मालेगाव ते मुंबई व्हाया पुणे
By admin | Published: March 10, 2017 01:07 PM2017-03-10T13:07:44+5:302017-03-10T13:07:44+5:30
वडिलांचा साड्यांचा पारंपरिक धंदा आणि एक मोठं १६ जणांचं कुटुंब. त्या धंद्यात मला कधीच रस नव्हता. पुण्याला जाऊन एलएलबी करायचं आहे असं सांगून मी मालेगाव सोडले.पुण्यात काही दिवस काम केल्यानंतर मला मालेगावात जायची इच्छाच उरली नाही. आणि म्हणून मग एक दिवस थेट मुंबई गाठली.
Next
>लकीराज इंदोरकर.
अॅडव्होकेट, मुंबई.
मी मूळचा मालेगावचा. छोट्या शहरातला एक सर्वसाधारण तरुण. माझी स्वप्नं काही खूप मोठी नव्हती. पण मला मालेगावातून बाहेर पडायचं होतं. वडिलांचा साड्यांचा पारंपरिक धंदा आणि एक मोठं १६ जणांचं कुटुंब. त्या धंद्यात मला कधीच रस नव्हता. मला पुण्याला जाऊन एलएलबी करायचं आहे असं सांगून मी बाहेर पडलो. मला कुठच्या बाबतीत काही विरोध करण्याची वडिलांची आणि आईची पहिल्यापासून अशी काही सवय नव्हती. कारण मी विरोध करण्यासारखा कधी वागलोच नाही. १९९९ ला पुण्याच्या लॉ कॉलेजला अॅडमिशन घेतली. २००४ ला पास आउट झालो. सुदैवाने कधी कुठला विषय न राहता लॉ सुटलो. बरेच खास मित्र झाले. लॉ करून परत मालेगावच्या कोर्टात प्रॅक्टिस करायची अशी सुरुवातीला माझी योजना होती. मी म्हणायचो छोट्या तलावात मोठा मासा म्हणून मला राहायला आवडेल. माझे मित्र त्या वाक्यावर अजूनही माझ्यावर हसतात. पण माहीत नाही, पुण्यात काही दिवस काम केल्यानंतर मला मालेगावात जायची इच्छाच उरली नाही. एक दिवस थेट मुंबई गाठली. ना कुणाची ओळख, ना कुणाचा वशिला आणि ना कुणाचं मार्गदर्शन. आता बस मुंबई हायकोर्टात प्रॅक्टिस करायची हे एकमेव ध्येय. आत्याच्या घरी मी माझं बस्तान टाकलं. लागलीच मुंबई विद्यापीठात एलएलएमचा फॉर्मसुद्धा भरला.
त्यानंतर सुरू झाली माझी खरी खटपट. सकाळी उठणं, तयार होणं आणि बॅगेत माझा बायोडाटा टाकून लोकल पकडून वाशीवरून थेट फोर्ट गाठणं. त्यावेळेस मला एकच काम. वकिलांना भेटायचं आणि मला तुमच्यासोबत काम करू द्या अशी विनंती करायची. पण मी एका मोकळ्या बैलाप्रमाणे सगळीकडे नुसता धडकत होतो. विना वशिला आणि ओळखीविना मला कुठलेच स्थापित वकील त्यांच्यासोबत काम करण्यास उभेसुद्धा नव्हते करत. कुणी म्हणायचं ‘पुढच्या आठवड्यात ये’ तर कुणी ‘नंतर पाहू’. एकदा सकाळच्या वेळेस वकिलांना भेटून झालं की मी हायकोर्टसमोरच्या मुंबई विद्यापीठातील लायब्ररीत जायचो आणि तिथे एलएलएमच्या पहिल्या सेमिस्टरचा दिवसभर अभ्यास करायचो. लंच ब्रेकमध्ये पैसे वाचावे म्हणून दोन वडापाव आणि एक ग्लास उसाचा रस प्यायचो. दहा रुपयात दुपारचं जेवण आटोपलं की जे. एस. हॉल जे मुंबई विद्यापीठाचे होस्टेल आहे तिथल्या रेक्टरला भेटायचो आणि विनवणी करायचो की मला होस्टेलला अॅडमिशन द्या. पूर्ण आॅगस्ट ते सप्टेंबर २००४ माझा असाच दिनक्रम होता. काम मिळेनासं झालं म्हणून आत्याच्या घरी राहायला पण लाज वाटू लागली. पण मी धीर सोडला नाही.
असाच एक दिवस भटकत होतो आणि कॉलेजच्या एका सिनिअर मित्राला फोन लावला आणि त्याला माझी सगळी कैफियत सांगितली. तो मला भेटला आणि म्हणाला ‘काय ठरवलंस’. मी अगदीच उदास स्वरात म्हणालो ‘माहीत नाही’. तो मित्र एका लॉ फर्ममध्ये काम करत होता. लॉ फर्ममध्ये माझं काम करायचा कधीच मनसुबा नव्हता. हे मी त्याला बोललोही. पण तो म्हणाला किती दिवस असा भटकशील? त्याने मला त्याच्या फर्ममध्ये माझा बायोडाटा टाकण्यास सांगितला जो मी तत्काळ त्याच्या हातात दिला.
