शुद्ध पाणी. एक रुपयांत एक लिटर. तेही एटीएममधून.
By admin | Published: May 9, 2017 04:02 PM2017-05-09T16:02:33+5:302017-05-09T16:02:33+5:30
तरुणांच्या प्रयत्नांनी तहानलेल्या गावकर्यांची भागवली तहान.
Next
- ऑक्सिजन टीम
तरुणांनी ठरवलं तर काहीही होऊ शकतं. अगदी इकडची दुनिया ते तिकडे करू शकतात हे अनेक वेळा सिद्ध झालं आहे. त्याचंच प्रत्यंतर ग्रामीण भागातील तरुणांनी पुन्हा एकदा दिलं आहे. आपल्या गावातील लोकांची तहान भागवण्याचा प्रय} करताना त्यांनी चक्क आता एटीएममधूनच तहानलेल्या लोकांना पाणी उपलब्ध करून दिले आहे. केवळ एक रुपयांत आता एक लिटर, तेही अतिशय शुद्ध पाणी मिळण्याची सोय गावकर्यांसाठी आता उपलब्ध झाली आहे.
गेल्या वर्षी पावसानं चांगला हात दिला असला तरी उन्हाळा सुरू होताच अनेक ठिकाणी पाण्यासाठी दाही दिशा सुरू झाल्या आहेत. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी तर पिण्याच्या पाण्याच्या टंचाईनं नागरिकांची तलखी होतेय.
रानोमाळ भटकूनही पाणी मिळत नाही.
ते शुद्ध असेल याचीही गॅरंटी नाही.
बहुदा ते नसतेच.
मग काय करता येईल?
पण त्यावरही काही जणांनी उत्तम उपाय काढलाय.
यात तरुणांचा सहभाग मोठय़ा प्रमाणात आहे.
काय आहे हा उपाय?
नाशिक जिल्ह्यातील कळवणकरांसाठी पाण्याची टंचाई नेहमीचीच. पण या टंचाईवर मात करण्यासाठी यावेळी एक अनोखा उपाय शोधून काढण्यात आला.
पाण्यासाठी थेट एटीएमचीच निर्मिती करण्यात आली!
कळवण शहरातून आता पाण्याची एटीएम व्हॅन फिरणार असून त्याद्वारे नागरिकांना स्वच्छ पाणी मिळणार आहे.
तेही फक्त एक रुपयांत एक लिटर!
नाशिकच्या प्रथमेश एंटरप्राइजेसने पाण्याच्या एटीएमची निर्मिती केली आहे.
कळवण जलतृप्ती योजनेंतर्गत कळवणकरांना आता हवे तितके शुद्ध पाणी ‘जीवनधारा मोबाइल वॉटर एटीएम’ या पाण्याच्या एटीएममधून मिळणार आहे.
त्यामुळे पाण्याचे एटीएम देणारे कळवण हे उत्तर महाराष्ट्रातील दुसरे ठिकाण ठरणार आहे.
या योजनेचा नुकताच शुभारंभ करण्यात आला.
पाण्याची तहान भागवणारे हे एटीएम गावागवांत बसविण्यांत यावे आणि त्यासाठी तिथल्या तरुणांनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा आता इतरही पाणीटंचाईग्रस्त गावांतून होऊ लागली आहे.
काही गावांत त्यासाठीची तयारीही तरुणांनी सुरू केली आहे.