पुण्यातलं कॉलसेण्टर ते धुळ्यातला रेडिओ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 03:50 PM2018-06-21T15:50:45+5:302018-06-21T15:50:45+5:30
पुण्यात कॉलसेंटरमध्ये रट्टा मारला. ग्रामीण भागातल्या तरुणांच्या वाटय़ाला शहरात खासगी कंपन्यांत हल्ली असं राबणंच येतं. टार्गेट मोठं, पगारवाढ नाहीच हे धोरण. त्या चक्रव्यूहातून सुटलो तो केवळ रेडिओमुळे.
- राहुल पंडितराव ठाकरे
मी मूळचा यवतमाळ जिल्ह्यातल्या महागाव तालुक्यातल्या वाकोडी या गावचा. धड पोस्ट ही नसलेलं हे छोटसं गाव. आज बारा वर्षे झालीत गाव आणि घर सोडून. नवीन पिढीतली गावची मुलं तर आता ओळखतही नाहीत. घरी पण एका तासाच्या वर थांबू वाटत नाही. अगोदर अमरावती, नागपूर आणि नंतर पुणे या शहरात भटकल्यावर, संघर्ष केल्यावर आता कुठं स्थिरावलोय ! ग्रामीण भागातील मोठ्ठा तरुण वर्ग आपल्या ऐन तारुण्याचा मोठा काळ शहरातल्या कंपन्यांत राबतो. तुटपुंज्या पगारावर दिवस-रात्न काम करतो. सणावारालाही सुट्टी न घेता 12-14 तास डय़ुटी करतो, तरी महिन्याकाठी वांधे. अशाच तरुणांमधला मी पण एक. उरात दुर्खाचं वादळ घेऊन पुण्यातल्या स्वारगेट, पुणे स्टेशन, माळवाडी या भागात फिरलो. त्या काळात तुपाने हात धुणार्या आत्मकेंद्री माणसांच्या बोथट झालेल्या जाणिवा जवळून पाहिल्या. पण त्याचवेळेस माझा वर्गमित्र असलेल्या आणि नुकताच पुण्यात आलेल्या संतोष चापटने सांभाळून घेतले. त्याकाळी कॉल सेंटर्स आपल्याकडे नवीनच आले होते. भरपूर पगार तिथे असतो असं समजलं. पुणे आणि मुंबईत ही कॉल सेंटर्स जोरात चालत होती. कॉल सेंटरमध्ये कामाचा अनुभव असलेल्या सचिन देशमुख या पुसदच्या परिचयातील भल्या माणसानं बायो डाटा तयार करण्यापासून मुलाखत कशी द्यायची याच्या टिप्स दिल्या. सचिन मला चार-चारदा विचारायचा कॉल सेंटरच का? मग लक्षात आलं की तुटपुंजा पगार (पॅकेज), कामाच्या विचित्न वेळा, डोक्याच्या शिरा तोडणारे टार्गेट्स, न होणारे इन्क्रीमेण्ट्स आणि सतत वरिष्ठांची बोलणी, कितीही चांगला परफॉर्मन्स द्या काहीच प्रगती नाही. हे सारं अनुभवलं आणि या ताणातून कॉलसेंटरचा राजीनामा दिला आणि परत हडपसर (फुरसुंगी) मधल्या एका मोठय़ा अन् हाय-फाय कॉल सेंटरला जॉइन झालो. हे बरं होतं. पिकअप-ड्रॉप सुविधा, कॅन्टीनमध्ये सतत उपलब्ध असलेला भरपूर चहा, कॉफी आणि दूध, परदेशी ऑफिसेस सारखी अतिउच्च स्वच्छता आणि अतिशय लॅविश वातावरण, काही काळ बरं चाललं.
