कोणालाच कोणाशी कनेक्ट करता येत नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 06:24 AM2020-01-02T06:24:00+5:302020-01-02T06:25:02+5:30
‘ऑक्सिजन’चा एक खास अंक-2020- विशीतल्या मुला-मुलींच्या आयुष्यातल्या स्वप्नांचा, ताण-तणावांचा, आनंद-दु:खाचा आणि लव्ह-लाइफमधल्या गुंत्यांचा शोध.
केशव मस्के
1. आत्ता माझ्या आयुष्यातली सर्वात भारी गोष्ट/घटना/व्यक्ती/विषय काय आहे? का?
आत्ता माझ्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फीटनेस, ध्यान आणि आरोग्य! वर्षभरापूर्वी मला डायबिटीज झाला. अठ्ठाविसाव्या वर्षी इंजिनिअरिंग करीत असताना हे प्रकरण उद्भवल्यामुळे डिप्रेशनमध्ये गेलो; पण ध्यानधारणेचा मला खूप उपयोग झाला. आरोग्याचं महत्त्व कळलं, ही भारी गोष्ट!
2. आत्ता माझ्या आयुष्यात मला सगळ्यात जास्त स्ट्रेस कशाचा आहे? का?
सगळ्यात जास्त स्ट्रेस आहे एका मुलीला विसरण्याचा! त्यामुळेच माझी शुगर वाढली! माझं पूर्ण आयुष्य आण स्वभावही बदलून गेला.
3. खूप मित्र-मैत्रिणींच्या दोस्तीमुळे मी मजेत, आनंदी आहे? की खूप मित्र-मैत्रिणी असूनही मी मनातून एकटा/एकटी आहे?
मला एकच जिवाभावाचा मित्र आहे, त्याच्याकडे मन मोकळं करतो; पण एकटं वाटतंच मनातून!
4. कोणाची जनरेशन जास्त गंडलेली आहे? माझी की माझ्या आई-वडिलांची?
कदाचित दोन्ही. माझ्या लव्ह-लाइफबद्दल आईला माहिती होतं, पण मला काय म्हणायचंय, मला काय वाटतं हे समजून न घेताच तिने सगळं झिडकारलं, मलाही माझी बाजू नीट मांडता आली नाही असं आता वाटतं. सगळा घोळच झाला. कोणालाच कोणाशी कनेक्ट करता येत नाही.
5. आमच्या जनरेशनचं ‘लव्ह-लाइफ’ हा आमच्या आयुष्यातला ‘दिलासा’ आहे की कॉम्प्लिकेटेड वैताग देणारा स्ट्रेस?
आमचं लव्ह-लाइफ हा एक मोठ्ठा प्रश्न होऊन बसला आहे. आई-वडील जरा समजुतीने घेतील तर थोडं सोपं होऊ शकेल. माझ्यासारखे अनेकजण आपल्या मनातलं नीट बोलू शकत नाहीत. त्याचा सतत त्रास होत राहतो. कोणाला सांगणार?
6. पुढच्या आयुष्यात काय करायचं हे माझं नक्की ठरलंय का? काय ठरलंय?
काहीही ठरलेलं नाही. जॉब लागेलच. तो शोधावा लागेल; पण आयुष्य छान जगू या असं माझं स्वप्न मात्र आहे. बघू या, जमतं का ते!