ऑनलाइन पेपर तपासण्याचं टेक्निक
By अोंकार करंबेळकर | Published: August 10, 2017 11:23 AM2017-08-10T11:23:06+5:302017-08-10T11:24:46+5:30
यंदाच्या वर्षी पेपर हातानं तपासण्याऐवजी ऑनलाइन तपासण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठानं घेतला. त्याचा बोजवारा उडाला. मोठा घोळ, टीका, वाद सगळं झालं. पण ही ऑनलाइन पेपर तपासणी नेमकी असते कशी? तिचा उपयोग काय?
मुंबई विद्यापीठात झालेला पेपर तपासणीचा घोळ, त्यावरून झालेले वाद, मुलांसह पालकांचा टांगणीला लागलेला जीव या साऱ्याविषयी गेले काही दिवस वृत्तपत्रांत आपण वाचतोच आहोत. तसंही पेपर फुटणं, उत्तरपत्रिका गहाळ होणं, पास झालेले नापास होणं इत्यादी सारे चमत्कार काही आपल्याकडे नवीन नाहीत. पण तरीही यंदाचा घोळ भलताच विचित्र होता.
झालं काय की, यंदाच्या वर्षी पेपर हातानं तपासण्याऐवजी आॅनलाइन तपासण्याचा निर्णय जानेवारी महिन्यामध्ये मुंबई विद्यापीठानं जाहीर केला. आपल्याकडचे पेपर सेट करण्याची पद्धती, त्यांची वाहतूक, परीक्षा केंद्रे, उत्तरपत्रिकांची वाहतूक या सर्वांमध्ये पेपरफुटी, कॉपी, चोरी या सगळ्या गुन्ह्यांना भरपूर वाव आणि वाटा आहेत. प्रत्येक वर्षी नव्या प्रकारची कॉपीची प्रकरणं समोर येत असतात. पेपरफुटी आणि उत्तरपत्रिकांची होणारी हेळसांड, गुण मोजताना होणाऱ्या चुकाही समोर येतात. इतकेच नव्हे तर उत्तरपत्रिकेवर दिलेले गुण गुणपत्रिकेत भरताना डेटा एण्ट्रीमध्येही मोठ्या चुका होतात (किंवा केल्या जातात). हे सगळे दोष टाळण्यासाठी आॅनस्क्रीन मार्किंग किंवा आॅनस्क्रीन करेक्शन म्हटलं जाणारी ही पद्धती अवलंबायचं विद्यापीठानं ठरवलं.
पेपर तपासल्यावर दिलेले गुण एकत्रित अचूकपणे मोजले जाणं हा आजवरच्या तपासणीमधला अडथळ्याचा मोठा बिंदू होता. आॅनस्क्रीन तपासणीमध्ये प्रत्येक पानावर दिलेले गुणांचे आपोआप गणन होऊन त्यांची बेरीज होते. त्याचप्रमाणे तपासनिसाला प्रत्येक पान तपासल्याशिवाय पुढे जाताच येत नाही. जर एखादे पान रिकामे असल्यास त्यावर 'सीन' असा टॅग लावल्याशिवाय पुढे सरकता येत नाही. याचाच अर्थ सगळी उत्तरपत्रिका त्यांच्या डोळ्यासमोरून जाते किंवा तशी गेल्याशिवाय काम पूर्णच होत नाही. बहुतांश वेळेस तपासनीस उत्तरपत्रिकेत विद्यार्थ्याने एखादा मुद्दा अत्यंत चांगल्या पद्धतीने मांडला असेल तर त्याला अधोरेखित करून तेथे गुण देतात किंवा एखाद्या विद्यार्थ्याने विषयाला सोडून काहीतरी अतार्किक लिहिलं असेल तर तेथे प्रश्नचिन्ह काढता येतात. यामुळे त्यांच्यानंतर पेपर तपासणाऱ्या मॉडरेटरला तपासनिसाने या उत्तराला गुण जास्त किंवा कमी का दिले हे चटकन समजते. ही सगळी सोय आॅनस्क्रीन तपासणीमध्ये करण्यात आलेली आहे. इतकेच नव्हे तर एखाद्या चुकीच्या उत्तराजवळ योग्य उत्तर काय आहे हे लिहिण्याची सोयही कमेंटमध्ये केलेली असते. काही विद्यार्थी पुरेसा वेळ हाताशी असेल तर आवश्यक प्रश्नांपेक्षा एखाद-दुसरा प्रश्न जास्त सोडवतात. सोडवलेला प्रत्येक प्रश्न तपासनीसाला तपासावा लागतो आणि ज्या प्रश्नाला जास्त गुण आहेत त्याचेच तो गणन करतो. पण आॅनस्क्रीन पद्धतीत हे काम संगणक आपोआप करतो. त्यासाठी तपासनिसाला वेगळे काम करावे लागत नाही.
