पोलीस अधिकारी ते मिसेस इंडिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 08:00 AM2019-07-25T08:00:00+5:302019-07-25T08:00:00+5:30
पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या प्रेमा पाटील. त्यांनी रॅम्पवर पाय ठेवला आणि मिसेस इंडिया ही स्पर्धाही जिंकली.
-नेहा सराफ
लहानपणी स्वप्नं सगळेच पाहतात. ती खरी होतील असंही मनात असतंच; पण मोठं होता होता, काही स्वप्न डोळ्यातून पुसली जातात, तर काही निसटून जातात.
मात्र आपल्या स्वप्नांवर भरवसा असेल तर ती स्वप्नंही आपल्याला साथ देतात. नुसतं हिरमुसून न जाता, मनात न कुढता प्रयत्नपूर्वक ती स्वप्न प्रत्यक्षातही उतरवता येतात.
त्याच जिद्दीचं एक खणखणीत उदाहरण म्हणजे, पुणे पोलीस दलातील विशेष शाखेच्या सहायक पोलीस निरीक्षक प्रेमा विघ्नेश पाटील.
त्यांनी एक अशी कामगिरी केली आहे की, त्यामुळे अनेकांचा आपल्या स्वप्नांवरचा आणि ते पूर्ण करण्याच्या प्रयत्नांवरचा विश्वास वाढीस लागावा. इन्स्पेक्टर प्रेमा यांनी व्यावसायिक मॉडेल्सना मागे टाकून अलीकडेच ‘रिनिंग मिसेस इंडिया 2019’ हा किताब पटकावला आहे.
सांगलीतील पलूसजवळील पुणदी या लहानशा गावाच्या असलेल्या प्रेमा. त्या फक्त सुंदर नाही तर बुद्धिमान, कर्तव्यनिष्ठही आहेत. 2011 पासून त्या पोलीस दलात काम करतात. त्यांच्या घरी अत्यंत साधं वातावरण होतं. घरात कोणीही मॉडेलिंग करणं तर लांबच, पण फॅशन शोही कधी प्रत्यक्ष बघितला नव्हता. महावितरणमध्ये त्यांचे वडील नोकरीला होते. आई गृहिणी आणि दोन भाऊ. सासरी पती विघ्नेश आणि दोन वर्षाचा मुलगा रणविजय. पोलीस दलात त्या नोकरीला लागल्या. मात्र कुणाही सामान्य मुलीला असणारी उत्तम दिसण्याची आवड त्यांनाही होती. अर्थात, आपण अशा कुठल्या स्पर्धेत भाग घ्यावा असा विचारही त्यांच्या मनात कधी आला नव्हता. त्यांच्या पतीने आग्रह केला म्हणून फेसबुकवरून त्यांनी या स्पर्धेसाठी नोंदणी केली; पण ही नोंदणी तर फक्त सुरु वात होती एका मोठय़ा प्रवासाची. महिला पोलीस कठोर असतात हा विचारही त्यांना यातून मागे टाकायचा होता.
त्यानंतर फोनवरून मुलाखती झाल्या आणि प्रत्यक्ष तीन दिवसांचे ग्रुमिंग सेशन झाले. त्यांना अगदी कसे चालायचे, हसायचे कसे असे अनेक नियम सांगण्यात आले. एकदा ठरलं की ते तडीस न्यायचंच या स्वभावानुसार मग प्रेमा यांनीही ही स्पर्धा मनावर घेतली. उंच टाचांचे सँडल्स घालायचा सराव तर त्यांना अजिबात नव्हता. सगळा पोलीस कडक शिस्तीतला आजवरचा वावर. पण त्यांनी मग अगदी घरातही हिल्स घालून चालण्याचा सराव केला. कोरिओग्राफरकडून जुजबी नृत्यही त्या शिकल्या. एकापाठोपाठ होणार्या फेर्या त्यांनी लीलया पार केल्या आणि अखेर स्पर्धेचा दिवस उजाडला. अंतिम स्पर्धकांमध्ये त्यांच्यासह मातब्बर स्पर्धक होते. परीक्षकांनी विचारलेला शेवटचा प्रश्न होता तुमचा स्टाइल आयकॉन कोण आहे? त्यावर क्षणाचाही विलंब न करता त्यांनी उत्तर दिले किरण बेदी. मी त्यांना बघूनच पोलीस दलात आले. .
स्पर्धा संपली आणि त्या विजेत्या ठरल्या. याशिवाय वुमन विथ सबस्टन्स या किताबानेही त्यांना गौरविण्यात आले.
प्रेमा सांगतात..
या प्रवासाविषयी त्या म्हणतात, प्रत्येकीने स्वतर्साठी वेळ देण्याची गरज आहे. सोशल मीडिया, डाएट अशा दिखाऊ गोष्टींपेक्षा स्रीने तिच्यासाठी जर वेळ दिला तर तिला काहीच अवघड नाही. मी अनेक वर्षापासून नियमित व्यायाम करते. अगदी मला आवडेल त्या प्रकारात करते. अनेकदा आम्हाला 24 तासही काम करावं लागतं; पण व्यायाम आणि स्वतर्साठी वेळ देणं थांबवलं नाही. स्वतर्शी संवाद सुरूच ठेवला आणि इथंर्पयत पोहोचले. शेवटी आयुष्य एकदाच मिळतं मग त्यात आवडत्या गोष्टींना का मिस करायचं? जी स्री सगळ्या जगाचा गाडा चालवते तिच्या अफाट इच्छाशक्तीपुढे आकाशही झुकू शकतं. गरज फक्त आपल्या एका संकल्पाची आहे.
तोच संकल्प त्यांनी केला आणि एका वेगळ्या जगातही आपला ठसा उमटवला..
‘आजवरच्या प्रवासात दोन पुरु ष माझ्यापाठी खंबीरपणे उभे राहिले. एक म्हणजे वडील आणि दुसरे पती. वडिलांनी त्यांच्या पोलीस दलात काम करण्याच्या इच्छेला मान दिला, तर पतीने स्पर्धेच्या वेळी तू हे करू शकतेस असा विश्वास दिला.’ ही स्पर्धा जिंकल्याचे समजल्यावर संपूर्ण पोलीस दलाने त्यांचे कौतुक केले आहे. अनेक अधिकार्यांनीही अगदी आपुलकीने आणि अभिमानाने अभिनंदन केले. त्याचाही त्यांना विशेष आनंद आहे.
(नेहा लोकमत ऑनलाइन पुणे आवृत्तीत कार्यरत आहे.)