पापडी ते पोझनान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 09:43 IST2018-03-01T09:43:11+5:302018-03-01T09:43:11+5:30
स्पर्धा परीक्षांच्या ‘तयारीत’ मीही होतो, मात्र सहावेळा अपयश आलं. एका बाजूला मी माझ्या विषयातही शिक्षण सुरूच ठेवलं. आता पीएच.डी.साठी पोलंडला आलोय.. त्या प्रवासाची गोष्ट...

पापडी ते पोझनान
- अंकुर गाडगीळ
मी ऑक्सिजन पुरवणीचा अनेक वर्षांपासून नियमित वाचक आहे. माझ्या व्यक्तिमत्त्व विकासाचं बरंचसं श्रेय मी प्रामाणिकपणे ‘ऑक्सिजन’ला देईन. मु. पो. पापडी, ता. वसई, जि. पालघर हे माझ्या गावाचं नाव. नोव्हेंबर २०१७ ला मी पोलंड या अत्यंत सुंदर देशात पीएच.डी. करण्यासाठी आलोय.
खरं तर माझं गाव तसं मुंबईच्या जवळचं. मध्यमवर्गीय कुटुंब, तसा अभ्यासातही मी मध्यमच. बीएस्सी करून स्पर्धा परीक्षांची तयारी करायची याच ‘तयारीत’ होतो. सहावेळा मी कम्बाइन डिफेन्स सर्व्हिसेस म्हणजेच सीडीएस या परीक्षेत शेवटच्या मुलाखतीपर्यंत जाऊन बाद झालो. दुसरीकडे पदव्युत्तर शिक्षणासाठीसुद्धा माफक प्रयत्न करत होतो. आता याच गोष्टीचा मागे वळून बघताना आनंद वाटतो आहे. पदव्युत्तर शिक्षण मी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेतून (नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ विरॉलॉजी) पूर्ण केलं. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असल्यामुळे या संस्थेची प्रवेश परीक्षा तशी सहज उत्तीर्ण झालो.
बीएस्सी करत होतो त्याच काळात मी दोनदा सीडीएससाठी प्रयत्न केले. तिथंच मला एक महत्त्वाचा धडा शिकायला मिळाला. नुसतं स्पर्धा परीक्षा एके स्पर्धा परीक्षा करू नये, त्यासोबतच आपल्या मूळ विषयात करिअर करायचाही प्रयत्न करावा. पुढे मी अजून चारवेळा प्रयत्न केले; पण अपयशीच ठरलो. एक मात्र नक्की की सोबत पदव्युत्तर शिक्षण सुरू असल्यामुळे या सहा अपयशांसोबतच या काळात एमएस्सीची पदवीसुद्धा कमावली. स्पर्धा परीक्षांमुळे व्यक्तिमत्त्व विकास हा फायदाच झाला. टाटा कॅन्सर रुग्णालयात एक वर्ष कनिष्ठ सहायक संशोधक म्हणून काम केलं. आता थेट पुण्यातून पोलंडमधल्या पोझनानला पोहोचलो आहे.
किती लिहू या शहराबद्दल आणि या देशाबद्दल असं झालंय या चारच महिन्यात. एका सुंदर आणि उबदार अनुभवांची मालिकाच सुरू झाली आहे जणू. युरोपला उतरल्यावर अवघ्या काही तासातच एक सद्गृहस्थ भेटले म्युनिच विमानतळावर. योगायोग म्हणावा की दैवी इच्छा, तेसुद्धा पोझनानलाच जात होते. गप्पा सुरू झाल्या आणि मैत्रीही झाली. माझ्याजवळ ना तिथला कोणाचा संपर्क होता ना बाकी काही माहिती. या व्यक्तीनी माझ्या कार्यालयात संपर्क करून मी पोहोचल्याचा निरोप दिला. मला घ्यायला कोणीतरी येणार आहे हे निश्चित करूनच मग स्वत: निघाले. कुठलंच नातं नव्हतं आमच्यात, ना भाषेचं, ना रंगाचं, ना देशाचं, ना रक्ताचं; पण या सगळ्याच्या वर त्यांनी माझ्या मनात जागा केली आणि तिही कायमचीच.
पुढे माझे पीएच.डी. गाइड आणि इतर सहकारीही असेच मदतीला तत्पर. कुठलेच भेदभाव नाही की कधीच वेगळेपणाची वागणूक नाही. समजलेच नाही की मी त्यांच्यातलाच एक कधी झालो; पण या सगळ्यांपेक्षा एक जगावेगळा आणि अत्यंत दुर्मीळ असा अनुभव मिळाला तो म्हणजे इथे नाताळ सणानिमित्तानं मी एक कुटुंबाकडे पाहुणा म्हणून गेलो (हाही एक मोठा योगायोगच म्हणावा लागेल). विद्यापीठाचा तो उपक्रम होता आणि त्याला इतका प्रतिसाद होता की, मला नंतर समजले की त्या उपक्र मातून असा स्थानिक कुटुंबासोबत सण साजरा करणारा मी एकटाच होतो त्या वर्षीतरी. तर हे मार्शवेक कुटुंब ज्यांच्याकडे मी नाताळ साजरा करायला गेलो, या कुटुंबातल्या आजी आणि आजोबांनी दुसरं महायुद्ध पाहिलेलं होतं, त्यातून ते वाचले होते. आजीचं मात्र बाकी संपूर्ण कुटुंब त्या युद्धात मरण पावलं. या कारणामुळे त्या अगदी एकाकी राहतात आणि परकीय लोकांसोबत बोलणं टाळतात. बºयाच प्रमाणात द्वेष करतात. मला जेव्हा त्या घरातील काकूंनी हे सांगितलं तेव्हा मीही जरा घाबरलोच होतो; पण मग काकूंनीच त्यावर उपायही सांगितला. आजींना विविध प्रकारचे पदार्थ बनवायला आवडतात. त्यामुळे जर तू त्यांना एखादी कृती लिहून देऊ शकलास तर त्यांचा सूर बदलेल. वा ! हे तर अगदी सोप्पं झालं होतं. पाककलेची आवड असल्यामुळे हे तर अगदी घरच्या मैदानावर खेळल्यासारखं होतं. मनाशी ठरवलं नुसती कृती लिहून नाही तर बनवून न्यायची. त्यांच्यासाठी खास गाजरहलवा बनवला. गाजरहलव्यानं आपलं काम अपेक्षेपेक्षा जास्त चोख पार पाडलं. सर्वात भावनिक क्षण तेव्हा होता जेव्हा निघताना फोटो काढत असताना त्यांनी माझ्या शेजारी उभं राहून फोटो काढला. त्या दिवसानंतर या चार महिन्यात मी एकूण ४ वेळा तरी या कुटुंबाकडे गेलो. एकदा तर सर्वांसाठी भारतीय जेवणाचा बेत ठरवला. सर्वांना तो भरपूर आवडला. हे विश्वचि माझे घर हे कधीकाळी मराठीत ऐकलं होतं, त्याचा अनुभव असा पोलंडमध्ये आला.
(सध्या पोलंडमधील पोझनान शहरात वास्तव्यास आहे.)