मियांबिवी राजी खर्चा करे पापाजी
By Admin | Published: February 25, 2016 09:30 PM2016-02-25T21:30:09+5:302016-02-25T21:30:09+5:30
आपल्या लग्नात खर्च करणं हे आईवडिलांचं कर्तव्यच आहे, असं मुलांना वाटतं आणि तसं ते पालकांनाही वाटतं, म्हणून ते साऱ्या शक्तिनिशी कार्य सिद्धीस नेतात.
आपल्या लग्नात खर्च करणं हे
आईवडिलांचं कर्तव्यच आहे,
असं मुलांना वाटतं आणि तसं ते पालकांनाही वाटतं,
म्हणून ते साऱ्या शक्तिनिशी कार्य सिद्धीस नेतात.
आणि त्यालाच आपली प्रतिष्ठा समजतात.
‘शोशाईन’ करण्याचा लग्न हा एक नवा ट्रेण्ड.
बदल पोकळीत घडत नसतात, ते घडवावे तरी लागतात नाहीतर काळाच्या रेट्यात समाजात काही बदल होत जातात हे टिपिकल वाक्य आपण नेहमी वाचतो-ऐकतो.
मात्र हुंड्याबद्दलची सारी पत्रं वाचताना या वाक्याचा एक वेगळाच अर्थ, एक वेगळंच चित्र समोर आलं.
आणि त्या चित्राचं नाव आहे बदलती सामाजिक परिस्थिती आणि मनोवृत्ती!
आणि हे दोन्ही बदलत असल्यानं हुंड्याचं देणं-घेणंच बदलून गेलं. आणि ते इतकं बदललं की, हुंडा देण्याघेण्याविषयी तक्रार करणाराच उरू नये. दोन्हीकडच्या बाजू वीन वीन सिच्युएशन एन्जॉय करत उलट आपण किती ‘दिलं-घेतलं’ याच्या बढाया मारतील. सगळीच स्वेच्छा. सक्ती अशी नाहीच. (लग्नानंतर माहेराहून पैसे-वस्तू आण म्हणून होणारा छळ ही वेगळी गोष्ट. इथं चर्चा फक्त लग्न ठरताना होणाऱ्या देवघेवीची!)
या पत्रात ही दोन्ही बाजूची स्वेच्छा फार ठळकपणे दिसते.
म्हणजे काय तर एक-दोन किंवा फार तर तीन मुलं असण्याचा हा जमाना. तुलनेनं मध्यमवर्गीयांच्या हातात पैसा बऱ्यापैकी. खर्च करण्याची ऐपत. त्यात टीव्ही-सिनेमाचा प्रभाव जास्त. त्यामुळे सिनेस्टाइल वेडिंगची इच्छा मनस्वी. बाकी संगीतबिंगित नाही जमलं तरी मेहंदीचा प्रोग्रॅम मस्टच. म्हणजे त्यासाठी मेहंदीवाली आली. पुढे पार्लरवाली. मेकअपचा खर्च सर्वात जास्त. लग्नाच्या साड्या, लग्नानंतर घालायच्या ड्रेसेसचं शॉपिंग, दागिने, रोज घालायचे दागिने, चपला-बूट, पर्स, असा अनेक खर्च. आणि त्यावर तोडीस तोड कार्यालयं. डेकोरेशन, लग्नाचं जेवण किमान तीन कोर्सचं, फोटो-व्हिडीओ शूटिंग हे सारं जितकं फिल्मी पद्धतीनं करता येईल तितकं करण्यावर आता दोन्ही बाजूनं भर असतो. लग्न झाल्यावर रिसेप्शन वेगळं. त्याचा खर्च वेगळा.
आणि मुख्य म्हणजे हे सगळं मुलगा-मुलगी दोघांना हवं असतं. त्यांचं म्हणणं एकच, ‘लग्न एकदाच होतं, हौस करून घ्या..’
आणि त्या हौसेपायी नुस्ता खर्चच करायची इच्छा नाही तर आपण हा खर्च करू शकतो हे इतरांना ‘दाखवण्याची’ चढाओढही दिसते आहे. ‘लोकांसाठी ‘यादगार’ ठरलं पाहिजे आपलं लग्न अशी एक जिद्द(?) सगळ्यांमध्ये सध्या दिसते !’ असं या पत्रात आवर्जून नोंदवलेलं दिसतं.
हे सारं नवीन एकीकडे असताना दुसरीकडे लग्नातले मानपान, घेणं-देणं, बॅण्ड, वराती, विहिणींचे मानपान, साड्या, पायघड्या, व्याह्यांच्या फेट्यापासून कपड्यांपर्यंतचे आणि गळ्यातल्या नोटांच्या हारापर्यंतचे खर्च हे सारं शिस्तशीर होतंच. थोडंथोडकं नाही मध्यमवर्गीय लग्न किमान दहा लाखांच्या खर्चाचा चेहरा पाहतं!
मुख्य म्हणजे हे सारं करायला वधूपित्याची ना नाही, कारण त्यालाही त्याच्या मुलीच्या सुखातच आपलं सुख वाटतं. आणि दुसरीकडे ‘थाटात केलं लेकीचं लग्न’ हा त्याच्याही समाजप्रतिष्ठेचा विषय होतो.. असतोच!
त्यामुळेच यासगळ्यात सक्ती कुणाची कुणावर नाही, सगळेच खूश!
फक्त..
ज्यांची हे सारं करण्याची ऐपत नाही, त्यांच्या मुलींची लग्न रखडतात. लांबतात. त्यासाठी कर्ज काढून ही सारी मोठायकी करावी लागते. आणि त्यांच्या मुलीही तुम्हीच काही जगावेगळं करत नाही, मुलीच्या बापानं एवढं करायचं असतं हे सुनावायलाही कमी करत नाहीत.
