फॅशन म्हणून बाहेरचं खाताय?

By admin | Published: April 11, 2017 06:39 PM2017-04-11T18:39:28+5:302017-04-11T18:39:28+5:30

हल्ली बाहेर खाणं ही एक अतिशय कॉमन गोष्ट झालीय. तरुणांमध्ये तर ती जणू काही फॅशन म्हणूनच रुजते आहे.

Outside as fashion? | फॅशन म्हणून बाहेरचं खाताय?

फॅशन म्हणून बाहेरचं खाताय?

Next

हल्ली बाहेर खाणं ही एक अतिशय कॉमन गोष्ट झालीय. तरुणांमध्ये तर ती जणू काही फॅशन म्हणूनच रुजते आहे. मुलं बरेचदा घरून डबा वगैरे न नेता बाहेर गाडीवर, कॅन्टीनमध्ये खातात. होस्टेलवर राहणारी मुलं किंवा नोकरी करणारे, एकटे राहणारे यांच्या बाबतीत तर बोलायलाच नको.
बाहेर खाण्याची कारणं अनेक प्रकारची आहेत. कधी बदल म्हणून, कधी चैन म्हणून, कधी कोणत्या गोष्टीचं सेलिब्रेशन म्हणून तर कधी कधी नाईलाज म्हणून बाहेर खाल्लं जातं.
पूर्वी बाहेर जायची वेळ आली किंवा प्रवासाला जायचं असलं तर तहानलाडू, भूकलाडू असं सोबत करून घ्यायची पद्धत होती. बाहेर काही मिळत नसे. आता मात्र खाण्याचे पदार्थच काय तर प्यायचे पाणीही पैसे टाकले की कुठेही मिळतं. हे पदार्थ कुठेही सहज उपलब्ध असल्याने ते अगदी जातायेता घेऊन खाल्ले जातात.
जे पदार्थ म्हणजे वेफर्स, चिवडा, चॉकलेट्स इ. बंद पाकिटात मिळतात त्यांची थोडी तरी खात्री देता येते, म्हणजे त्यांची कॉलिटी, दर्जा यांची. पण जे पदार्थ ताजे बनवून विकले जातात त्यांचं मात्र कल्याण आहे. काही दिवसांपूर्वी अहमदाबादला पाणीपुरी मध्ये टॉयलेट क्लीनर वापरल्याची बातमी वाचून आपण हादरलोच होतो की!
बहुतेक वेळा बाहेर खायचं म्हंटल की पहिली पसंती चविष्ट, चमचमीत पदार्थांना असते. काहीतरी चटपटीत हवं असतं, मग अशा पदार्थांमध्ये वडापाव, समोसा, कचोरी, भेळ, पाणीपुरी, कच्छी दाबेली, मिसळ या आणि याशिवाय अनेक चायनिज पदार्थांचा समावेश होतो, म्हणजे नुडल्स, मन्चुरिअन वगैरे. शिवाय बेकरीचे अनेक पदार्थ केक, पेस्ट्री, पिझ्झा, बर्गर हेही असतात. खरी अडचण ही आहे की प्रत्येक व्यक्तीची खर्च करण्याची क्षमता वेगवेगळी असते आणि साहजिकच त्यामुळे मिळणाऱ्या पदार्थाचा दर्जाही !! 
तुम्ही रस्त्याच्या कडेला धूळ उडत असतानाही हे पदार्थ खाऊ शकता किंवा अगदी उत्तम, चकचकीत हॉटेल मध्ये बसूनही त्यांचा आस्वाद घेऊ शकता.
सर्वसामान्य जनता थोड्या पैशात हा आनंद विकत घेऊ बघते आणि फसते. अत्यंत हीन दर्जाचे बेसिक मटेरिअल वापरून केलेले हे पदार्थ आरोग्यासाठी घातक असतील यात काय शंका? अनेक प्रकारची पिठं, तळायचं तेल, त्यात वापरल्या जाणाऱ्या भाज्या, बटर, मसाले, कशा कशाचीही क्वालिटी बघायची कोणतीही यंत्रणा आपल्याकडे नसल्यामुळे आपण नक्की काय खातोय हे कळायला मार्गच नसतो, मग पाणी कोणतं वापरतायत वगैरे तर दूरची गोष्ट !! 
अतिशय व्यावसायिक विचार करून आणि फक्त जास्तीत जास्त फायदा मिळवण्याच्या हेतूने अनेक घातक पदार्थ मिसळणं, स्वच्छतेची अजिबात दखलही न घेणे , जी माणसं ते पदार्थ तयार करतात त्यांचं स्वास्थ्य कसं आहे , त्यांना काही आजार वगैरे नाहीत ना या कशाचाही विचार केला जात नाही हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने फारच भयावह आहे.
सहज जातायेता म्हणून आपण असले काहीही पदार्थ खतो आणि मग पोट बिघडणं , उलट्या, जुलाब होणं, इतकंच नाही तर पाण्यातून पसरणारे टायफॉईड सारखे आजार देखील होऊ शकतात .
क्वचित बदल म्हणून खाणार्यांना कदाचित हे दुष्परिणाम जाणवणार नाहीत पण जे नाईलाजाने रोज असं बाहेरचं अन्न खातायत त्यांना मात्र हे खूप त्रासदायक ठरू शकतं. त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी त्यातल्या त्यात चांगलं जे मिळेल, जरा कमी चवीचं पण घरगुती , आरोग्यपूर्ण असेल ते खायचा प्रयत्न करावा . घरी करून खाणं शक्य असेल तर उत्तमच.
मुलांना याचे वाईट परिणाम समजावून सांगून मुलं कमीतकमी बाहेर खातील याचा प्रयत्न करायला हवा. आयांनीही घरच्याघरी छान, चविष्ट पदार्थ करून खाऊ घालण्यासाठी प्रयत्नशील राहायला हवे. नाही का ?

- वैद्य राजश्री कुलकर्णी

rajashree.abhay@gmail.com
www.ayushree.com

 

Web Title: Outside as fashion?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.