गावी असताना आकाशवाणी यवतमाळ आणि रेडिओ खूप ऐकायचो, इतकं की भारतातील सगळ्या रेडिओ केंद्राचं प्रसारण संपल्यावर पहाटे थेट 2-3 वाजेर्पयत बीबीसी अमेरिका आणि बीबीसी इंग्लंडही ऐकायचो. तेव्हा माझ्या पडत्या काळात रेडिओने साथ दिली. पुढे नागपूरला गेलो तेव्हा नागपुरात नव्यानंच खासगी एफएम सुरू झाले होतं. नागपूर आणि मग नंतर पुण्यात संघर्षाच्या काळात खासगी एफएम होतेच. इतके की कॉल सेंटरमधली नाइट शिफ्ट रात्नी 1 वाजता संपली की रूमवर पोहोचायला आणि रात्नीचं जेवण होता होता पहाटेचे 3 वाजायचे तेव्हाही मोबाइलमधला एफएम होताच. असा मी पूर्ण एफएममय झालो होतो. सूत्नसंचालनाची थोडीफार आवड होती. थोडा आकाशवाणी यवतमाळवर सादर केलेल्या कार्यक्रमांचा अनुभव होता. त्याच काळात एफएमचं रूप बदललं. याच क्षेत्नात काहीतरी करावं हा विचार मनात येऊ लागला, मग आप्पा बळवंत चौकात आर.जे.चं ट्रेनिंग देणार्या एका खासगी कार्यालयात गेलो आणि ट्रेनिंग फी ऐकून गार झालो. एकंदरीतच आपल्यासोबत जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. कॉर्पोरेट कंपन्यांमुळे एकीकडे माझ्या पायाला वेगाची चाकं बांधली गेली होती. सोबतच वेळेत काम पूर्ण करणं, एकाच वेळेस अनेक सॉफ्टवेअर हाताळणं या गोष्टींचा भाग बनवलं तर दुसरीकडे सामुदायिक रेडिओच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्रातून जिवाभावाची माणसं दिली.
एके दिवशी पुण्यावरून गावी जाताना पुसदच्या बस स्टॅण्डवर अमोल देशमुख हा माझा महाविद्यालयीन मित्न भेटला. त्याच्याकडून वाशीमच्या कृषिविज्ञान केंद्राला, सामुदायिक रेडिओ केंद्राला सूचना आणि प्रसारण मंत्नालयाकडून परवानगी मिळाल्याचे कळालं आणि मीदेखील अर्ज केला. महाराष्ट्रातून 40 प्रशिक्षणार्थीमधून आम्हा चौघांची निवड झाली. 2010 सालापासून सामुदायिक रेडिओ केंद्र या क्षेत्नात आहे. येथे मनोरंजनापेक्षा जनजागृतीपर कार्यक्रमनिर्मिती यासोबतच विविध यशोगाथा समोर आणणं, परिसरातील कला आणि संस्कृतीला व्यासपीठ देणं हा सामुदायिक रेडिओ केंद्राचा मुख्य उद्देश. मागील एका वर्षापासून आदिवासीबहुल धुळे जिल्ह्यातल्या जेबापूर-पिंपळनेर या दुर्गम भागात लुपिन फाउण्डेशन धुळे द्वारा संचलित रेडिओ पांझरा या सामुदायिक रेडिओ केंद्राच्या माध्यमातून आदिवासी श्रोत्यांर्पयत विविध यशोगाथा पोहोचविण्यासोबतच लोकशिक्षण, आरोग्य, सरकारी योजना, राष्ट्र उभारणीसाठी विविध व्यक्ती आणि संस्थांचे योगदान इ. विषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. सोबतच धुळे जिल्ह्यातल्या पश्चिम पट्टय़ातील आदिवासी संस्कृती आणि लोण्याहून मऊ असलेली अहिराणी भाषा शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
कधीकाळी शहरांच्या गर्दीत एक स्वप्न पाहिलं होतं. दूर डोंगराळ भागात डोंगराच्या पायथ्याशी गुराख्यांची गर्दी आणि बाजूला रेडिओ केंद्राचा स्टुडिओ असावा. पहिल्या पावसाचा गंध आणि पाखरांचे आवाज ऑन एअर स्टुडिओतून अनुभवता यावेत. समोर मायक्रोफोन आणि कानाला हेडफोन आणि डोंगराच्या पायथ्याशी माझं बोलणं.
अगदी तसंच आहे सगळं आता. स्वप्न खरं झालंय.
वाकोडी, ता. महागाव, जि. यवतमाळ
(पिंपळनेर, ता. साक्री, जि. धुळे येथे लुपिन फाउण्डेशन धुळे द्वारा संचलित रेडिओ पांझरामध्ये केंद्र समन्वयक म्हणून कार्यरत आहेत.)