Online Educationची परवड : मॅडम, नका सांगू कॅमेरा ऑन करायला...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 04:38 PM2020-09-10T16:38:17+5:302020-09-10T16:39:23+5:30
कुडाचं नाहीतर पडकं विटांचं घर, अंधार. पोरं घरात थांबतच नाहीत, बाहेर मोबाइल घेऊन बसतात, वार्याचा आवाज, त्यात घरातली, फाटक्यातुटक्या कपडय़ातली माणसं इकडून तिकडं गेली की ही पोरं कानकोंडी होणार! दुसरीकडे घडय़ाळी तासावर शिकवणारे प्राध्यापक. बिनावेतन. बायकोपोरांना घराबाहेर पिटाळून, कुठं किरकोळ कामं करून पोट भरणार!
डॉ. वृन्दा भार्गवे
समोर कुडाची झोपडी, पत्र्याची शेड. त्याच वाटेने जाणारा एखादा उत्सुक, खंगलेला म्हातारा. उघडय़ा अंगाची पोर हातात प्लॅस्टिकचा पेला घेऊन बसलेली.
झूमवरून ऑनलाइन लेक्चर घेणार्या मला हे सगळे दिसू नये म्हणून सतत त्याच्या मोबाइलच्या कॅमेराचा अँगल बदलणारा, माझा एम.ए.चा विद्यार्थी.
मी त्याला कादंबरी या साहित्य प्रकाराबद्दल प्रश्न विचारतेय. त्याला साहित्यशास्र, नाटय़शास्र, समीक्षा, संशोधन सगळ्याच विषयांचा अभ्यास करावयाचा आहे. साहित्य प्रकाराची त्याची संकल्पना सुस्पष्ट व्हायला हवी, म्हणून त्याला प्रश्न विचारण्याचा माझा अट्टाहास. तो मात्र, ऐकण्यापेक्षा आजूबाजूला जे दिसतंय त्यामुळे अधिकच कसनुसा होणारा. त्याला भाषाव्यवहार समजून सांगावा तर तो गप्प. त्याची बोली त्यालाच एकदम खटकणारी. तो प्रमाण भाषेचा आधार घेत शब्दाची जुळणी करत बोलणारा. एक तासाची वेळ आपण मागून घेतली आहे, ती एखादाच बोलला तर संपून जाणार. या विवंचनेत मी.
त्याला अनुवाद शिकवायचा कसा? एखाद्या सर्जनशील समजल्या जाणार्या लेखकाने अनुवाद केला तर तो दुय्यम प्रतीचे काम करतो, असे का म्हटले जाते असा प्रश्न विचारत अनुवाद विषयाकडे वळले तर त्याने मूळ पुस्तके वाचलेली नसतात. त्यांना काही पुस्तकांची मुखपृष्ठे मी दाखवते. छोटा पडदा आता त्या पुस्तकांच्या मुखपृष्ठांनी व्यापलेला असतो. शहरी विद्यार्थी भराभर स्क्रीन शॉट्स काढतात. कुडाची झोपडी मात्र नुसतेच अप्रूप पाहिल्यासारखी अचंबित. पडद्यावरच्या इतरांच्या सजलेल्या घरांकडे ओशाळल्या नजरेने पाहणारी.
झोपडीप्रमाणेच एखादी पत्र्याची शेड, पावसाचे पाणी चुकवत मोबाइल दुसर्या कुणाला हातात धरायला सांगत या सगळ्या प्रकारात सामील होण्यासाठी तिष्ठत उभी. आता विषय वेगळा, राज्यशास्र - त्यातील विचारवंत त्यांचे समाजाला योगदान. नावे कानावरून गेली तरी त्यांचे नेमके कार्यकर्तृत्व माहीत नसणारे, गळक्या शेड खाली आसर्याला आलेले. छोटय़ा पडद्यावर आता पीपीटी दाखवायला प्रारंभ. अक्षरे बारीक. झूम करून पाहायचे, हे सगळे लिहायचे कसे? प्रश्न विचारले जाणार, त्याची उत्तरे द्यायची तर आपला चेहराच नव्हे तर जिथे राहतोय तो परिसर कॅमेरा टिपणार, असे कधी घरादारासह बोललो नाही. संकोच, लाज आणि प्रचंड न्यूनगंड. तिकडून कोणीतरी बोला बोला - व्यक्त व्हाचा आग्रह करत असतो. इथे मात्र मन नि शरीर आक्रसलेले. एखादा धाडस दाखवतो, अभिव्यक्तीचे. बाकी मात्र विटेच्या अर्धवट बांधकाम असणार्या पडक्या वास्तूला बॅकग्राउण्डला ठेवत चेहरा पाडून उभे. समुपदेशनाच्या सगळ्या पायर्या चढत विद्याथ्र्यार्पयत पोहोचायचे म्हणून हा व्यक्त-अव्यक्तचा चाललेला खेळ.
