इंजिनिअर नावाचं प्रॉडक्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2018 04:05 PM2018-01-17T16:05:32+5:302018-01-18T07:37:31+5:30
लाखो रुपये खर्च करून इंजिनिअरिंगची पदवी मिळते; पण नोकरीच्या बाजारात तिची किंमत शून्य, असं का? असं विचारणारी एक शॉर्ट फिल्म : मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअर..
- हर्षल गवळी
मी मेकॅनिकल इंजिनिअर होतो. इंजिनिअरिंग केल्यानं माझ्या आयुष्याला, दृष्टिकोनाला आणि करिअरलाही दिशा मिळेल असं मला वाटत होतं; पण झालं उलटंच. मेकॅनिकल इंजिनिअरची डिग्री घेऊन बाहेर पडलो. आणि पुढे दोन वर्षे फक्त नोकरी शोधत होतो. नोकरी तर मिळाली नाहीच, पण इंजिनिअरची डिग्री चिटकलेल्या हर्षलची बाहेरच्या जगातली ‘व्हॅल्यू’ तेवढी दिसली. ‘झिरो’ शून्य. कंपनीतून एखादं प्रॉडक्ट बाहेर येतं, पण ते येताना मार्केटमध्ये काय चालतंय याचा अंदाजच नसेल तर काय होईल? तसंच झालं. इंजिनिअर नावाचं हे प्रॉडक्ट काही खपेना. सायडिंगला लागणंच नशिबात होतं.
पण असं का व्हावं? मी तर मेकॅनिकल इंजिनिअर झालो होतो, तरी मला का भाव नव्हता?
सुरुवातीला वाटलं की विद्यार्थी म्हणून मीच कुठेतरी कमी पडलो. पण हळूहळू माझी जबाबदारी, संस्थेची जबाबदारी, शिक्षणपद्धती याचाही जरा ताळा सुरू झाला. मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याशिवाय काही पर्यायही नव्हता.
मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा. चाळीसगावमध्ये दहावीपर्यंतचं शिक्षण झालं. जे स्वप्न सर्व आई-वडील आपल्या मुलांसाठी बघतात तेच स्वप्न माझ्या आई-बाबांनीही बघितलं. मुलाला चांगल्या कॉलेजमधून इंजिनिअर करायचं. इंजिनिअर होऊन तो स्वत:च्या पायावर उभा राहील. मलाही इंजिनिअर व्हायचं होतं. म्हणूनच तर मी घरापासून लांब पुण्याला शिकायला आलो. सीरिअसली कॉलेजला जायचो. प्रत्येक लेक्चर अटेण्ड करायचो. पण कॉलेजचा सगळा जोर रट्टा मारण्यावर. मला प्रॅक्टिकल नॉलेज हवं होतं; पण मिळत गेलं थिआॅरॉटिकल नॉलेज. चार भिंतींत पुस्तकातलं घोका एवढंच. शिकताना अनेकदा शंका यायच्या. कळलं नाही तर मी लगेच विचारायचो. बरेच शिक्षक तरुण. नुकतेच पासआउट होऊन शिकवण्याच्या कामाला लागलेले. माझ्या शंकांचं निरसन तर दूरच पण उलट प्रश्न विचारल्यानं त्यांचा इगो दुखायचा. आपलं शिकवलेलं याला कळत नाही म्हणजे काय? एवढे का प्रश्न विचारतो याचा राग मनात धरून प्रोजेक्टसारख्या महत्त्वाच्या वेळेस मला टार्गेटही केलं जायचं. माझे प्रोजेक्ट नाकारले जायचे. खूप मनस्ताप व्हायचा. अवतीभोवती सारं हेच चित्र.
वर्षामागून वर्षं गेली. एकदाची मेकॅनिकल इंजिनिअरची डिग्री हातात पडली. वाटलं आता पायावर उभं राहाता येईल. पण बाजारात माझ्यातल्या इंजिनिअरला कोणी विचारतच नव्हतं. निराश झालो. पायावर उभं राहाणं गरजेचं होतं. मग एमबीएला प्रवेश घेतला. काहीतरी करतोय हे वाटणं महत्त्वाचं होतं..