एक नक्की, हाती आलेला पैसा. सेलिब्रेशनची नवी चटक, जुन्या समाजप्रतिष्ठांचे घट्ट होत असलेले पाश, आणि मुलांच्या मनासारखं घेण्याची नवीन रीत यासाऱ्यामुळे ‘हुंडा’ आपलं रंगरूपच बदलतो आहे.
पूर्वीसारखी वरदक्षिणेसाठी हटून बसण्याची भानगड नाही. सगळं राजीखुशीनं ठरतं आणि ज्यात साऱ्यांचीच खुशी, त्यात कुणी कुणाला चूक ठरवायचा प्रश्नच नाही, अशी सोय!
निदान ही पत्रं तरी हेच सांगतात आणि उलटा सवाल करतात की, जनरीतच बदलली, त्याला शोषण कसं म्हणता?
आता या प्रश्नाचं उत्तर मात्र ज्यानं त्यानं स्वत:ला द्यायचं.. द्यायला हवं!
कारण वरकरणी हुंडा दिसत नसला तरी तो आहेच, आणि जास्त वाईट हे की हुंड्याला ‘नाही’ म्हणायला मुली तयार नाहीत, उलट ‘त्यांना’(म्हणजे नवऱ्याकडच्यांना) भरभरून देणं, ही सासरी आपला हुकूम चालवायची एक संधी अशी एक नवी वृत्ती मुलींच्यातही जन्माला आली आहे. असं ही पत्रं वाचताना सतत जाणवत राहतं.
‘देण्याघेण्या’चे
५
नवे
व्यवहार
या पत्रांच्या आणि ई-मेल्सच्या ढिगात एकूण पाच गोष्टी सापडतात, ज्यात नव्या लग्नव्यवस्थेत देण्याघेण्यानं आपलं रूप बदललेलं दिसतं. आणि त्या देण्याघेण्याला आताशा ‘देणारे आणि घेणारेही’ हुंडा म्हणत नाहीत.
१) शहरी मुलगा
विकत घेणे
शहरी, शक्यतो सरकारी नोकरीवाला, निदान खाजगी परमनण्ट नोकरीवाला जावई हवा ही खेड्यापाड्यातल्या सासरेबुवांची नवी महत्त्वाकांक्षा कारण त्यांच्या मुलींना खेड्यापाड्यातला शेती करणारा नवरा नकोय. आणि वडिलांना ते मान्य आहे कारण लेकीच्या वाट्याला खेड्यातले कष्ट, शेतीतले दुष्काळ नको असं त्यांचंही मत आहेच. त्यामुळे मग चार पैसे जास्त मोजून, कर्ज काढून, शहरी नवरा ते लेकीसाठी हुडकून काढतात. तो हुडकला की त्याला तो मागेल तेवढा हुंडा द्यावाच लागेल हे मान्यही असतं आणि तो देण्याची तयारीही असते.
२) टेम्परवारी
ते पर्मनंट
अनेकदा शहरी नोकरीवाला मुलगा तर सापडतो; पण तो ‘टेम्पररी’(पत्रांच्या भाषेत टेम्परवारी) असतो. मग त्याची नोकरी कायम करण्याची जबाबदारी वधूपिता स्वीकारतो. मुलगा, मुलाचे आईबाप तसं सांगतातही. की पगार तुमचीच मुलगी खाणार, तिचं सुख पहा. नोकरी परमनण्ट करण्यासाठी ती संस्था दहा लाख मागते तेवढे तुम्ही भरा. लग्न साधंच करून द्या. वधूपिता तयार होतो.
पण म्हणून लग्न साधं होत नाही, कारण लेकीची हौस. यात कुणी कुणाला हुंडा दिल्याचंही दिसत नाही.
३)रेडिमेड संसार
शहरात मुलगी राहणार, मग तिला संसार हवा. पुन्हा ती स्वतंत्र राहणार. राजाराणीचा संसार. म्हणून मग हुंडा न देता तिला वाटीचमच्यापासून, साबण ठेवायच्या डबीपासून एसी, वॉशिंग मशीन, एलइडी टीव्हीपर्यंत सारं काही वधूपिता देतो. हुंडा नव्हे हा मुलीला खुशीनं दिलं म्हणतात. मुलगीही खूश कारण वडिलांनी जे दिलं ते तिला हवंच असतं!
४) हनिमून
बाकी नाही नको, लग्न साधंच करा पण यांना देशाबाहेर कुठं फिरायला पाठवा. तुमचीच लेक फिरून येईल असं सांगणारे मुलाचे आईबाप हल्ली सर्रास. मुलालाही ते पटतं. मुलीच्या वडिलांनाही वाटतं मुलीलाच तर द्यायचंय. देऊ. मुलगीही म्हणते हुंडा कुठंय हा, आपल्यालाच जायचंय. म्हणून मग माथेरानची ऐपत असलेली जोडपी थेट मॉरिशसला हनिमूनला जातात.
५) एका दिवसाची ऐश
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली स्वप्न पूर्ण करण्याचं एक माध्यम म्हणून लग्नाकडे पाहणारी, आणि त्यादिवसापुरतं ‘सेलिब्रिटी’ होऊ पाहणारे मुलंमुली. त्यासाठी आपल्या ‘घरच्यांनी’ किती पैसा खर्च करावा, याचीही काही खेदखंत ते बाळगत नाहीत. उलट तो खर्च आपला हक्कच आहे असं ते समजतात.