प्रिन्स्टनचा कोर्स मोफत शिकायची सोय
By admin | Published: March 1, 2017 01:25 PM2017-03-01T13:25:13+5:302017-03-01T13:25:13+5:30
तुम्हाला असं कधी वाटलंय की झालो मी झालो खरा इंजिनिअर, पण मला जेवढा रस मशीन्समध्ये होता तेवढाच रस भूगोलातही होता. पण बारावीनंतर भूगोल सुटला आणि विषय शिकायचा राहूनच गेला.
- प्रज्ञा शिदोरे
तुम्हाला असं कधी वाटलंय की झालो मी झालो खरा इंजिनिअर, पण मला जेवढा रस मशीन्समध्ये होता तेवढाच रस भूगोलातही होता. पण बारावीनंतर भूगोल सुटला आणि विषय शिकायचा राहूनच गेला. किंवा तुम्ही इकोनॉमिक्सचे विद्यार्थी आहात पण तुम्हाला फिजिक्समध्ये मजा यायची, पण नाही शिकता आलं.
असं अनेकांचं होतं. आपल्या शिक्षणपद्धतीमध्ये आपल्याला नाही शिकता येत फारसे वेगळे विषय. पण तुम्हाला जर काहीही काहीही शिकण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय उपलब्ध आहे आणि तो म्हणजे कोर्सिरा.
या वेबसाइटवर एक ते दीड महिन्याचे छोटे कोर्सेस उपलब्ध आहेत, ज्याला तुम्ही अप्लाय करू शकता आणि आॅनलाइन पद्धतीने ते विषय शिकू शकता. इथे प्रत्येक छोट्या विषयाचा एक करिक्युलम आखलेला आहे, त्याप्रमाणे आपण रोज साधारण एखादा तास शिकायचं, होमवर्क करायचं आणि तो सबमिट ही करायचा. मग रीतसर परीक्षा होणार. त्यात पास झालात तर तुम्हाला तो विषय आला! जर तुम्हाला याचं सर्टिफिकेट हवं असेल तर मात्र तुम्हाला अगदी थोडे पैसे भरावे लागतील. नाहीतर हे सगळे कोर्सेस शिकणं एकदम फ्री आहे. आणि आपल्याला कोण शिकवणार माहीत आहे? जगातल्या सर्वोत्कृष्ट महाविद्यालयांमध्ये शिकवत असलेले प्राध्यापक. म्हणजे इथे एक कोर्स आहे कॉम्प्युटर आर्किटेक्चर नावाचा. तो कोर्स थेट या विषयातलं सवोत्तम विद्यापीठ म्हणजे प्रिन्स्टन इथे शिकवला जाणारा कोर्स आहे! गेम थिअरी थेट स्टेनफोर्ड विद्यालयातला प्राध्यापक शिकवणार आणि इकोनॉमिक्स लंडन स्कूल आॅफ इकोनॉमिक्सचा प्राध्यापक.
कोर्सिराचा हेतू हा जगातलं सर्वोत्तम ज्ञान सर्वांपर्यंत खुलं करणं असा आहे. आणि त्यांच्या मते एखादी गोष्ट आपल्याला वाचूनही समजते, पण जर खोलवर अभ्यासायची असेल तर त्याला एक शिस्त लागते. आणि तुमच्या त्या विषयातल्या अभ्यासात ही शिस्त तुम्हाला इथे मिळते.
असं म्हणतात ना की, तुम्ही जितक्या नव्या गोष्टी शिकत राहता, तेवढे तुम्ही अधिक समृद्ध होता. म्हणजे जर एखादा केमिस्ट्री विषयातला प्राध्यापक असेल तर त्याने त्यांच्या विषयात खोली गाठण्यासाठी त्याच्या विषयात लेटेस्ट काय आहे ते शिकलंच पाहिजे. नाहीतर त्याचं शिक्षण लगेच कालबाह्य ठरतं. आता म्हणे काही सॉफ्टवेअर कंपन्यांनीही प्रत्येक वर्षी त्यांच्याच विषयातलं ३-४ विषय जे शिकतील त्यांना वर्षाच्या अखेरीस काही बोनसही जाहीर केला आहे. पण बोनससाठी नाही तर उत्तम ज्ञान फुकट आहे म्हणून आपणच आपले नवीन विषय शिकत रहायला हवं...
तर मग चला, लगेच कोर्सिरावर लॉगइन व्हा!!
हे वाचा- www.coursera.org
तुम्ही डिस्कव्हरी चॅनेल बघत असाल किंवा फॉक्स लाइफ, किंवा नॅशनल जिओग्राफिक तरी! त्यामध्ये अनेक असे कार्यक्र म आपल्याला बघयला मिळतात ज्यामध्ये ३000 वर्षांपूर्वी आत्ता जे ब्रिटन आहे तिथला माणूस कसा राहत होता, काय खात होता इत्यादि सर्व माहिती हे लोकं एखाद्या हदावरून शोधून काढतात. किंवा एखाद्या गुहेत काही चित्र असतात, ज्यावरून आपल्याला लक्षात येतं की तिथला माणूस कसा असेल, काय खात असेल, शिकार कशी करत असेल इत्यादि. केवढे कष्ट घेतात ही माणसं हे सगळं शोधण्यासाठी!
पण तरीही आपल्याला या माहितीमधून सर्वात महत्त्वाची अशी एक गोष्ट कळत नाही आणि ती म्हणजे भावना. आपल्या ज्या विचारांमधून पुढे जाण्याची ऊर्जा मिळते, असे विचार आपला आनंद, दु:ख हे काहीच कळत नाही तर मग उपयोग काय की नाही? जर पुढच्या ५ हजार वर्षांनी मानवाला (जर तो टिकला तर!!) किंवा कोणाच्या इतर प्राण्याला हे जाणून घ्यायचं असेल की २०००च्या शतकातला माणूस कसा होता, तर त्याला ही फिल्म नक्कीच उपयोगाची ठरेल. म्हणून काही डिरेक्टर्सच्या मनात एक भन्नाट कल्पना आली. त्यांनी जगभरातल्या अनेक लोकांना आपली आयुष्य रेकॉर्ड करायला सांगितली. आणि त्यांना काही सोपे प्रश्न विचारले. यामध्ये त्यांना ४५०० तासांचं फुटेज १९२ देशांमधून मिळालं. म्हणजे १८८ दिवसांचं फुटेज! आणि हे सगळं केवळ एकाच दिवशी चित्रीत केलं होतं. २४ जुलै २०१० या दिवशी. या एका दिवशी शूट केलेल्या फुटेज त्यांनी जोडायला सुरुवात केली आणि आकाराला आला ‘लाइफ इन अ डे’ हा चित्रपट.
या चित्रपटाचे डिरेक्टर म्हणजे ज्याने ग्लॅडिएटर नावाच्या ख्यातनाम सिनेमाचं दिग्दर्शन केलं रिडले स्कॉट!
तर नक्की बघा. आजपासून ५००० वर्षांनंतरचा माणूस आपल्याला कसं बघणार आहे ते! https://www.youtube.com/watch?v=JaFVr_cJJIY
pradnya.shidore@gmail.com