प्राची खाडे, स्टायलिस्ट आणि पर्सनल शॉपर
आपणही जातो एखाद्या भल्यामोठय़ा मॉलमध्ये. सगळीकडे ब्रॅण्डेड कपड्यांची चकचकीत दुकानंच दुकानं.शेकडो कपडे, हजारो फॅशन्स. आणि असतातही आपल्या खिशात थोडेबहूत पैसे. आपल्याला काहीतरी एकदम स्टायलिश, फॅशनेबल विकत घ्यायचं असतं, पण दुकानांमध्ये शिरलं की कळतंच नाही काय घ्यावं? आपल्याला काय चांगलं दिसेल? आणि आपण जे घेऊन येतो, त्यापेक्षाही काहीतरी भन्नाट आपल्या मित्रमैत्रिणींच्या अंगावर दिसतं. मग आपल्यालाच वाटतं, की आपल्याला का नाही असं काही मिळत? त्यात एखादा आपला मित्र किंवा मैत्रीण असतेच अशी की ज्यांचा ड्रेसिंग सेन्स हमखास चांगला असतो. ते आपल्याला सांगतात की, हे नको ते घे, नेहमी असेच काय रंग घेतो, हे ब्राईट कलर घे.
इतरांना काय चांगलं दिसेल, शोभून दिसेल याचे सल्ले देणारे, मित्रमैत्रिणींबरोबर शॉपिंगला जाणारे, त्यासाठी दिवस दिवस घालवणारे अनेक जण असतात. एरवी आपल्याला त्यांच्या या कष्टाचं आणि स्किलचं काही अप्रूप नसतं. पण कल्पना करा, त्यांना जर या कामाचे पैसे द्यावे लागले तर? किंवा आपण लोकांना जे कपडे-स्टाइल्स याविषयी जे फुकट सल्ले देतो, त्यांच्याबरोबर शॉपिंगला जातो, तोच आपला जॉब, आणि त्याचेच आपल्याला पैसे मिळू लागले तर.?
नव्या करिअरच्या रांगेत सध्या जे सगळ्यात स्टायलिश करिअर आहे, ते हेच काम, त्याला म्हणतात ‘पर्सनल शॉपर्स.’ ही पर्सनल शॉपर्स असलेली माणसं इतरांसाठी शॉपिंग करतात, त्यांना त्यांच्या पैशानं बाजारात जे जे म्हणून बेस्ट आहे ते विकत आणून देतात आणि त्या बदल्यात त्या व्यक्तींकडून ‘फी’ घेतात.
आय शॉप फॉर देम.
‘पर्सनल शॉपर’ ही कल्पना भारतात नवीन असली तरी युरोपात मात्र अजिबात नवीन नाही. भारतीय माणसं मुळातच फार फॅशनप्रेमी नाहीत, मात्र युरोपात उत्तम राहणीमान, कपडे, टापटीप-स्टायलिश ड्रेसिंग हे रोजच्या आयुष्याचा भाग असतं. मी स्वत: इटलीतल्या मिलान शहरात जाऊन पर्सनल शॉपर्ससाठीचा एक डिप्लोमा करून आलेय. तिकडे या विषयाचे अभ्यासक्रम सुरू झालेत इथवर पर्सनल शॉपिंगचा ट्रेण्ड मुरलाय. आपल्याकडे मात्र हे सारं आत्ता आत्ता सुरू झालं. त्याचं मुख्य कारण म्हणजे लोकांच्या हातात बर्यापैकी पैसा येऊ लागलाय. त्या पैशाबरोबरच उत्तम राहणीमान, नव्या व्यावसायिक जगात प्रेझेंटेबल राहण्याची गरजही निर्माण झाली. ब्रॅण्ड आले, त्या ब्रॅण्डेड वस्तू खरेदी करण्याची आर्थिक शक्तीही हातात आली, मात्र घालायचं काय, नेमकं विकत काय घ्यायचं हे मात्र अनेकांना कळत नाही. काही बडे कॉर्पोरेट्स, आयटीवाले, व्यावसायिक यांच्याकडे तर पैसे आहेत पण बाजारात फिरून, नवीन काय आलंय हे शोधून, त्यात आपल्याला काय दिसेल हे पाहून शॉपिंग करण्यासाठी आवश्यक तो वेळच त्यांच्याकडे नाही.
