ग्रामीण भागातल्या मुलींना पोलीस होऊन करायचंय स्वतःला सिद्ध !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2021 07:57 AM2021-02-04T07:57:06+5:302021-02-04T08:00:17+5:30

पोलीस भरतीचा ट्राय इण्ट्रो पोलीस भरतीसाठी अकॅडमी गाठणाऱ्या ग्रामीण भागातील मुलीच जास्त. घरचे म्हणतात, तीन वर्षे काय ते शिक, भरती हो, नाहीतर लग्न उरकून टाकू!

Prove yourself to be a policewoman for rural girls! | ग्रामीण भागातल्या मुलींना पोलीस होऊन करायचंय स्वतःला सिद्ध !

ग्रामीण भागातल्या मुलींना पोलीस होऊन करायचंय स्वतःला सिद्ध !

Next

-संतोष मिठारी

रांगडेपणासाठी प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूरच्या मुलींच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसकाही तसा रांगडाच. इथं त्या स्पर्धा परीक्षांपासून कुस्तीच्या आखाड्यापर्यंत आपली गुणवत्ता सिद्ध करत आहेतच; पण सध्या अनेकींना क्रेझ दिसते ती पोलीस भरतीची. कमी वयात सरकारी नोकरीची शाश्वती, वर्दीचं आकर्षण, काहीतरी वेगळं करून दाखवण्याची धमक म्हणूनही तरुणी पोलीस भरतीकडे पाहू लागल्या आहेत. त्यातही ग्रामीण भागातील मुलींचीच संख्या जास्त आहे. १८ ते २५ वयोगटामधील आहेत. गेल्या सात वर्षांपासून पोलीस भरतीकडे मुलींचा कल वाढता आहे. जिल्ह्यात दरवर्षी सुमारे ७० हजार जण पोलीस भरतीची तयारी करतात. त्यात सुमारे १४ हजार इतकी मुलींची संख्या असते. आणि कुठून येतात या मुली तर ग्रामीण, दुर्गम भागात राहणाऱ्या, शालेय, महाविद्यालयीन स्तरावर कब्बड्डी, जिम्नॅस्टिक, खो-खो, ॲथलेटिक्स, हॅण्डबॉलच्या खेळणाऱ्या मुली ‘जॉब ऑप्शन’ म्हणून पोलिसात जायचा रस्ता निवडतात. करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, चंदगड, गडहिंग्लज या तालुक्यांतील मुलींची संख्या यातही इतरांपेक्षा जास्त. शेतकरी, मध्यमवर्गीय किंवा निम्न मध्यमवर्गीय घरातल्या या मुली. पोलीस भरतीची तयारी करायची म्हणून काहीजणी कोल्हापूर गाठतात तर काहीजणी रोज २० - २५ किलोमीटरचा प्रवास कोल्हापूर शहरात दररोज ये-जा करतात. काहीजणी कुठंकुठं डाटा एंट्री ऑपरेटर, रिस्पेनिस्ट, मार्केटिंग, अशी कामं करतात आणि त्या पैसे जमवून शहरात सुरू असलेल्या भरतीचं प्रशिक्षण देणाऱ्या अकॅडमीत प्रवेश घेतात.

शारीरिक चाचणीच्या तयारीसह लेखी परीक्षेची तयारीही या अकॅडमीत करून घेतली जाते. अनेकजणी बारावी झाली की, लगेच किंवा काहीजणी दहावीनंतरच या अकॅडमीत प्रवेश घेतात. पोलीस भरती प्रशिक्षक भरत कांबळे सांगतात, ‘ बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर दोन- तीन वर्षे तयारी केली की शासकीय सेवेत जाण्याची संधी म्हणून मध्यमवर्गीय, सर्वसामान्य कुटुंबांतील मुली पोलीस भरतीचा विचार करतात. त्यातही ग्रामीण भागातील मुलींना हा पर्याय अधिक सोपा वाटतो.’ याच मताला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक अभय पाटीलही दुजोरा देतात. ते म्हणतात, ‘क्रीडा क्षेत्राशी संबंधित आणि ग्रामीण भागातील मुलींचं प्रमाण पोलीस भरतीचा विचार करणाऱ्यांत जास्त आहे.’

मात्र सोपं नसतं या मुलींसाठी हे सारं. बहुतांश मुली घरकामात, आई-वडिलांना शेतीच्या कामात मदत करून, शिक्षण सांभाळत पोलीस भरतीची अकॅडमीतही जाऊन शिकतात. इथं शारीरिक चाचणी हा पहिला टप्पा असतो. त्यामुळे या मुली रोज सकाळी तीन तास प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कसून सराव करतात. त्यात १०० मीटर, ८०० मीटर धावणे, गोळाफेक यांचा सराव असतो. त्यानंतर तीन ते चार तास लेखी परीक्षेचा अभ्यास करतात. या भरतीच्या तयारीसाठी एक मुलगी वर्षाला सरासरी ६० हजार रुपये खर्च करते. त्यात लेखी परीक्षेच्या क्लासेसची वर्षाची पाच हजार रुपये, फिजिकल (शारीरिक चाचणी) साठी सहा हजार रुपये खर्च होतो. ‌प्रवास, निवास आदींचा दरमहा साडेतीन ते चार हजार रुपये खर्च होतो.

मात्र, एवढं करूनही प्रत्येकीला संधी मिळते का? तर बारावीनंतर ग्रॅज्युएट होइपर्यंतचे तीन वर्षे घरचेही वाट पाहतात. या तीन वर्षांत भरतीचे प्रयत्न मुलीनं केले तर अनेकजण पाठिंबाही देतात; पण तेवढ्यात नाहीच झालं काही काही की पालक मुलींचे लग्न उरकून मोकळे होतात. लग्नानंतर सासरी राहून काही मुली भरतीची तयारी करतात; पण त्यांचं प्रमाण कमी आहे. त्यामुळे प्रत्येकीसाठी मिळणारी एकेक संधी महत्त्वाची असते. मात्र, पदं कमी, उमेदवार जास्त या चक्रात काही मुलींचं भरतीचं स्वप्नही स्वप्नच राहतं.

------------------------------------------------------------------------------------------------

मी शेतकरी कुटुंबातील आहे. पोलीस होण्याचं माझं लहानपणापासूनचं स्वप्न आहे. सध्या मी पदवीच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. गेल्या तीन वर्षांपासून मी भरतीची तयारी करत आहे. भरतीतील मुलींचा टक्का वाढविण्यासाठी शासनाने त्यांना कॉलेजपातळीवरच भरती प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करायला हवी.

-पल्लवी खोत, वड्डवाडी-दऱ्याचे वडगाव

 

( संतोष लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीत वार्ताहर आहे.)

santaji.mithari@gmail.com

Web Title: Prove yourself to be a policewoman for rural girls!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.