कायदा, अर्थशास्र, मानसशास्र, इतिहास -विषय कोणताही असो, आता जे समोर दिसेल किंवा ऐकवले, दाखवले जाणार ते पाहायचे, ऐकायचे किंवा उतरवायचे. अधूनमधून आपल्याला विषयांचे आकलन झाले की नाही त्यावर चर्चा करणारे एखादे सेशन. त्यावेळेस आपल्याच घरातली माणसे फाटके तुटके कपडे घालून इकडून तिकडे जाताना दिसली की, ही मुले कानकोंडी होणार. घरात कोणी थांबतच नाही. सगळे घराबाहेर. तिथे येणारा वार्याचा आवाज, मधेच पडणारा पाऊस, रेंज गायब होणे. त्याच भकास काळ्या पडद्याकडे पुढचे कित्येक तास पाहत राहणे. अर्थात त्यासाठी त्यांच्याकडे वेळ असतो असे नाही. हंडा घेऊन विहिरीवरून पाणी आणायचे असते. पाडय़ावर राहणार्यांना नागली, वरईच्या शेतात जायचे असते. प्रत्येक लेक्चरला तेच ते घातलेले कपडे नीट घडी घालून ठेवायचे असतात. जगण्याची विस्कटलेली घडी समोर दिसत असूनही या कपडय़ांवरून त्यांचा पुन्हा पुन्हा फिरणारा हात.
या ऑनलाइन शिक्षणाने त्यांना काही वेळासाठी तरी त्यांचे घर, त्या घरातली नि आसपासची माणसे नकोशी झालेली असतात. घरातल्यांचा चेहरा, त्यांचे कपडे, त्यांचा एकूण वावर. सारे दळभद्री. मोबाइल ज्यांनी पोटाला चिमटा काढून दिला, ती माणसे किमान दोन तासांसाठी आपल्याजवळ फिरकू नये असे त्यांना तीव्रतेने वाटते. मोबाइल स्मार्ट असतो; पण माणसे साधी असतात. हे सामान्यपणच या काळात त्यांना डसले आहे. त्यांच्याकडचा मोबाइल किमान सात ते दहा हजाराचा. 3 जीबी रॅम असलेल्या फोनची सुरु वात 9.500 पासून पुढे होणारी. झूम किंवा गुगल मीटसारखे अॅप वापरण्यासाठी किमान तीन जीबी रॅम असणे आवश्यक. महिन्याला मोबाइल पॅकची किंमत 250 रुपये. त्यात 2 जीबी डेटा वापरायला मिळतो. 3 जीबीसाठी 330 रुपये तर 5 जीबी दिवसाला वापरण्यासाठी 480 रुपयांचा रिचार्ज करावा लागतो. एक झूमवरील लेक्चर साधारण 30 मिनिटांचे, कमीत कमी 800 एमबी डेटा त्यावर खर्च होणार. दिवसातून अशी किती लेक्चर्स झाल्यास किती खर्च याचा आपण अंदाज लावू शकतो. हे विद्यार्थी नेट-सेट आणि स्पर्धा परीक्षांना बसणार. तेथे व्हिडिओ टाकले जातात. त्यांचा नेट पॅक त्यामुळे संपतो. आर्थिक कारणांबरोबर त्यांचे मानसिक आणि भावनिक स्वास्थ्य हरवण्याची ही कारणे..
त्यांना संवाद-संज्ञापन शिकवायला जावे तर त्यांचा त्यांच्या घराशी संवाद हरवत चाललाय की काय ही भीती वाटू लागते. ऑनलाइन झाल्याक्षणी ते आखडून बसतात, दुसरा शहरी विद्यार्थी आपल्याला गबाळा म्हणतो हे त्यांनी जरी आपल्या आत जिरवून घेतले असले तरी आपली अनावस्था दिसायला नको हे मात्र प्रकर्षाने त्यांना वाटते.