काहीच हालचाल होत नसल्यामुळे मी भयानक विचलित झालो होतो. अशा या परिस्थितीत एक दिवस आत्याच्या मिस्टरांसोबत ट्रेनमध्ये फोर्टला यायला निघालो. सप्टेंबर २००४ चा शेवटचा आठवडा होता. मामा त्यांच्या स्टेशनवर उतरायला उभेच राहिले होते तितक्यात आत्याचा फोन आला की, माझ्यासाठी इंटरव्ह्यूचा कॉल आला होता आणि आत्याने तसा निरोप मला देण्यास सांगितले. माझ्याकडे मोबाइल नसल्यामुळे मी आत्याच्या घरचा नंबर बायोडाटावर दिला होता. ही तीच लॉ फर्म जिथं माझा मित्र काम करत होता. ज्याच्या सांगण्यावरून मी माझा बायोडाटा त्याला दिला होता. मी आपला जीन्स आणि टी-शर्टमध्ये. माझी तारांबळ उडाली. तरी हिंमत करून तसाच इंटरव्ह्यूला पोहोचलो आणि आधी माफी मागितली की, माझे कपडे बरोबर नाही. थोडे फार प्रश्न विचारून, अपेक्षा विचारून त्या मॅडम म्हणाल्या की कळवतो म्हणून. एकदोन दिवस गेले आणि मग कॉल आला की १ आॅक्टोबर २००४ पासून कामावर या म्हणून. आनंद गगनात मावत नव्हता. त्याच दिवशी नित्यनेमाने होस्टेलला गेलो रेक्टरला भेटायला. त्या दिवसात काय होते देव जाणे. रेक्टरने सरळ एक चावी हातात दिली आणि म्हणाल्या ‘तुला होस्टेल देतो आहे आणि लवकरात लवकर फी भर’. मला काही सुचेनासं झालं. अचानकच दोन्ही गोष्टी म्हणजे काम आणि राहण्याचं ठिकाण एकाच दिवशी पदरात येऊन पडल्या.
होस्टेलला शिफ्ट झालो. नवीन पर्व सुरू झालं होतं. दोन वर्ष त्या फर्ममध्ये अगदी लहान पगारावर काम करत काढले आणि त्यासोबत एलएलएमदेखील पूर्ण केले. आॅगस्ट २००७ ला अजून मोठ्या फर्ममध्ये कामाला लागलो. मोठया फर्ममधली लोकही मोठी. जणू एक नवीन वास्तव समोर आले. सुरुवातीला घाबरलो पण हळूहळू कळू लागले की, ही मोठी लोकं आपल्यासारखीच आहेत पण फक्त स्वत:ला न बदलता त्यांच्यासारखं आणि त्यांच्यामध्ये कसं राहायचं हे शिकायला हवं. तसं केलं आणि बदल घडायला लागला. भीती गेली आणि दडपणंही संपली. कधी विचार केला नव्हता असे लोक जिवाभावाचे मित्र बनले. उन्नती होत गेली. कधी कुठचा विचार केला नाही फक्त दिवस रात्र काम केले.
आता जेव्हा मी स्वत:चा प्रवास आठवतो त्यावेळेस जाणवते या मुंबईने मला कसे तिच्या कुशीत घेऊन एका बाळासारखे मोठे केले. ‘मुंबा-आई’ म्हणजेच मुंबई या शब्दामधेच आई नाव दडलं आहे. मुंबईने मला एका आईसारखं जपलं. मुंबईने मी काहीही न मागताच मला सर्व काही दिलं. मालेगाव सोडताना कधीच ठरवलं नव्हतं की या अशा प्रकारे माझी प्रगती होईल. पण ते शक्य झाले केवळ नितांत मेहनतीने आणि मुंबईमुळे. मुंबईत येऊन आता १२ वर्षे झाली. आज मी भारतात टॉपमध्ये मोजल्या जाणाऱ्या लॉ फर्ममध्ये मोठया हुद्द्यावर कामावर आहे. पैसा आहे, स्वत:चं घर आहे. गाडी आहे. सर्व सुखसोयी आहेत. हे शक्य झाले केवळ मुंबईमुळे. ती फक्त एकच पाहते. तुमचे कष्ट आणि इमानदारी. आणि जर तुम्ही नि:स्वार्थपणे काम केले तर ती तुम्हाला नक्की सांभाळून घेते. माझ्यासारखा प्रवास रोज शेकडो लोक त्यांच्या जीवनात करत असतील. मला माहीत नाही की ते लोक कितपत यश मिळवितात. पण हे मात्र खरे आहे की, मुंबई कधीच कुणाला निराश करत नाही आणि येणाऱ्या काळातसुद्धा करणार नाही. मुंबई म्हणजेच माझी दुसरी आई आणि तिला माझा सलाम!!!