टाकू एकदाचं उरकून! असं म्हणत कामं करत असाल तर स्वत:ला विचारा की, असं का वागतो आपण?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 07:00 AM2017-09-28T07:00:00+5:302017-09-28T07:00:00+5:30

काम कुठलंही असो, अनेकांच्या कपाळावर आठ्याच पडतात. शक्यतो काम टाळलंच जातं, आणि मग अगदीच गळ्याशी आलं की, कसंही करून टाकू एकदाचं ते उरकून म्हणत घाई करत, कसंबसं ते करून टाकलं जातं. मग त्या कामात काही मज्जा नाही येत, रटाळ, निरस वाटतं ते काम कधी काम संपत नाही, कधी त्यातला कंटाळा, असं का होतं?

Put off once! If you are saying this, then ask yourself, why do you behave like this? | टाकू एकदाचं उरकून! असं म्हणत कामं करत असाल तर स्वत:ला विचारा की, असं का वागतो आपण?

टाकू एकदाचं उरकून! असं म्हणत कामं करत असाल तर स्वत:ला विचारा की, असं का वागतो आपण?

Next

प्राची पाठक

घाई, घाई आणि मग खूपच घाई...
असेच आयुष्यातल्या किती तरी गोष्टींबद्दल होते.
‘चला, उरकून टाकू एकदाचे’ स्पिरिट.
जे उत्कृष्ट उरक-काम करतात, त्यांना काहीजण ‘गो गेटर’ अशी पदवीदेखील देतात. काम झाल्याशी मतलब. काही ठिकाणी हा गुण असूदेखील शकतो; पण काम झाल्याशी मतलब हा विचार अनेक ठिकाणी त्या कामाला मारकदेखील ठरू शकतो.
कसंही करून उरकून टाकणं, केल्यासारखं करणं, करावं लागतं म्हणून करणं ही शिक्षा होऊन बसते. निरस आणि कंटाळवाणं होतं ते काम. एका कामातली घाई प्रत्येक गोष्टीत उतरत जाते. इतरांकडे पास आॅन होते. सगळे आपले घाईत. सगळे गॅसवर. कर कर पटकन कर. डोक्यात तेच. जेव्हा घाईत एखादे काम करायला तुम्ही कुठे निघतात तेव्हा ती घाई शरीरावर पण रिफ्लेक्स होते. सिग्नलला पन्नास- शंभर गाड्या थांबलेल्या असतात. काहीजण सतत अ‍ॅक्सिलरेटर मागेपुढे पिळत असतात. गाडी पुढे मागे करतात. कुठून कुठून घुसून पुढे येतात. त्यांना अगदी घाईत कुठेतरी जायचं असतं. कधी घाई नसेल, तरी सवयच इतकी होऊन जाते शरीराला की निवांत दिवशीदेखील सिग्नलवर आपण असेच स्पीड कमी-जास्त करत उभे राहतो. थांबायची, पहायची सवयच कमी झालेली असते.
अमुक काम कमीत कमी वेळात करून देखील कामाचा दर्जा राखला जात असेल, बारकावे बघितले जात असतील आणि त्या कामामुळे पुढे काय काय आणि कसे होऊ शकतं? याचं भान राखलं जात असेल, तर ती योग्य घाई, असं ढोबळमानाने म्हणता येईल. ‘तो ना काय फटाफट काम करून जातो’, असे जेव्हा म्हटलं जातं तेव्हा ते काम तो कसं करतो, हे ही बघणं महत्त्वाचं असतं. सरावानं वाढणारा स्पीड वेगळा असतो आणि करायचं म्हणून काम करून टाकताना ते काम पटकन होणं ही गोष्ट वेगळी असते. कधी कधी खूप साचू नयेत याही हेतूनं कामं करून टाकू बाबा, असं मनात येतं. तेव्हाही आळस, कामाचं प्रेशर, नंतर वेळ मिळेल की नाही ही अनिश्चितता, त्या त्या वेळी असणाºया सोयी-सुविधा, मनुष्यबळ, आपली क्षमता अशा अनेक गोष्टी मनात येत असतात.