कधीतरी एखाद्याचा फोन येतो, मॅडम, नका सांगू कॅमेरा ऑन करायला. त्याचे कारण आता कळते.
बाकी काहीही व्हा; पण प्रा. होऊ नका!
दुसर्या बाजूला त्या विद्याथ्र्याना शिकवणारे शिक्षक. तात्पुरत्या वेतनावरचे, घडय़ाळी तासावरचे. विनाअनुदानित. त्यांचा पगार अगदीच तुटपुंजा. पण नावामागचे बिरुद प्रा..
ही आजवरची कमाई. ती टिकवायला हवी. यापैकी काही डॉक्टरेट. त्यांच्या संशोधनाला विद्यापीठाचा पुरस्कार. शैक्षणिक कारकीर्द अगदी लखलखीत, देदीप्यमान. त्यांची अवस्था तर महाबिकट. गेल्या सहा महिन्यांपासून पगार नाही. पहिले दहा दिवस घरात, नंतर बरेचसे नेट, सेट पीएच.डी.वाले शेतात मजूर म्हणून काम करू लागले. काही पोल्ट्री फार्मवर तर काही किराणा दुकानात. त्यांच्या नोकर्या 5, 7, 8 दहा वर्षांहून अधिक काळ झालेल्या. घरात काम करणार्या बाईला जेवढा पगार एक तासासाठी दिला जातो तेवढादेखील त्यांना नाही. कधी सहा महिन्यांनी त्यांना वेतन मिळाले तर बचत सोडाच; पण मुलांच्या शाळा, कुटुंबाचा खर्च, काहीही मेळ ते घालू शकत नाहीत. ऑनलाइन शिकवण्यासाठी एक लॅपटॉप, व्हाइट बोर्ड, ट्रायपॉडसाठी झालेला खर्च. लेक्चर रेकॉर्ड करताना घरात पूर्ण शांतता हवी. मुला-बायकोला ना बागेत पाठवता येत ना मंदिरात. एका खोलीचे घर. त्यांना इमारतीच्या खाली बसवणारे प्राध्यापक जीव तोडून शिकवतात. एवढे करून आपल्याला नोकरी मिळणार की नाही याची त्यांना शाश्वती नसते. मिळाली तर नऊ हजारापेक्षा पैसा मिळणार नाही याची कल्पना असते.
शाळेतला त्यांचा एखादा मित्र जो दहावीला नापास झालेला, तो त्याच्या गोठय़ातल्या दहा-बारा गायी-म्हशींना स्वच्छ करणार्या नोकराचा शोध घेत असतो. दूध पोहोचवायचे काम करायला तयार असणार्या या प्राध्यापक मित्राला दहावी नापास नकार देतो. पीएच.डी.ची कदर ते नाही तर आपण करावी म्हणून गवंडय़ाच्या हाताखाली काम करणारा कॉमर्सचा प्राध्यापक आर्थिक आणीबाणी आली तर काय होऊ शकेल याचे प्रेझेन्टेशन घरी आल्यावर करतो.
शिक्षक दिनाला या सगळ्यांना खेडोपाडी राहणार्या विद्याथ्र्याचे मेसेजेस येतात. आम्हाला शिक्षक-प्राध्यापक व्हायचं, अगदी तुमच्यासारखे असे जेव्हा चुणचुणीत विद्यार्थी सांगतात. नि आपल्या दुर्गम भागातून शब्द फुलांच्या इमोजीज पाठवतात तेव्हा हात जोडून (त्याचीही इमोजीच) हे प्राध्यापक सांगतात, बाकी काहीही व्हा; पण प्राध्यापक होऊ नका. बायकोच्या माहेरची मोटरसायकल, महानगरपालिकेच्या शाळेत शिकणारी मुले, वेळेवर हप्ता न भरता येणारे आपण, ऑनलाइनमध्ये दिसत नाही. विद्याथ्र्याना दिसतोय आपला व्हाइट बोर्ड नि ठेवणीतले शर्ट्स.
पण खरं बापुडवाणे रिते घर, नि रंग उडालेले चेहरे येथे आहेच. कॅमेरा इथेही ऑफच हवा..
(लेखिका विद्यार्थीप्रिय प्राध्यापक आहेत.)