ना मागची, ना पुढची; कोणतीच पिढी गंडलेली नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 06:31 AM2020-01-02T06:31:00+5:302020-01-02T06:35:03+5:30
‘ऑक्सिजन’चा एक खास अंक-2020- विशीतल्या मुला-मुलींच्या आयुष्यातल्या स्वप्नांचा, ताण-तणावांचा, आनंद-दु:खाचा आणि लव्ह-लाइफमधल्या गुंत्यांचा शोध.
प्रगती जवळकर
1. आत्ता माझ्या आयुष्यातली सर्वात भारी गोष्ट/घटना/व्यक्ती/विषय काय आहे? का?
शेवटच्या वर्षाला माझी कॅम्पस प्लेसमेंट एल अॅण्ड टी कंपनीत झाली, ही माझ्या आयुष्यातली ताजी भारी गोष्ट. माझ्या आई-वडिलांनी मला शिकण्यासाठी स्वातंत्र्य दिलं, त्यामुळे मी माझ्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करते आहे. उत्तम शिक्षण घेऊन कोणावरही अवलंबून न राहता स्वावलंबी होत आहे, ही माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे.
2. आत्ता माझ्या आयुष्यात मला सगळ्यात जास्त स्ट्रेस कशाचा आहे? का?
सामान्य मुलीला असतात ते सगळे स्ट्रेस मला आहेत. रोज कॉलेजसाठी बसचा दोन तास प्रवास करताना काही वेळेस बस उशिरा येण्यापासून ते बसायला जागा न मिळणे, कधी मित्र- मैत्रिणींशी अगदी क्षुल्लक कारणावरून भांडण होणे, घरच्यांना पुरेसा वेळ न देऊ शकणे. यादी खूप मोठी आहे. देशात जे चाललंय त्याचाही मला स्ट्रेस येतो. काय करू?
3. खूप मित्र-मैत्रिणींच्या दोस्तीमुळे मी मजेत, आनंदी आहे? की खूप मित्र-मैत्रिणी असूनही मी मनातून एकटा/एकटी आहे?
मला मोजकेच मित्र-मैत्रिणी आहेत; पण जे काही 2-4 आहेत, त्यांच्याशी अगदी छान मैत्री आहे. तशी मी मितभाषी असल्याने लगेच अनोळखी लोकांत मिसळता येत नाही. काही वेळेस खूप गर्दीत असूनही एकटेपणाची जाणीव होतेच.
4. कोणाची जनरेशन जास्त गंडलेली आहे? माझी की माझ्या आई-वडिलांची?
कोणीही गंडलेलं नाही. दोन्ही पिढय़ा आपापल्या जागी अगदी योग्य आहेत. बदल ही काळाची गरज आहे, काळानुसार पिढय़ांमध्ये बदल होणारच. आपण तो योग्य प्रकारे स्वीकारला पाहिजे.
5. आमच्या जनरेशनचं ‘लव्ह-लाइफ’ हा आमच्या आयुष्यातला ‘दिलासा’ आहे की कॉम्प्लिकेटेड वैताग देणारा स्ट्रेस?
तुम्हाला चांगलं माणूस बनवतं, चांगलं घडवतं तेच खरं प्रेम. आमच्या पिढीने प्रेम आणि आकर्षण यातील फरक समजून घेतला तर बरं होईल. आणि आई-वडिलांनीही जरा समजून घेतलं, तर आमच्या पिढीचं कॉम्प्लिकेटेड लव्ह-लाईफ जरा सोपं होईल.
6. पुढच्या आयुष्यात काय करायचं हे माझं नक्की ठरलंय का? काय ठरलंय?
आपल्याला मोठा मुलगा का नाही याची खंत माझ्या आई-वडिलांना कधीच असू नये, हे माझं स्वप्न आहे. कुटुंबातील एक मोठी मुलगी म्हणून मला संपूर्ण जबाबदारी योग्य रीतीने पार पाडायची आहे.