खोट्या मार्कांचे ढीग आणि सर्टिफिकेट्सची रद्दी
By admin | Published: March 8, 2017 05:55 PM2017-03-08T17:55:18+5:302017-03-08T17:55:18+5:30
परीक्षा आणि गुणवत्ता यांचा तसा अर्थाअर्थी काही संबंध नसतो. परंतु तसा तो लावला की, मग परीक्षांचीच गुणवत्ता ढासळू लागते.
परीक्षा आणि गुणवत्ता यांचा तसा अर्थाअर्थी काही संबंध नसतो. परंतु तसा तो लावला की, मग परीक्षांचीच गुणवत्ता ढासळू लागते. यावर्षी याची सचित्र दृश्य आपण पाहतोय, बिहारला नावं ठेवत, तिथली पोरं सुधारणार नाहीत असा एक शेराही मारून टाकतो.
आपल्याकडे असे काही प्रकार घडतच नाही म्हणून डोळे मिटून घेतो. आणि घडतच असतील तर ते तिकडे मराठवाडा- विदर्भ या मागासलेल्या ठिकाणी असे म्हणून पुन्हा मोकळे होणारे असतातच! पण तसं काही नाही आपल्या शहरातही अनेक शाळातही सर्रास कॉपी चालते. परीक्षा केंद्रावर अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात परस्पर सहकार्यानं मस्त कॉपी सुरू असते!
यंदा आमच्या शाळेची पहिली बॅच दहावीच्या परीक्षेला बसली त्यामुळे यंदा होत असलेल्या कॉप्यांचे प्रकार दिसले. काही परीक्षा केंद्रात शिक्षकांनी गाळलेल्या जागा, जोड्या लावा असे सोपे प्रश्न मुलांना सहज सोडवता यावेत म्हणून जी परिपूर्ण तयारी केली होती ती थक्क करणारी होती. गाइड आकारानं मोठं असल्यानं ते जवळ बाळगणं गैरसोयीचं होतं म्हणून छोट्या आकाराच्या स्पेशल एडिशनसुद्धा बाजारात मिळतात असं दिसलं. वर्गात एखादा अभ्यासू, हुशार विद्यार्थी असेल तर त्याने त्याचा पेपर इतरांना दाखवावा असा आग्रह उपस्थित शिक्षक स्वत: करत होते. यामुळे सहकार्याची भावना वाढीस लागून महाराष्ट्रातील अस्तंगत सहकारी चळवळीला पुन्हा नवे कार्यकर्ते मिळतील असं त्या शिक्षकांना वाटत असावं! विशेषत: इंग्रजी, गणित यासारख्या पेपरला अशी कुमक देण्यासाठी शिक्षक प्रयत्नशील होते. मात्र दुर्दैवानं ते फळ्यावर शिक्षक जे काही लिहित होते त्यातही अनेक चुका होत्या. ते शिक्षकही याच परीक्षा पद्धतीतून निर्माण झालेले होते त्यामुळे असावे!
काही पालक स्वत: आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी धडपडत होतेच. त्यांनी या केंद्रातील सर्व अधिकाऱ्यांना वश करून घेतले होते. (कसे?) त्यामुळे बोर्डाचे भरारीपथक येणार असेल तर बोर्डातूनच केंद्रावर तशी पूर्वसूचना मिळण्याची सोय होती. मग मुलांकडून त्यांची कॉपीची साधने जमा करण्यासाठी वर्गात बादल्या फिरवल्या जात. ही सारी सुरस चमत्कारिक कहाणी शंभर टक्के खरी आहे. आमच्या प्रभूरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक नगरीतीलच आहे. क्वचित एखादं दुसऱ्या केंद्राचा अपवाद सोडला तर परीक्षांची ही अघोरी थट्टा सर्वत्र सुखनैव सुरू होती.
हे काही आजच घडले आहे असे नाही, सर्व स्कॉलरशिपच्या परीक्षांच्या वेळी अशी स्थिती असते. स्कॉलरशिपच्या निकालाशी शिक्षकांची पगारवाढ सरकारने जोडल्यावर तर सर्वत्र विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत भरमसाठ वाढ व्हायला लागली. हे असे अचानक कसे घडले या विषयी कुणालाच चौकशी करावीशी वाटली नाही. एका संस्थेत शिक्षक प्रबोधनासाठी मी गेलो तेव्हा शिक्षकांनी संस्थाचालकांच्या देखत आम्हाला ‘असे’ करावेच लागते असं स्पष्ट सुनावलं, संस्थाचालक तसे पापभीरू होते पण ते नजर चुकविण्यापलीकडे काहीच करू शकले नाहीत.
मग सांगा, मेक इन इंडियाचं स्वप्न पाहायचं ते कशाच्या बळावर? बाजारात तर अशी कागदी गुणवत्ता फोफावली आहे. ज्ञान नसलेली व प्रमाणपत्रं असलेली ही तरुण पिढी काय निर्माण करेल? आज त्यांना मदत करणारे स्वार्थी पालक, शिक्षक, अधिकारी यांनी हा विचार केला आहे का?
आणि त्यांनी तो केला नसेल तरी परीक्षा देणारे आणि कॉप्या करणारे विद्यार्थी तरी तो करणार आहेत का?
काही दिवसातच परदेशी विद्यापीठं भारतीय विद्यार्थ्यांनी अर्ज करू नये अशा जाहिराती देऊ लागतील. मग ही पदवीची प्रमाणपत्रे काय जाळायची? जगात शेवटी खऱ्या ज्ञानालाच किंमत असते. त्यातून आत्मविश्वास येतो. शोध लागतात. अशा अवस्थेत आपल्या तरुण विद्यार्थ्यांचं काय होणार?
मात्र आज हा विचार कुणीच करायला तयार नाही. सगळ्यांना खोटे गुणांचे ढीग व पदवीपत्रांची रद्दी फक्त हवी आहे.
- अरुण ठाकूर (लेखक आनंदनिकेतन या प्रयोगशील शाळेचे संचालक आणि शिक्षण या प्रक्रियेचे अभ्यासक आहेत)
कॉपी न करणाऱ्या, शिकून, मेहनतीनं परीक्षा देणाऱ्या मुलांना यासाऱ्यातून निराशा येऊ शकते. त्यांना वाटू शकतं की, कॉपी करणारे आपल्यापुढे जाऊ शकतात.
पण जे कॉपी करतात त्यांचं काय होतं? त्यांना वाटतं..
१) नीतिमत्ता वगैरे सब झूट आहे, अशी खात्री होते. मीच कशाला अभ्यास करू, असा प्रश्न निर्माण होऊन ज्ञान मिळवण्याचा उत्साह मावळतो.
२) शिक्षक हे ज्ञान देण्यासाठी नाहीत तर ते ही व्यवस्था चालविणारे ेएक सामान्य घटक आहेत अशी मुलांची खात्री पटते. शिक्षकांशी संवाद तुटतो.
३) आपले पालक घरी काहीही सांगत असले तरी त्याला अर्थ नाही. आपण कॉपी केली तरी काही बिघडत नाही, असा एक समज येतो!
(पूर्व प्रसिद्धी आॅक्सिजन, २७ मार्च २०१५)