‘हृदयात वाजे समथिंग’ ही भंकस अंधश्रद्धा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 06:30 AM2020-01-02T06:30:00+5:302020-01-02T06:30:02+5:30
‘ऑक्सिजन’चा एक खास अंक-2020- विशीतल्या मुला-मुलींच्या आयुष्यातल्या स्वप्नांचा, ताण-तणावांचा, आनंद-दु:खाचा आणि लव्ह-लाइफमधल्या गुंत्यांचा शोध.
- रामप्रसाद गायकवाड, अंबाजोगाई, जि. बीड
1. आत्ता माझ्या आयुष्यातली सर्वात भारी गोष्ट/घटना/व्यक्ती/विषय काय आहे? का?
माझे वडील. जगात सर्व काही विसरलं तरी चालेल, पण कधी बाप विसरायचा नाही. ज्याच्याशी बोलण्याने, ज्याच्या असण्याने जी सकारात्मक ऊर्जा मिळते ती आपल्या आयुष्यातील सर्व नकारात्मकतेला पुरून उरते.
2. आत्ता माझ्या आयुष्यात मला सगळ्यात जास्त स्ट्रेस कशाचा आहे? का?
आपण उच्चविद्याविभूषित आहोत. ठरवलेलं ध्येय गाठण्यात आपण सक्षम ठरू का? - हा प्रश्नच मुळात स्ट्रेस वाढवतो. घरच्यांच्या व समाजाच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षांचे ओझे नक्की झेपेल का नाही? - या प्रश्नाचे ओझे वाहण्यातच माझी पिढी खचलेली आहे. त्याला मीसुद्धा अपवाद नाही.
3. खूप मित्र-मैत्रिणींच्या दोस्तीमुळे मी मजेत, आनंदी आहे? की खूप मित्र-मैत्रिणी असूनही मी मनातून एकटा/एकटी आहे?
हल्ली जास्तीत जास्त मित्र-मैत्रिणी असणे ही एक अभिमानाची, प्रतिष्ठेची गोष्ट, गरज बनत चाललेली आहे; परंतु या मैत्रीला स्वार्थ नावाच्या विषाणूचा संसर्ग झाल्यानेच की काय, मित्र-मैत्रिणीच्या गराडय़ात असूनसुद्धा मी मनातून मात्र एकटाच आहे.
4. कोणाची जनरेशन जास्त गंडलेली आहे? माझी की माझ्या आई-वडिलांची? र्
आमचीच जनरेशन गंडलेली आहे. आम्हाला आई-वडिलांनी कोणत्याच गोष्टीची कमतरता भासू दिलेली नाही. त्यामुळे आमच्या जनरेशनला संघर्ष, धरपड, चिकाटी ही मूल्ये ठाऊकच नाहीत. दोन्ही पिढय़ांमध्ये इमोशनल बॉण्ड नाही, त्यामुळेच आम्हाला आई-वडिलांशी हवं तेवढं कनेक्ट होता आलेलं नाही.
5. आमच्या जनरेशनचं ‘लव्ह-लाइफ’ हा आमच्या आयुष्यातला ‘दिलासा’ आहे की कॉम्प्लिकेटेड वैताग देणारा स्ट्रेस?
लव्ह-लाइफ सुरुवातीला दिलासा देणारंच असतं; पण काही काळाने तो अत्यंत कॉम्प्लिकेटेड स्ट्रेस होऊन बसतो. ‘हृदयात वाजे समथिंग’वालं प्रेम ही एक अंधश्रद्धा आहे.
6. पुढच्या आयुष्यात काय करायचं हे माझं नक्की ठरलंय का? काय ठरलंय?
नक्की काय ठरलंय ते सांगता येणार नाही; परंतु जे करू ते मात्र अत्यंत मनापासून, त्यात स्वतर्ला झोकून देऊन करायचं ते मात्र नक्कीच ठरवलंय.
7. भारताविषयी मला अत्यंत अभिमान वाटतो अशी गोष्ट कोणती? अत्यंत लाज वाटते, संताप येतो अशी गोष्ट कोणती?
वैविध्यपूर्ण संस्कृती, एकता आणि त्यातून निर्माण झालेल्या एकात्मतेचा अभिमान आहे. अशा संपन्न देशात धर्म-जात, भाषा, प्रांत यावरून दंगे पेटवणार्या, कर्मकांडात अडकलेल्या माणसांची मला तीव्र चीड आहे.
------------------------------------------------