रडे पाकिस्तानी खेळाडू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 07:06 PM2019-03-12T19:06:50+5:302019-03-12T19:09:50+5:30
पाकिस्तान आपला रडीचा डाव कधी सोडणार आहे? मैदानात आणि मैदानाबाहेरही रडारड करणं त्यांनी कधीच थांबवलेलं नाही. आताही आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात भारतीय खेळाडूंनी आर्मीच्या कॅप घातल्यामुळे त्यांचा तीळपापड झाला. भारतीय संघावर बंदी घालण्याची मागणी त्यांनी आयसीसीकडे केली, पण आयसीसीनं त्यांचेच दात त्यांच्या घशात घातले!..
- सोहम गायकवाड
मैदानावर असो, की मैदानाबाहेर, रडीचा डाव खेळणं पाकिस्ताननं कधीच सोडलं नाही.
कुठेही काहीही खुट्ट झालं की लगेच भारतावर आरोप करायचे आणि रडारड करायचं हे त्यांनी कधीच सोडलं नाही.
हा रडीचा डाव त्यांनी परत एकदा खेळला, तो क्रिकेटच्या मैदानावर.
काश्मीरात, भारतात दहशतवादी घुसवून, कारगीलसारख्या छुप्या कारवाया करून हा देश अशांत कसा राहील याचाच प्रयत्न पाकिस्ताननं कायम केला.
आता भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यात वनडे क्रिकेट सिरीज सुरू आहे. खरं तर यात नाक खुपसायची त्यांची काहीच गरज नव्हती. तरीही त्यांनी नाक खुपसलंच. आणि कारण काय शोधून काढलं तर भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यात रांची येथे झालेल्या तिसऱ्या वन डेमध्ये भारतीय क्रिकेटपटूंनी आर्मीच्या कॅप घातल्या, त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करा!
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० भारतीय जवान ठार झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी, त्यांच्याप्रति आदर दाखवण्यासाठी आणि सैनिक तसेच त्यांच्या कुटुंबियांसाठी मदतनिधी गोळा करण्यासाठी भारतीय संघानं आॅस्ट्रेलियासोबतच्या तिसºया वन डे सामन्यात आर्मीच्या कॅप घातल्या होत्या.
भारतीय खेळाडूंनी आर्मीच्या कॅप घातल्याच कशाला, हा त्यांचा प्रमुख आक्षेप!
भारतीय खेळाडूंनी आर्मीच्या कॅप घालून खेळात ‘राजकारण’ आणलं, त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई झालीच पाहिजे, विराट कोहली आणि टीमवर बंदी घातलीच पाहिजे, नाहीतर आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशा डरकाळ्याही त्यांनी फोडल्या. भारतीय खेळाडूंवर बंदी आणावी या मागणीसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं थेट आयसीसीकडे अधिकृत तक्रारही केली. खुद्द पाकिस्तानचे माहिती मंत्री फवाद चौधरी यांनीही आयसीसीकडे त्यासाठी गाºहाणं मांडलं. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन अहसान मनीही त्यासाठी हटून बसले.
अशा मागणीसाठी त्यांच्याकडे दोन प्रमुख कारणं, खरं तर ‘आधार’ होते, तेही पाकिस्तानचेच.
पाच वर्षांपूर्वी पाकिस्तानी क्रिकेटर मोईन अलीनं ‘सेव्ह गाझा’ आणि ‘फ्री पॅलेस्टाईन’ लिहिलेले रिस्ट बॅण्ड घालून सामना खेळला होता, तर पाकिस्तानी पॉप सिंगर जुनेद जमशेदचे छायाचित्र असलेला टी शर्ट घालून इमरान ताहीर मैदानात आला होता. त्यांचे हे कृत्य अवैध ठरवून आयसीसीनं त्यांच्यावर कारवाई केली होती.
आमच्यावर कारवाई केली, मग भारतीय खेळाडूंवर का नको, यामुळे चिडलेल्या पाकिस्ताननं भारतीय खेळाडूंवर बंदीची मागणी केली. पण त्याआधी भारतीय खेळाडूंनी असं का केलं, त्यासंदर्भाची परवानगी त्यांनी आयसीसीकडून घेतली होती की नाही, याची चौकशी, माहिती घेण्याचीही तसदी त्यांनी घेतली नाही आणि परत एकदा पाकिस्तान तोंडावर आपटलं.
यासंदर्भात आता खुद्द आयसीसीनंच खुलासा केला आहे, की आर्मीच्या टोप्या घालून सामना खेळण्याआधी बीसीसीआयनं आमच्याकडून तशी अधिकृत परवानगी मागितली होती आणि आम्ही ती त्यांना दिली होती, त्यामुळे भारतीय खेळाडूंवर बंदी घालण्याचा प्रश्नच नाही. त्यांनी काही चुकीचं केलेलंही नाही!
पाकिस्तानचे दात आता आयसीसीनंच घशात घातले असले, त्यांचं हसं झालं असलं तरी त्यातून ते काही शिकतील, सुधारतील याची सुतराम शक्यता नाही.
मुळात पाकिस्ताननं जे काही केलं, तेच ‘खेळातलं राजकारण’ होतं. असं राजकारण करण्यापेक्षा पाकिस्ताननं खेळावरच लक्ष केंद्रित केलं तर नक्कीच बरं..
(छायाचित्र आंतरजालावरुन साभार.)