ज्युनिअर डॉक्टर म्हणजे गुलाम? - हे कुणी ठरवलं?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 04:07 PM2019-05-30T16:07:32+5:302019-05-30T16:09:05+5:30
सीनिअरसमोर मान झुकवून गुलाम म्हणजे झेंडू पोझिशनमध्ये चालणं. सीनिअर म्हणेल ती पूर्व दिशा असं वागणं म्हणजे रॅगिंग. ते होतं; पण बोलत कुणीच नाही.
- डॉ. रोहित गणोरकर
मानसिक आरोग्य विभाग, वैद्यकीय अधिकारी, सर्च गडचिरोली.
मेडिकल कॉलेजमध्ये कायद्याने बंदी असली तरी आजही अस्तित्वात असणारी व्यवस्था म्हणजे रॅगिंग. एक-दोन वर्षानी सीनिअर असणारी टोळी रॅगिंग घेणं हा स्वतर्चा हक्क समजतात. पहिल्या वर्षाचे विद्यार्थी रॅगिंगपुढे आपण हतबल आहोत, त्याशिवाय आपला विकास होऊ शकत नाही असं समजतात.
रॅगिंग म्हणजे थ्री इडियट सिनेमात दाखवल्याप्रमाणे फक्त डान्स नव्हे तर रात्नी 3 वाजेर्पयत एका रांगेत उभं राहणं, पन्नास मुलांची संपूर्ण नावं रोल नंबरसह पाठ न झाल्यास गालावर झापडा खाणं, पहिल्या वर्षाच्या मुलांना साध्या शर्ट-पॅन्ट घालण्याची सक्ती करणं, जिम व लायब्ररीमध्ये जाण्यावर र्निबध घालणं. सीनिअर समोर मान झुकवून गुलाम म्हणजे झेंडू पोझिशनमध्ये चालणं. थोडक्यात सीनिअर म्हणेल ती पूर्व दिशा असं रॅगिंगचं स्वरूप असतं. मेडिकलच्या शिक्षक वर्गावरसुद्धा अशी रॅगिंग झालेली असते व काहींनी घेतलेली असते. त्यामुळे रॅगिंग जुनाट रूढी परंपरेचीच गोष्ट आहे. कॉलेजची प्रतिष्ठा खराब होईल या हेतूने या प्रकरणांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं जात असेल काय हा प्रश्नच आहे.
या रॅगिंगमुळे व्यक्तीमध्ये एका प्रकारची लाचारी वाढते. स्वतंत्न विचार करण्याची शक्ती कमी होते. या सगळ्याचं प्रतिबिंब पदव्युत्तर शिक्षणात दिसून येतं. मग आम्ही रॅगिंग घेतली तर काय वावगं केलं असं म्हणणारा गट तयार होतो.
मुंबईमधील आत्महत्येनंतर रॅगिंग, जातीयता यावर निषेध व्यक्त केला जात आहे. अशी घटना पुन्हा कधीच घडू नये असं वाटत असेल तर काही प्रश्न या व्यवस्थेचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भाग असणार्यांनी स्वतर्ला विचारायला हवेत.
अ) प्रथम वर्ष निवासी डॉक्टरांची संख्या तुलनेनं वाढत आहे तरीही त्यांना 6 तास झोप, 2 वेळच्या जेवणासाठी 1 तास, अंघोळीसाठी 1 तास, त्याच्या मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी व्यवस्थित वातावरण हे किमान हक्क मिळवून देता येतील काय?
आ) ज्युनिअर आणि सीनिअर हे शोषण व्यवस्थेप्रमाणे ‘प्रथम वर्षामध्ये आहात ना आम्हीपण भोगलं तुम्हीपण भोगा’. या दृष्टिकोनामध्ये बदल कराल काय?
इ) एमबीबीएसमध्ये पहिल्या वर्षापासून सुरू असलेलं रॅगिंग, नाव पाठ न केल्यास मारणं या विकृत मानसिकतेमधून निर्माण झालेली शोषणाची व्यवस्था मुळापासून उपटून काढायला तयार आहोत काय?
ई) दुसर्याचा छळ केल्यानं, हीन दर्जाची वागणूक दिल्यानं तोसुद्धा पुढील वर्षात अशीच गुलामगिरीची वागणूक त्याच्या ज्युनिअरला देतो, त्याचा मानसिक ताण वाढतो. त्याचा विकास खुंटतो. त्याच्या मनात न्यूनगंड तयार होतो हे मान्य करायला आपण तयार आहोत का?
****
कायदा आहे तरीही..
रॅगिंग विरुद्ध कायद्यानं लढणं तर गरजेचं आहे पण दुसर्या व्यक्तीला त्नास होणार नाही ही भावना जोपासणं सुद्धा तितकेच गरजेचे आहे. कारण एका आत्महत्येच्या मागे प्रचंड नैराश्य, हतबलता त्यापूर्वी अनेकांकडून छळ झाल्याचा अपमान झाल्याचे विचार असतात. हे विचार थांबवता येत नाही इतकी त्याची तीव्रता असते.
मा. सर्वोच्च न्यायालय आदेश मे 2009 नुसार विद्यार्थी व शिक्षकांनी रॅगिंग प्रतिबंधात्मक कार्यवाही पूर्ण केली तर कदाचित अशा घटना घडणार नाहीत.