आॅनलाईन मार्केटिंग ते घरगुती सेवा
By admin | Published: December 31, 2015 08:16 PM2015-12-31T20:16:41+5:302015-12-31T20:16:41+5:30
ज्याला बोलता येतं, माणसांना ‘कन्व्हिन्स’ करता येतं, त्याला अच्छे दिन असा यंदाचा मंत्र आहे.
Next
ज्याला बोलता येतं,
माणसांना ‘कन्व्हिन्स’ करता येतं,
त्याला अच्छे दिन असा यंदाचा मंत्र आहे.
सेवा क्षेत्रात आणि विशेषत:
आॅनलाईन सेवांच्या दुनियेत
नवीन संधी निर्माण होत आहेत.
नवीन वर्षाचं कितीही स्वप्नरंजन केलं, तरी वास्तवाचा विचार जास्त छळतो, आणि तो करणं जास्त प्रॅक्टिकलही असतंच!
हे सही सही लागू होतं ते जॉब मार्केटला आणि त्यातून मिळणाऱ्या आपल्यासाठी उपयुक्त संधींना! त्यामुळेच नव्या वर्षाकडे या साऱ्या नजरेतूनही पाहायला हवं, आणि त्याप्रमाणं आपल्याही करिअरचा विचार करायला हवा!
खरंतर या वर्षाकडे फक्त या वर्षापुरता विचार असं न पाहता आगामी काळातल्या बदलत्या व्यवसाय संधीचा विचार म्हणून पाहायला हवं. कारण २०२० कडे वाटचाल करताना जग डिजिटल होतं आहे, त्यासंदर्भात नव्या संधी अधिक प्रमाणात उपलब्ध होताहेत. नव्या वर्षात त्या वाढतील आणि जास्त डिमाण्डिगही होतील.
काय असतील २०१६ मधले हॉट जॉब्ज?
त्या क्षेत्रांची ही एक यादी..
त्या सगळ्यात डिजिटल हे सूत्र आहे, हे ध्यानात घ्या, म्हणजे मग नव्या संधीकडे पाहताना एक निश्चित परस्पेक्टिव्ह आपल्याला मिळू शकतो.
१) डिजिटल मार्केटिंग
हे नव्या काळातलं सूत्र असेल. तुम्ही काय वाट्टेल ते विका पण आॅनलाइन. तेच सोप्या अर्थानं डिजिटल मार्केटिंग. किराणा, धान्य, एवढंच काय औषधसुद्धा आता आॅनलाइन मिळतात. शोभेच्या वस्तू, दागिने, पुस्तकं, अगदी भाजणी पिठापासून ते घरगुती चकलीपर्यंत काय वाट्टेल ते आॅनलाइन मार्केट करता येऊ शकतं. तुमची स्वत:चीच वेबसाइट पाहिजे असं काही नाही. फेसबुक वापरूनसुद्धा हे सारं जमतं. फक्त तुमच्याकडे मार्केटिंगचं स्किल पाहिजे. मग तुम्ही स्वत:च्या वस्तू विका किंवा दुसऱ्यांसाठी हे डिजिटल मार्केटिंगचं काम करा. अर्थात दुसऱ्यासाठीही हे करता येऊ शकतं. वस्तू त्यांच्या, मार्केटिंग आपलं; नफा त्यांचा, मेहनताना आपला असं हे नवीन सूत्र आहे. फेसबुक, व्हॉट्सअॅपसह तमाम डिजिटल प्लॅटफॉर्म वापरून केलेल्या पोर्टल्सना, कॉमर्सशी संबंधित व्यवसायांना येत्या काळात चांगले दिवस येणार आहेत.
पण त्यासाठी त्या डिजिटल जगाचं तंत्र, त्यातला संवादाचा मंत्र आणि चाणाक्ष नजर हे सारं लागेल! म्हणतात ना, बोलणाऱ्याचे कुळीथ विकले जातात. आता या डिजिटल जगातलं मार्केटिंग कुळीथच काय, काय वाट्टेल ते विकू शकेल!
ज्यांना हे मार्केटिंग प्रत्यक्ष जमणार नाही त्यांनी या वर्षात, हे डिजिटल मार्केटिंगचं तंत्र चालतं कसं यावर निदान नजर तरी ठेवायलाच हवी!