पूर्वीच्या काळी उत्तरपत्रिका तपासताना मॉडेल आन्सरशिट किंवा ज्याला आन्सर की म्हणतात. एखाद्या प्रश्नाचे अपेक्षित किंवा योग्य उत्तर काय आहे हे पाहण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आता ही मॉडेल आन्सरशिट आॅनस्क्रीन पेपर तपासणी सुरू असताना दुसऱ्या टॅबमध्ये उघडता येते. एकाचवेळेस एकाच स्क्रीनवर दोन टॅब उघडून उत्तराची समोरासमोर पडताळणी करता येऊ शकते. याचाच अर्थ हाताने तपासण्यामध्ये केल्या जाणाºया प्रक्रिया इथेही करता येतात. फक्त पेन आणि कागदाच्या जागी संगणकाची स्क्रीन आणि हातात माऊस ठेवायचा आहे. या पद्धतीमुळे स्टेशनरी, पोस्टेज आणि वाहतूक यांच्यासाठी लागणारा मोठा खर्च वाचवला जाऊ शकतो.
मात्र एखादा निर्णय चांगला असणं आणि त्याची अंमलबजावणी तितक्याच चांगल्या व कार्यक्षम पद्धतीने होणं या अगदी भिन्न गोष्टी आहेत. आॅनस्क्रीन तपासणीचा निर्णय मुंबई विद्यापीठाने आगामी शैक्षणिक वर्षासाठी घेण्याऐवजी चालू वर्षासाठी घेतला. तोही जानेवारी महिन्यामध्ये. जर हा निर्णय वर्षाच्या सुरुवातीसाठी घेतला गेला असता तर कदाचित प्रत्येक यंत्रणेच्या हाताशी काम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला असता. आपली विद्यापीठं आॅनस्क्रीन तपासणीची यंत्रणा स्वत: उभी करू शकत नसल्यामुळे त्यांना हे काम आउटसोर्स करावं लागणार होतं. त्यासाठी कायम पद्धतीनुसार टेंडर काढणं जरुरी होतं. जानेवारी महिन्यामध्ये निर्णय घेतल्यावरही या टेंडरचं काम फारच उशिरा म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये सुरू झालं. पहिल्या प्रयत्नामध्ये त्याला प्रतिसाद मिळाला नाही. दुसऱ्या प्रयत्नामध्ये एप्रिल महिन्याच्या अखेरीस त्याला प्रतिसाद मिळाला आणि स्कॅनिंग व इतर कामाची निविदा देण्यात आली. मे महिन्यामध्ये म्हणजे वास्तविक परीक्षांचे निकाल जाहीर होण्याची सुरुवात होते त्या महिन्यामध्ये उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग सुरू झाले आणि जून महिन्यामध्ये खऱ्या तपासणीला सुरुवात झाली. प्रत्येक कामाच्या अंमलबजावणीला लागलेला काही आठवड्यांचा उशीरच एकूण गोंधळाला कारणीभूत ठरला.
संगणकावर पेपर तपासणी करण्याची तपासनीसांची ही पहिलीच वेळ होती. मोठ्या टेबलावर समोर पेपरचे गठ्ठे, रंगीत पेन घेऊन समोर बसणाऱ्या तपासनीस, मॉडरेटरना आता यावर्षी संगणकासमोर बसून पेपर तपासावे लागले. अध्यापनाचा चांगला उत्तम अनुभव असणाºया ज्येष्ठ तपासनीसांसाठी हे आव्हान होतं. त्यामुळे हात दुखणं, सतत समोर बघून खुर्चीत बसून राहिल्यामुळे मानदुखी-पाठदुखीचा त्रास होणं, वाचायला त्रास होणं अशा तक्रारी आल्या. सर्व पेपर स्क्रीनवर तपासायचे असल्यामुळे डोळ्यांनाही त्रास होताच. यामुळे विद्यापीठाला अपेक्षित असलेल्या वेगाने पेपर तपासणं त्यांच्याकडून झालं नाही. तरुण आणि नवे तंत्रज्ञान सहज हाताळू शकणाऱ्यांना हे पेपर तपासणं तुलनेनं सोपं गेलं. रोज संगणक वापरणारे तरुण शिक्षक चटचट तपासत तीसेक उत्तरपत्रिका तपासत गेले. पण अनुभवी ज्येष्ठांना ते चांगलंच जड गेलं. अर्थात पेपर तपासणीचं हे तंत्र म्हणजे काही रॉकेट सायन्स मुळीच नाही. साधा स्मार्टफोन वापरणाऱ्या प्रत्येकाला जमू शकेल इतक्या साध्या पद्धतीचे हे तंत्र आहे. पण ते जमले नाही, यंदा गोंधळ झालाच.
मात्र येत्या काळात हे आॅनलाइन पेपर तपासणं आपल्याकडेही सुरू होईल आणि त्यातून अचूकता वाढेल, विद्यार्थ्यांनाच फायदा होईल अशी आशा आहे.