प्लेइंग इट माय वे..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 08:32 AM2018-04-19T08:32:45+5:302018-04-19T08:32:45+5:30
सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, धनराज पिल्ले.. यांच्यासारख्या मातब्बर खेळाडूंची फर्स्ट हॅण्ड आणि आॅथराइज्ड माहिती आपल्याला कुठे मिळणार?
-प्रज्ञा शिदोरे
अती प्रसिद्ध व्यक्तींना एक पेच कायम सतावत असतो, तो म्हणजे आपल्या खासगी आणि सार्वजनिक आयुष्य यात फरक तो काय? हा पेच अर्थातच त्यांच्यावर नाटक, सिनेमा किंवा पुस्तक लिहायचे झाले तर पडू शकतो. काहीजण त्यावर सोपं उत्तरं शोधतात, आत्मचरित्र वगैरे लिहायच्या भानगडीतच पडत नाहीत. सचिन तेंडुलकर सारखे लोक त्यावर मध्यमार्ग काढतात आणि ‘प्लेइंग इट माय वे’सारखं पुस्तक प्रकाशित करतात.
या पुस्तकात सचिनने त्याच्या आयुष्यात आलेल्या महत्वाच्या प्रसंगांना तो कसा सामोरं गेला, काही अवघड निणर्यांमागची पाश्वर्भूमी काय होती याविषयीची मांडणी केली आहे. यामध्ये क्रिकेटप्रेमी ज्याला ‘गॉड’चा दर्जा देतात तो माणूस म्हणून कसा आहे ते आपल्याला लक्षात येतं. लहानपणी त्याने खेळावर घेतलेले कष्ट, सर्वोत्तम ठरण्यासाठीची त्याची जिद्द, अतिशय क्लेशदायक शारीरिक व्याधींमधून बाहेर येण्यासाठी, खराब फॉर्ममधून बाहेर येण्यासाठी लागणारी ऊर्जा आणि मानसिक ताकद, यामुळे सचिन माणूस म्हणून कसा घडला हे आपल्याला लक्षात येतं.
अति-लोकप्रिय व्यक्तींकडून शिकण्यासारखे काय तर हेच!
भारतात खेळाविषयीचे साहित्य तसे थोडेच. पण यामध्ये मोलाची भर घालणारी दोन पुस्तके म्हणजे राहुल द्रविड बद्दलचे ईएसपीएनने प्रकाशित केलेले चरित्र - टाइमलेस स्टील आणि हॉकीपटू धनराज पिल्लेचे चरित्र - फर्गिव्ह मी अम्मा. खासकरून आपल्यासारख्या क्रिकेटवेड्या देशाला संदीप मिश्रा यांनी लिहिलेल्या ‘फर्गिव्ह मी अम्मा’मधून बरेच शिकण्यासारखे आहे! या पुस्तकामध्ये एकूणच खेळांकडे बघायची भारतीयांची वृत्ती आणि त्यातून धनराज पिल्ले सारख्या अभूतपूर्व हॉकीपटूला आलेली निराशा यावर उत्तम भाष्य केले आहे. ३ आॅलिम्पिक खेळ होऊनही भारताला सुवर्णपदक मिळवता आले नाही, यावर या कादंबरीचे नाव आधारित आहे.
सचिन आणि द्रविडची चरित्रे वाचाच, पण त्यामुळे धनराज पिल्ले यांच्यावरचे हे चरित्र मागे पडून देऊ नका!
सचिन च्या आत्मचरित्राच्या प्रकाशन कार्यक्रमाच्या निमिताने, हर्षा भोगले याने - राहुल द्रविड, सौरव गांगुली आणि लक्ष्मण यांची मुलाखत घेतली. हा व्हिडीओ युट्युबवर न विसरता पहा. यामध्ये आपल्याला असे खेळाडू कसे घडतात याची उत्तरं मिळतील.