२) वेब डिझायनर्स, ग्राफिक डिझायनर्स
ज्या क्षेत्राला खरंच अच्छे दिन या वर्षभरात दिसतील ते हे क्षेत्र. डिजिटल जगातलं काम जितकं वाढेल, लोक जितका आॅनलाइन संवाद आणि व्यवहार साधतील तितकं वेब डिझायनर्स, ग्राफिक डिझायनर्सचं काम वाढेल! अगदी लोकल पातळीवर, म्हणजे जिल्हा, तालुका स्तरावर काम करणाऱ्यांसाठीही या कामाच्या संधी वाढतील. कारण तेच, आॅनलाइन व्यवहार. स्थानिक आमदार-खासदारांच्या वाढदिवस पुरवण्या ते त्यांचं फेसबुक सांभाळणं, ते आॅनलाइन प्रेझेन्स, त्यांच्या वेबसाइट ते स्थानिक लोकांच्या वेबसाइट करण्यापर्यंत अनेक कामं या क्षेत्रात तयार होत आहेत. आणि तुलनेनं स्किल्ड, प्रोफेशनल मनुष्यबळ अजूनही कमी आहे.
त्यामुळे या क्षेत्रावरही थोडं लक्ष ठेवाच.
३) पीआर/ सोशल मीडिया
हे क्षेत्र आपल्याकडे गेल्या काही दिवसांपासून तेजीत आहे. हल्ली सगळ्यांना आपला सोशल मीडिया प्रेझेन्स हवा असतो. अनेक कंपन्या आपली ब्रॅण्ड इमेज चांगली व्हावी म्हणून आटोकाट प्रयत्न करत पब्लिक रिलेशनवर पैसे खर्च करतात. त्यामुळे ज्यांचं संवाद कौशल्य चांगलं आहे, सोशल मीडियाची नाडी उत्तम कळायला लागली आहे आणि तिथं पडीक राहायलाही आवडतं अशांसाठी या साऱ्याचा उपयोग आता करिअर म्हणून होऊ शकतो. २०१६ मधे हे क्षेत्र आपल्याकडे चांगल्या वेगानं फोफावेल!
४)अॅप डिझायनर्स
अॅपचं खूळ किती जबरदस्त असतं, हे काय आता कुणाला सांगायला हवं?
ज्याला त्याला आपल्या फोनमधे अॅप हवे असतातच. आणि आपला स्वत:चा अॅप असावा, तो लोकांनी वापरावा असं वाटणाऱ्या व्यक्ती, संस्था, समाजसेवी संस्थाही वाढताहेत.
त्यामुळे अॅप डिझायनर्सना नव्या काळात जोरदार संधी आहेत. पण त्यात आता मोठ्या प्रमाणात इनोव्हेशन आणि तांत्रिक सफाई यांचीही मागणी वाढते आहे.
५) प्लंबर/ वेल्डर्स
तुम्ही म्हणाल या चकाचक कामांच्या यादीत ही कुठली कामं? पण हे खरंय, वरच्या सगळ्या कामांना नसेल इतकी जास्त डिमांड या दोन्ही प्रकारच्या कामांना २०१६ च नाही तर पुढच्या काही वर्षांत असेल. आजच प्लंबर आणि वेल्डर्स मिळत नाहीत. आणि हे काम आपल्या घरगुती स्तरावर जोखू नका. मोठमोठे मॉल्स, मल्टिप्लेक्स, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मोठ्ठाले फ्लायओव्हर्स या साऱ्यांसाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात या कुशल मनुष्यबळाची गरज असणार आहे.
६) डोमेस्टिक हेल्प
मूल सांभाळण्यापासून घरातले आजीआजोबा सांभाळणं, वृद्धांची-आजारी व्यक्तींची देखभाल, त्यांना नुस्ती सोबत, या साऱ्यासाठी डोमेस्टिक हेल्प अर्थात घरगुती कामात मदतनीस म्हणून सेवा देणाऱ्यांची मागणीही वाढते आहे. त्यासाठी कुशल मनुष्यबळ आज उपलब्ध नाही. त्यामुळे येत्या वर्षात या कामासाठी पैसे तर चांगले मिळतीलच पण त्याला नव्या काळातला प्रोफेशनल अॅप्रोच येण्याचीही आशा आहे.
- अनुराधा प्रभुदेसाई
( लेखिका प्रख्यात करिअर कौन्सिलर आहेत.)