यांचा व्यवसाय आता जोरदार सुरू झाला असून, राज्यांत त्यांना वेअरहाउस उभे करावे लागताहेत.

प्रॉब्लेम तो आयेगा ना बॉस! - सिंधुजा
सिंधुजा म्हणते, 'प्रत्येक गोष्टीचा ताण येतोच. रोज नवा प्रश्न आणि रोज ताण असतोच. कदाचित प्रेशरचं स्वरूप बदलत जातं. आम्ही या समस्यांकडे, ताणांकडे आव्हान म्हणून पाहण्याऐवजी त्यांच्याकडे संधी म्हणून पाहायला सुरुवात केली. प्रवीण आणि मी एखादा अडथळा समोर आला तर आनंदीच होतो. म्हणतो चला आता नवं काहीतरी समजणार, नवं काहीतरी शिकायला मिळणार. हा उद्योग सुरु करताना आमच्याही आई-बाबांच्या मनात शंका, काळजी आणि भीती होतीच. पोरं एकदम लहान आहेत, त्यांचं कसं होणार अशी भीती त्यांच्याही मनात होतीच. आणि पालक म्हणून त्यांनी असा विचार करणं योग्य होतंच, मात्र आमची प्रगती पाहून त्यांचा विश्वास बसला आणि काळजी कमी होत गेली. त्यांनी भांडवलासाठी केलेल्या मदतीतून आम्ही हे सगळं उभं केलं आहे. आज जेव्हा नवीन विद्यार्थी आमच्याकडे माहिती घ्यायला येतात, कौतुक करतात, प्रश्न विचारतात किंवा आमच्यामुळे त्यांना प्रेरणा मिळाली असं सांगतात तेव्हा खरंच भारी वाटतं.'

( ओंकार लोकमत ऑनलाइमध्ये उपसंपादक आहे.)

Web Title: Online Business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.