‘उरकून टाक एकदाचं’ असं अगदी शाळेतल्या अभ्यासापासून ते लग्नापर्यंत सर्वांविषयी सर्रास बोललं जातं. ‘अरे, हे करून टाक. मग आहेच की तुझा मोकळा वेळ...’ असं आमिष असते वरतून. वेळच्या वेळी सगळे झाले पाहिजे, असा हट्ट करणारे कुणी असतात. हा वेळच्या वेळी मंत्र अनेक बाबतीत कामास येऊ शकतो; पण ‘उरकून टाक लग्न वेळच्या वेळी’ हे अत्यंत फसवं असू शकतं. साधा टॉप घेताना आपण चारवेळा ठरवतो. कुठून, कधी, कोणता, रंग काय, आपली साइज काय, किंमत काय? पण ‘करून टाक लग्न वेळच्या वेळी’ याच्या नाड्या इतरांच्याच हातात. बोलायची सोय नाही. वर उरकून टाक ही घाई. अमुक गोष्ट का करायची आहे, कशी करायची आहे, आपण ती करू शकतो का, कधी-कुठे-कशी करू शकतो, करू शकत नसू पण करायची आहे तर काय बदल आधी करावे लागतील, करायचीच नसेल तर का, या प्रश्नांना पुरेसा वेळ न देताच ‘उरकून टाक’ ताण वाढत जातो.
सतत कोणीतरी मागे लागतं, अमुक कर. ते झालं की तमुक कर. नाहीतर आपण तरी आपल्याच मनाच्या कोणत्या तरी इशाºयांवर कशाच्यातरी पाठी लागलेलो असतो. घाईत सगळ्या गोष्टी करतो.
अंघोळ करायची? आटपा घाईत.
कपड्यांच्या घड्या घालायच्या हे काय फालतू काम असं म्हणतो. खरं तर कापडाला घडी घालणं हीसुद्धा एक कला आहे; पण ते कोण शिकतं, आपण म्हणतो उरकून टाका.
भांडी घासायची? घासलेली भांडी मांडण्यांमध्ये लावायची. नुस्ती आटपआपट, आदळआपट!
डोक्यात एकच, काय कटकट आहे.
जेवायचे पण घाईतच. मग कोणीतरी जेवताना अजून एक काम होईल म्हणून टीव्ही बघतं. मोबाइल घेऊन बसतं. जेवायच्या वेळेत कसे मल्टिटास्किंग केलं याचं स्वत:च कौतुक करून घेतं.
‘शांत-निवांत आणि संथ’ला फारसा स्कोपच नाही.
खरं तर नीट विचार करून, पुरेसा वेळ घेऊन केलेलं काम अतिशय चांगल्या दर्जाचं होतं आणि पुन्हा त्यात खुसपट काढत बसायची गरज फारशी येत नाही. त्याचं पुढचं-मागचं-आजूबाजूचं नीट कळू शकतं. एखादा प्रोजेक्ट करायचा म्हणून करणं तर काय कॉपी-पेस्ट करूनही करता येऊच शकतं. तसंच करतात अनेकजण. झेरॉक्स तर असतातच मदतीला. कर झेरॉक्स, मार रट्टा, नाहीतर मोबाइलवर वाचन! पण तेच काम त्यात रस घेऊन केलं तर कायमस्वरूपी काहीतरी शिकवून जातं. एकाच गोष्टीकडे बघायच्या नवीन बाजू दिसतात. इतर कुठल्या कामात हा अनुभव वापरता येऊ शकतो. कशाचं तरी काहीतरी आपल्याकडून नीटच झालेलं आहे, ही भावना आत्मविश्वासदेखील वाढवते. निदान त्या गोष्टीतील खाचखळगे तरी नीट कळतात आपल्याला. असे बारकाव्यात जाणं इतर ठिकाणी वापरता येतं. ती ही गोष्ट छान समजून घेता येतं आणि दर्जेदार कामाची सवय लागते.
‘कर कर- उरकून टाक’ मध्ये गो गेटर स्पिरिट असलं तरी कामाच्या दर्जाची खात्री पण आणता आली तर क्या कहने...
शांत बसू एक दिवस, कुठे कुठे घाईत कामं करतोय ते लिहून काढू, समजून घेऊ आणि वेळेचं अधिक चांगलं नियोजन करू.
करून तर पाहू, नक्की जमेल!

‘भाऊ, ताई जरा दमानं...’ असं कधी म्हणणार आपण स्वत:लाच?
बरं दमानं घ्यायचं म्हणजे तासन्तास बसून रहायचं. हलायचंच नाही असं नाही.
दमाने घेतानाही गाडी दमच खात बसलीये, ढिम्म हलत नाही, याही स्टेजला जायचं नसतं. नाहीतर, एकच काम दिवस दिवस धरून बसावं लागते. तसंही व्हायला नको.
कामाचा विचार शांतपणे करून, अपेक्षित वेळ हाताशी ठेवून, नियोजन करून काम वेळेत पूर्ण करणं काही फारसं अवघड नसतं. आपण ते करत नाही, इतकंच!

Web Title: Put off once! If you are saying this, then ask yourself, why do you behave like this?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.