सना मिर का ठरतेय पाकिस्तान क्रिकेट ची खरी गेम चेंजर ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 06:10 AM2019-05-23T06:10:00+5:302019-05-23T06:10:02+5:30
‘वी हॅव शाहीद आफ्रिदी बट थॅँक गॉड वी हॅव सना मिर !’ असं एक ट्विट अलीकडेच पाकिस्तानात प्रचंड गाजलं. त्याचं कारण असं की, मुलींना क्रिकेट नाकारणार्या जगात एक सना मिर आपलं ‘असणं’ सिद्ध करतेय..
- निशांत महाजन
‘वी हॅव शाहीद आफ्रिदी बट थॅँक गॉड वी हॅव सना मिर !’
असं एक ट्विट अलीकडेच पाकिस्तानात प्रचंड गाजलं. त्या अर्थाच्या अनेक टिप्पण्या सोशल मीडियात गाजल्या. बडय़ा पाकिस्तानी वृत्तपत्रात लेख लिहिले गेले. व्यंगचित्र प्रसिद्ध झाली आणि सार्या देशानं आपल्या या लेकीचं कौतुक केलं. अर्थात तिचं कौतुक न करणार्यांची संख्या मोठी आहेच, मात्र तिला ना त्याची पूर्वी फिकीर होती ना, आता आहे.
सना मिर.
तिचं नाव.
सना पाकिस्तानी क्रिकेटपटू आहे. फिरकीपटू आहे. आजवरच्या महिला एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातली सर्वात यशस्वी अर्थात मोस्ट सक्सेसफुल स्पिनर म्हणून आयसीसीने तिचा गौरव केला आहे. 118 एकदिवसीय सामन्यात 147 बळी घेण्याचा विक्रम तिच्या नावावर आहे. सना मिरच्या या यशानं पाकिस्तान महिला क्रिकेटला नवी झळाळी लाभली आहे. औरते क्रिकेट नहीं खेल सकती असं मानणार्या वृत्तींना ते चोख उत्तर आहे की, आंतरराष्ट्रीय स्तरावरही महिला क्रिकेटर असं निर्विवाद यश मिळवू शकतात.
सनाच्या या विक्रमाची चर्चा झाली त्याचं आणखी एक कारण म्हणजे त्यापूर्वी काही दिवस आधी प्रसिद्ध झालेलं शाहीद आफ्रिदीचं आत्मचरित्र. गेम चेंजर. त्या पुस्तकात शाहीद आफ्रिदी म्हणतो की, माझ्यासाठी माझ्या लेकी जीव की प्राण आहेत. त्यांना आयुष्यात आपली स्वपA पूर्ण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांना खेळातही करिअर करावंसं वाटलं तर त्यांनी करावं. मात्र इनडोअर खेळात. चार भिंतींच्या आत. त्यांनी क्रिकेट खेळलेलं मला चालणार नाही, माझी परवानगी नाही. स्रीवाद्यांना काय म्हणायचं ते म्हणू देत; पण माझ्या मुलींनी क्रिकेट खेळलेलं मला आवडणार नाही !’
यावरून बराच वाद झाला. आफ्रिदीसारखा खेळाडू, जगभरात लोकांचा आवडता. जगभर फिरला. विविध संस्कृती त्यानं पाहिल्या. खेळानं त्याला खिलाडूवृत्तीही दिली, तरी तो म्हणतो की, माझ्या मुलींनी क्रिकेट खेळू नये. त्याच्यावर टीकाही झाली. आणि मुलींना चार भिंतीत कोंडून घालणार्या, त्यांच्या वतीने निर्णय घेण्याच्या वृत्तीचा निषेधही करण्यात आला.
आणि त्याचदरम्यान सना मिरला सक्सेसफुल स्पिनरचा गौरव लाभला. आणि मुलींच्या यशाची, क्रिकेटची ही यशोगाथा म्हणून चर्चा सुरू झाली की आफ्रिदीच्या जुनाट मानसिकतेला सना मिर हेच उत्तर आहे. मुली क्रिकेट खेळतात, उत्तम खेळतात आणि देशाचं नाव मोठं करतात याचं हे उदाहरण आहे.
अर्थात अशी ‘मिसाल’ बनून राहणं हे सोपं नाही. सना मिरसाठीही नव्हतंच. सनाचा जन्म पाकिस्तानातल्या गिलगिट बल्टीस्तानमधला. हा सगळा भाग मागास. त्यात तिचे वडील सैन्यात. त्यांच्या सतत बदल्या होत. सनानं शिक्षण त्यातही सुरूच ठेवलं. संख्याशास्र आणि अर्थशास्नतली ती पदवीधर आहे. आणि त्यात तिला क्रिकेटची आवड होती.
डॉन वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सना सांगते, ‘वडील सैन्यात. सतत बदल्या होत. बदली झाली की नवीन ठिकाणी मित्रमैत्रिणी मिळवावे लागत. ते त्यांच्यात खेळायला घेत नसत. त्यातही क्रिकेट तर नाहीच. गल्लीत क्रिकेट खेळणारी मुलंही म्हणत, लडकी है, कैसे खेलेगी. मग तेव्हापासून स्वतर्ला सिद्ध करण्याची सवय लागली. मी क्रिकेट खेळत होते. गल्लीत खेळायचे, मग संघात खेळायला लागले. माझ्यासह माझं देशासाठी खेळण्याचं स्वपAही मोठं झालं. आणि एक प्रश्नही सतत मागे येत होताच, मुलींना काय क्रिकेट खेळता येतं का?
त्याचं उत्तर बोलून देण्यापेक्षा खेळून देणंच जास्त रास्त होतं. मी खेळत राहिले आणि त्या प्रवासात मी इथवर येईल, असं मात्र अजिबात वाटलं नव्हतं!’
जे तिला वाटलं नव्हतं, ते अन्य कुणालाच वाटण्याचा काही संबंधच नव्हता.
एकमात्र नक्की, बांधून घालणार्या वृत्ती शक्तिशाली असल्या तरी आपली वाट शोधणार्या सना मिरही असतात, याचं हे उदाहरण आहे.