कपड्यांवर घुबड...अॅनिमल प्रिण्टचा नवीन ट्रेण्ड
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2017 01:00 AM2017-11-30T01:00:00+5:302017-11-30T01:00:00+5:30
अॅनिमल प्रिण्टचा नवीन ट्रेण्ड. पोपट, मोर, चिमण्या, उंट, हत्ती सगळे मस्त बागडाहेत कपड्यांवर!
भक्ती सोमण
लेटेस्ट इन काय?
ट्रेण्डी उत्तर मिळतं, माहिती नाही का अॅनिमल प्रिण्ट?
गेल्या काही महिन्यांपासून मुलींच्या कपड्यांवर प्राणी-पक्ष्यांच्या प्रिंटची चलती आहे. त्यालाच म्हणतात अॅनिमल प्रिण्ट.
पैठणीवरचा मोर तर किती प्रसिद्ध.
पण काळ बदलला आता कॉटन, लिनन, बनारसी, कांजीवरम अशा प्रकारच्या साड्यांवर विविध प्रकारचे प्राणी-पक्षी, काही गणिती आकृत्या दिलखुलास बागडू लागल्यात.
त्यातही चलती आहे ती घुबडाची.
घुबड आपल्याकडे अशुभ मानलं जातं; पण फॅशनच्या दुनियेत आणि सध्या घुबड हे आकर्षण आहे. घुबड अर्थात ओल. तर या ओलचे कुर्ते, टॉप्स हे हमखास बघायला मिळतात. त्यात गळ्यातले, कानातलेही घुबड पेडण्टचे दिसतात. आणि अनेकजणी त्यांना सन्मानाने गळ्यात मिरवताना दिसतात.
साड्यांवर मात्र घुबडापेक्षा पोपट, बेबी हत्ती, बेबी उंट, जिराफ, हरीण असे प्राणी बघायला मिळतात. पिवळ्या, हिरव्या, गुलाबी अशा काही रंगांच्या साड्यांवर हे प्रिंट फारच उठून दिसतात. ते काम हाताने केलेले असल्याने त्याच्या किमतीही जास्त असतात. मात्र स्टाइल स्टेटमेंट म्हणून या प्रिण्टच्या साड्या नेसण्याकडे मुलींचा कल दिसतो.
प्रसिद्ध फॅशन डिझाईनर मसाबा गुप्ताचे बहुतांश कलेक्शन याच धर्तीवर आधारलेले आहे. आणि त्याची बरीच चर्चाही फॅशन जगात होताना दिसते.
साड्याच नाही तर कुर्ते, जिन्सवरचे टॉप यांवर आता हत्ती, चिमण्या, घोडे, घुबड, कलिंगड असे प्रिण्ट हमखास बघायला मिळतात. ‘तुझं माझं ब्रेकअप’ या सिरिअलमधील नायिका वापरते तसे जॉमेट्रिकल प्रिण्टचे कुर्तेही ट्रेण्डी होताना दिसत आहेत.
अॅनिमल प्रिण्टच्या ट्रेण्डबाबत क्वीन आॅफ हर्ट्सच्या दीपा मेहता सांगतात, पूर्वीपासूनच आपल्याकडे अशा प्रकारच्या कपड्यांचे प्रिण्ट आहेतच. लोकांना दैनंदिन आयुष्यात निसर्गाच्या जवळ जायला आवडतं. त्यामुळे असे पॅटर्नही त्यांना आपलेसे वाटतात. म्हणून तर पानं, फुलं, प्राणी अशा प्रकारचे प्रिण्ट लोकप्रिय होतात.
(भक्ती लोकमतच्या मुंबई आवृत्तीत उपसंपादक आहे.)