अशा सगळ्या माणसांना हक्काची मदत करतो ते आम्ही पर्सनल शॉपर्स. पूर्वी फक्त सेलिब्रिटींपुरती ही मदत र्मयादित होती. आता ‘पर्सनल’ या शब्दातच हा अर्थ अभिप्रेत आहे की, कुणाही व्यक्तीच्या रोजच्या जगण्यात आवश्यक असलेल्या व्यक्तिगत गोष्टींची खरेदी करणं, ते पर्सनल शॉपिंग.
त्यात आपल्याकडे आयुष्यातली सगळ्यात मोठी खरेदी होते ती लग्नात. ‘वेडिंग शॉपिंग’ ही आपल्याकडची सगळ्यात जुनी आणि तरीही प्रचंड मोठी खरेदी. पण अनेक जण आता पूर्वीसारखं दुकानात जाऊन आपल्याला हवं ते खरेदी करत नाहीत. त्यांना आपलं लग्नच यादगार बनवायचं असतं. लग्नात पायातल्या चपलांपासून डोक्यावरच्या गर्जयापर्यंत काय आणि कसं घालावं याचं त्यांना प्लानिंग हवं असतं, जे विकत घेऊ ते उत्तमच हवं हा आग्रह असतो. पैसे हा अर्थातच काही प्रश्न नसतो.
इथं ते माझ्यासारख्या पर्सनल शॉपर्सची मदत घेतात. आणि अनेकदा मी फक्त नवरा मुलगा-मुलगी यांच्यासाठीच नाही तर त्यांच्या अख्ख्या कुटुंबासाठीच खरेदी करतो. एरवीही लग्नाच्या खरेदीत खूप वेळ जातो, अनेकांना त्या खरेदीचा कंटाळाच येतो. त्यामुळे मी प्रयत्न करते की, लग्नाची खरेदी ही गोष्टही लग्नाइतकीच यादगार सेलिब्रेशन ठरली पाहिजे. म्हणून मग ज्यांच्यासाठी खरेदी करायची, त्यांच्या आवडीचे रंग, त्यांना काय घालायला आवडेल, काय नक्की हवंय, बजेट काय हे सारं बोलून मी मार्केट सर्व्हे करते. कुठं काय चांगलं मिळेल, कोण काय चांगलं बनवून देईल हे शोधते. मुलीला गुलाबीच घागरा हवा असेल तर तो शोधून ठेवते, आईला हिरवी-एम्ब्रॉयडरीचीच साडी हवी असेल तर त्या कुठं मिळतात हे पाहून ठेवीन, वडिलांना चिकनचा कुर्ताच हवा तर त्यातली व्हरायटी शोधून ठेवीन आणि हा सारा अभ्यास करून कुटुंबाला खरेदीला घेऊन जावं लागतं. खरेदी करतानाही त्यांना उत्तम अटेन्शन मिळेल, अधूनमधून चहा-कोल्ड्रिंक मिळेल. कुणी आजी असतील तर औषधांच्या वेळा सांभाळल्या जातील, कुणाचं छोटं बाळ असेल तर ते सांभाळायला एखादी बाई मदत म्हणून दिली जाईल, शॉपिंग झालं की जेवणाचं टेबल आधीच रिझर्व्ह करून ठेवलेलं असतं, ऐनवेळेस ताटकळायला नको म्हणून, अशा इतक्या बारक्या बारक्या गोष्टींचा विचार करून मुख्य शॉपिंग होतं. त्यात त्यांना काय चांगलं दिसेल, नाही दिसणार हे सारं सुचवून खरेदी होते.