त्यात लहानपणापासून नाटक करण्याची आवड होती. पुण्यात आल्यावर नाटकं केली. शॉर्ट फिल्म्स केल्या. शॉटर््स फिल्मच्या माध्यमातून महत्त्वाच्या विषयांना वाचा फोडता येते हेही लक्षात येत गेलं.
काळ थोडा पुढे सरकला, पण इंजिनिअर असूनही माझी व्हॅल्यू शून्य कशी, हा प्रश्न पुसट होत नव्हता. डोकं कुरतडतच होता. मी माझ्या ग्रुपमध्ये, इतर मित्रांशी बोलत होतो. इंजिनिअर झालेल्या दोस्तांचा अनुभव माझ्याहून वेगळा नव्हता. माझा इंजिनिअरिंग विषयीचा अनुभव हा वैयक्तिक की सार्वत्रिक हे तपासून पाहण्यासाठी मी जास्तीत जास्त इंजिनिअरिंग करणाºया विद्यार्थ्यांशी, इंजिनिअर झालेल्या आणि नोकरी शोधणाºया उमेदवारांशी बोलत होतो. हळूहळू लक्षात आलं की आम्ही फक्त इंजिनिअर नावाचे साचेबद्ध प्रोडक्ट झालोय. इंजिनिअरिंगचं शिक्षण देणाºया संस्थांनी, शिक्षणपद्धतीनं आम्हाला इंजिनिअर न करता फक्त डिग्री दिली आहे.
इंजिनिअरिंगच्या शिक्षणसंस्थांचा थेट संबंध अर्थकारणाशी. म्हणूनच संस्थेकडे विद्यार्थी ओढणं एवढंच त्यांचं टार्गेट. अशा संस्थांमधून पदवीधर झालेले अनेक; पण व्हॅल्यू शून्य असणारे प्रॉडक्ट.
मुलं घुसमटतात पण उघड बोलत नाही. मला वाटलं आपण बोलावं. त्यासाठी माझ्या हातात शॉर्ट फिल्म सारखं माध्यम होतं. मी यावर फिल्म करायची ठरवली. माझ्या विचारांना आर्थिक पाठबळ देणारेही भेटले. मी मग रिसर्चसाठी अनेक इन्स्टिट्यूटमध्ये गेलो. तिथल्या विद्यार्थ्यांशी बोललो. शिक्षकांशी बोललो. अनेक शिक्षकांना मी जे माझ्या फिल्ममधून मांडू पाहात होतो ते पटत होतं. काही शिक्षकांचंही हेच मत होतं की ‘इंजिनिअर घडवण्यात संस्था कमी पडता आहेत. शिकवण्याची पद्धत बदलणं, अर्थपूर्ण शिक्षण देणं खूप गरजेचं आहे; तरच चांगले इंजिनिअर घडू शकतील, आम्ही तसे प्रयत्नही करतो आहोत.’ असं जेव्हा शिक्षकच सांगत होते तेव्हा खूप मोरल सपोर्टही मिळत होता.
त्यानंतर मी ‘मॅन्यूफॅक्चरिंग इंजिनिअर्स’ ही १२ मीनिटांची शॉर्ट फिल्म तयार केली. इंजिनिअरिंग कॉलेजचं, आमचंच चित्र मी या शॉर्ट फिल्ममधून मांडलं आहे. इंजिनिअरची पदवी घेतल्यानंतर दोन वर्षांनी मी ही फिल्म केली. फिल्ममधून जे मांडायचं होतं ते मिळत गेलं आणि कोणतीही भीड न बाळगता, न संकोचता मी मांडलं.
आपलंच जगणं असं जगासमोर ठेवताना वेदना झाल्या; पण वास्तव मांडण्याचं बळ आपल्यात आहे हे वाटून धीर वाढला, अजून काय हवं?