प्रीती झिंटाचा डिजिटल डिटॉक्स आपल्यालाही खूप शिकवणारा आहे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2020 07:51 AM2020-11-05T07:51:29+5:302020-11-05T07:55:06+5:30
आयपीएलसाठी ती दुबईत पोहोचली आणि त्यानंतर तिनं जाहीर कळवलं की, ‘बॅक फ्रॉम डिजिटल डिटॉक्स’.
-प्रतिनिधी
‘लव्ह युवरसेल्फ फर्स्ट’ असं म्हणत प्रीती झिंटाने एक पोस्ट केली. अर्थात तशी ती रोज करते, त्याला ती डेली इन्स्पिरेशन म्हणते, एक छानसं वाक्य आणि त्यावर तिचं पिटुकलं हसरं मत ती लिहिते. आयपीएलसाठी ती दुबईत पोहोचली आणि त्यानंतर तिनं जाहीर कळवलं की, ‘बॅक फ्रॉम डिजिटल डिटॉक्स’. बराच काळ ती सर्व समाजमाध्यमांपासून लांब होती. त्यात ती टीमसोबत बायोबबलमध्ये राहिली. ६ दिवस क्वॉरण्टीन, दिवसाला किमान तीन ते चार वेळा कोविड टेस्ट, एकूण २० कोविड टेस्ट तिनं त्याकाळात केल्या. ती म्हणते कसं असतं बायो बबलमध्ये राहणं असं अनेकजण विचारतात. त्यावर उत्तर एकच, की एकटं राहणं. बाहेर जाण्यावर बंदी. ठरलेल्या जागी, ठरलेल्या वेळी जायचं आणि शांत राहायचं. तिनं डिजिटल डिटॉक्स अर्थात समाजमाध्यमं आणि स्क्रीन्सपासून लांब राहत जरा शांतपणे जगून घेतलं, कलकलाटापासून दूर. प्रीती झिंटा एरव्ही इतकी ॲक्टिव्ह असते, ती जर डिजिटल जगापासून लांब राहू शकते तर आपण का नाही, अशी चर्चा झालीच इन्स्टावरच्या तरुण जगात.