मुख्य मुद्दा काय आज लोकं पैसे खर्च करायला तयार आहेत, त्यांना हवीय ती सोय, कम्फर्ट आणि ट्रेण्डी लूक. म्हणून लग्नच नाही तर रोज ऑफिसला वापरायच्या कपड्यांसाठीही मी खरेदी करते. कुठले ब्रॅण्डेड कपडे त्यांच्या बॉडी टाईपप्रमाणे चांगले दिसतील, कुठलं कॉम्बिनेशन चांगलं दिसेल, त्यावर कुठला बेल्ट, कुठले बूट, कुठल्या चपला, बॅगा, क्लिपा चांगल्या दिसतील हे सारं प्लॅन करून विकत घेऊन देते. एवढेच कशाला अनेक जण तर आफिसवेअरबरोबर रात्री घालायचे कपडे, इनर वेअर यासाठी सल्ला घेतात. हल्ली अनेक मिटिंगांनंतर कुठे हॉटेलात कुणाकुणाच्या रूम्समध्ये अनेक लहान-मोठय़ा इन्फॉर्मल मिटिंग होतात, तेव्हा काही चटाळयापटाळ्या पॅण्ट-बनियन घालून नाही बसता येत. त्यासाठी मग उत्तम कपड्यांची खरेदी आवश्यक ठरते.
सगळ्यांनाच आता आपली इमेज, आपला लूक बदलायचा आहे. अधिक चांगलं-प्रेझेंटेबल दिसायचं आहे, फॅशन आणि ट्रेण्डचा सेन्स सगळ्यांनाच कसा असेल? मग माझ्यासारख्या प्रोफेशनल मदतीची त्यांना गरज पडते.
स्टायलिस्ट आणि लूक डिझायनर
मी फक्त पर्सनल शॉपर नाही तर स्टायलिस्ट किंवा लूक डिझायनरही आहे. एरवी ही दोन स्वतंत्र कामं असतात. काही माणसं फक्त पर्सनल शॉपर असतात म्हणजे ते दुसर्यासाठी शॉपिंग करतात. काही फक्त त्यांचा लूक डिझाईन करून देतात. त्यांना काय चांगलं दिसेल याचे सल्ले देतात. मी दोन्हीही करते. यात फरक काय असतो तर पूर्वी एकच पार्लरवाली आपले केसही कापायची आणि फेशियलही करायची. आता त्यासाठी दोन एक्स्पर्ट असतात. तसंच हे काम. तुमचा लूक कसा दिसेल, तुम्ही कुठले कपडे वापरावेत, कुठले टाळावेत, तुमच्या इमेजला तुमचे कपडे शोभतात का, किंवा इमेज बदलावी म्हणून तुमचे कपडे कशी मदत करतील हे सारं स्टायलिस्ट किंवा लूक डिझायनर ठरवतो. पर्सनल शॉपर ते फक्त विकत आणून देतो. आणि हे सारं करण्याचे व्यावसायिक दरानं पैसे घेतो.
मी दोन्हीही करते कारण हे काम एकात एक गुंफलेलं आहे, असं मला वाटतं.
मला वाटतं आजच्या घडीला या क्षेत्रात तज्ज्ञ माणसांची मोठ्ठी गरज आहे. लोकांच्या हाती जसजसा पैसा येईल तसंतसं हे काम वाढेल, आपलं शॉपिंगचं प्रेम आणि काय कसं घालावं ही समज ही ताकद एक मोठं करिअर उभं करू शकतं, हे नक्की.
.हे ‘एवढं’ तरी हवंच.
१) शॉपिंगची आवड आणि स्टाईल सेन्स दांडगा हवा.
२) प्रसन्न हवं व्यक्तिमत्त्व.
३) अनेक प्रकारची माणसं, त्यांच्या गरजा, त्यांचे मुड्स समजून त्या माणसांनी सुंदर दिसावं म्हणून सिन्सिअर प्रयत्न करण्याची भावना हवी.
४) उत्तम संवादकौशल्य हवं.
५) मेहनतीची तयारी तर हवीच हवी, पण स्मार्ट वर्क हवं, घड्याळ न पाहता काम करण्याची आणि माणसं आपलीशी करण्याची हातोटी हवी.
Web Title: Personal Shopper
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.