पर्सनल फिटनेस ट्रेनर
By admin | Published: May 9, 2014 12:07 PM2014-05-09T12:07:51+5:302014-05-09T13:34:45+5:30
बरेच जण रोज वॉकिंगला जातात, काही जीमला जातात, मग वाटतं, आपण फिट आहोत!
Next
>बरेच जण रोज वॉकिंगला जातात, काही जीमला जातात, मग वाटतं, आपण फिट आहोत! साधी गोष्ट- वॉकिंग करणं चांगलंच, पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का? - रोज चालायला जाणं म्हणजे एकच एक प्रकारचा व्यायाम आपण करतोय. एकाच अवयवावर जास्त ताण देतोय. यामुळे गुडघ्यांचा त्रास सुरू होऊ शकतो. चालणं चांगलंच, पण कसं चालायचं, कुठे चालायचं, कधी चालायचं? त्यासाठीचा सरफेस कोणता हवा? शुज घालायचे की चप्पल, की नुसतंच? - हे कुठे माहीत असतं आपल्याला?
पण हे कोण आणि कसं सांगणार?
या सार्या गोष्टी शास्त्रोक्त पद्धतीनं सांगण्याचं आणि ते करवूनही घेण्याचं काम करतो, तो ‘पर्सनल फिटनेस ट्रेनर’. आताशा हा प्रकार खूपच लोकप्रिय होतो आहे आणि अनेक जण नुसतं जीमला जाण्याऐवजी पर्सनल ट्रेनरकडून वर्कआउट करवून घेताहेत.
प्रत्येकाला त्याच्या गरजेनुसार आणि त्याच्या मागणीनुसार ‘फिटनेस कौन्सिलिंग’ करण्याचं काम करतो तो पर्सनल फिटनेस ट्रेनर.
‘लाख’मोलाची कमाई
मला लहानपणापासून व्यायामाची खूप आवड. खूप व्यायाम करायचो, पण सुदैवानं मला खूप लवकर कळलं, नुसती ढोर मेहनत करून काहीच उपयोग नाही. त्यामुळे व्यायामाचे वेगवेगळे कोर्स मी केले. त्यानुसार व्यायाम कसा करायचा आणि त्याहीपेक्षा अत्यंत महत्त्वाचं म्हणजे व्यायाम कसा करायचा नाही हे मला कळलं. माझी स्वत:ची बॉडी तर त्यामुळे खूप लवकर सुधारलीच, पण माझ्यात एक वेगळाच कॉन्फिडन्सही आला. ‘जनरल ट्रेनर’ म्हणून वेगवेगळ्या नामांकित जीम्समध्येही मी अनुभव घेतला. त्या जोडीला या फिल्डमध्ये जे काही आधुनिक येत होतं आणि ‘पर्सनल ट्रेनर’ म्हणून ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता होती ते ते सारं मी शिकून घेतलं.
वेगवेगळे कोर्सेस आणि ‘हेल्थ अँण्ड फिटनेस मॅनेजमेंट’ (‘साई’, पतियाला) कोर्स केलेला तर उत्तर महाराष्ट्रात कदाचित मी एकटाच असेन. याशिवाय ‘केटल वेल अँण्ड फंक्शनल ट्रेनिंग’, योगा, एरोबिक्स, मसाज, स्पोर्ट्स ट्रेनिंग, ‘सोशल पॉप्युलेशन’चा कोर्सही मी केला. ‘सोशल पॉप्युलेशन’ म्हणजे साधारण पन्नाशीच्या पुढचे आणि डायबेटिस, बॅकएक, स्लिप डिस्क, डिसलोकेशन, हार्निया, सांधेदुखी, गुडघेदुखी. इत्यादी आजार असलेले नागरिक. या सर्वांना त्यांच्या वयानुसार, आजारानुसार, त्यांची मेडिकल हिस्ट्री पाहून व्यायामप्रकार सुचवावे लागतात. शिवाय प्रत्येकाची जीवनशैली वेगळी, त्यांचं डाएट वेगळं. हे सारं पाहून ‘डिसीज क्युअर’ व्यायामप्रकारही करवून घ्यावे लागतात. आता ‘अमेरिकन कौन्सिल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिन’ (‘एसीएसएम’) या आंतरराष्ट्रीय कोर्सलाही मी अँडमिशन घेणार आहे.
आजपर्यंत नाशिकचे माजी पोलीस कमिशनर, विविध प्रसिद्ध उद्योजक, नेते यांच्यापासून तर अनेकांना मी पर्सनल ट्रेनिंग दिलं आहे. एक अनुभव तर अत्यंत महत्त्वाचा. नाशिकमधील एका प्रसिद्ध उद्योजकाला अपघात झाल्याने त्याला लहान-मोठे तब्बल ३६ फ्रॅक्चर झाले होते. त्यांच्याकडून मी विविध व्यायामप्रकार करवून घेतले. आता ते व्यवस्थित चालू शकतात. माझ्या दृष्टीनं ही लाखमोलाची कमाई आहे.
.हे ‘एवढं’ तरी हवंच.
१) व्यायामाचं ट्रेनिंग देताना लोकांच्या गैरसमजुती दूर करणं हे सर्वात महत्त्वाचं काम. कौशल्य असलं तर यात पैसाही मोठय़ा प्रमाणात मिळतो.
२) मी स्वत: महिन्याला दीड लाख रुपयांपर्यंत कमाई केली आहे. अर्थात एवढा पैसा प्रत्येक वेळी मिळेलच असं नाही, पण तुमच्यात कौशल्य असलं आणि ते तुम्ही अपडेट करीत राहिलात, तर कुठेही असलात तरी चांगली कमाई निश्चितच होऊ शकते हे मी स्वानुभवानं सांगू शकतो.
समर माळी, पर्सनल फिटनेस ट्रेनर