वेळासच्या वाळूत कासवांची शर्यत
By Admin | Published: April 26, 2017 04:58 PM2017-04-26T16:58:46+5:302017-04-26T16:58:46+5:30
लहानपणीची ससा कासवाची गोष्ट आठवली आणि हसू आलं कारण गोष्टी प्रमाणेच इथेही कासव जिंकलं होतं!
>- स्नेहा ताम्हणकर
परीक्षा संपल्या. मार्च एण्ड संपून तेही जरा रिलॅक्स झालेत. मे महिना जवळ येऊन ठेपलाय आणि घराघरात प्लॅन्स सुरु झाले सुट्टीत बाहेर जायचे.
आमच्याही घरात पार स्वित्झर्लंड, मलेशिया पासून काश्मीर कन्याकुमारी पर्यंतच्या सगळ्या डेस्टिनेशन्स वर चर्चा करून झाली. बाहेर फिरायला जायचं म्हटलं की पैसे तर लागणारच पण जर फिरण्याबरोबरच काही नवीन इंटरेस्टिंग, बोअर न होता शिकायला मिळालं तर खर्च केलेले पैसे पण सार्थकी लागल्याचं समाधान असतं.
मग ठरलं कोकणात वेळासला जायचं. तिथे दरवर्षी एप्रिल मे मध्ये कासव महोत्सव असतो. जोडून आलेल्या सुट्ट्यांचं औचित्य साधून आम्ही निघालो कोकणाच्या दिशेने. वेळास हे अगदी छोटंसं गाव आहे. तिथं राहण्यासाठी हॉटेल्स नाहीत. पण या कासव महोत्सावाच्या निमित्ताने इथले स्थानिक आपापल्या घरात पर्यटकांची राहण्याची सोय करतात. त्यातून त्यांनाही उत्पन्न मिळतं. पण या महोत्सवाचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे कासवांचं संवर्धन.
पुण्यामुंबई पासून इथे पोहोचायला साधारण 6 तास लागतात. दुसर्या दिवशी भल्या पहाटे उठून आम्ही बीच वर निघालो. एका ठराविक ठिकाणापर्यंत गाडी जाऊ शकते. तिथेच आपल्या कानांना समुद्राचे सूर ऐकू येऊ लागलेले असतात. त्या ओढीने नंतर पूर्ण पायवाटेचा प्रवास करून सुरुच्या बनातून आपण येऊन पोहचतो अफाट समुद्र किनार्यावर! तिथे आल्यावर काही भाग जाळी लावून बंद केल्याचं आपल्याला दिसतं. सगळ्यांना त्याभोवती थांबण्याचे आदेश दिले जातात.
मग एक स्वयंसेवक माहिती आणि सूचना देऊ लागतो. त्यानं काही नियम सांगितले. त्यांचं सगळ्यांनी व्यविस्थत पालन केले. मग तो माहिती देऊ लागला. ही कासवं ऑलिव्ह रिडले नावानं ओळखली जातात. साधारण ऑक्टोबर - नोव्हेंबर मध्ये मादा समुद्र किनार्यावर येऊन रात्नीच्या वेळेस वाळूत खोलवर अंडी घालते. जवळपास 80 ते 120 अंडी ती एकावेळेस घालू शकते. पण बरेचदा ही अंडी कुत्ने, लांडगे आणि काहीवेळेस माणसं पळवून नेतात. पण 2002 पासून सह्याद्री निसर्ग मित्न ही संस्था आणि वेळास मधील नागरिक यांच्यामुळे हे चित्न आता बदललं आहे.
मादी अंडी घालून गेली की त्याठिकाणी एक मोठं वर्तुळ तयार होतं. त्यावरून लक्षात येतं कि इथं अंडी आहेत. मग स्वयंसेवक ही सगळी अंडी या जाळी लावलेल्या ठिकाणी आणून वाळूत काही फूट खोल ठेऊन देतात. जाळी असल्यानं कुत्नी, लांडगे आत जाऊ शकत नाहीत. शिवाय किनार्यावर स्वयंसेवक गस्त घालत असल्यानं चोरही ही अंडी पळवू शकत नाहीत. तिथे प्रत्येक टोपलीखाली असणार्या अंड्यांची संख्या, दिवस आणि वेळ अशी सगळी माहिती लिहिलेली असते.
हे सागरी कासव संवर्धनाचं काम आता वेळास बरोबरच आंजर्ले, हरिहरेश्वर, केळशी, दिवेआगर इथंही होऊ लागलं आहे. कासवाचं सागरी पर्यावरणात महत्वाचं योगदान आहे. समुद्र स्वच्छ ठेवण्याचं काम कासवं करतात. आत्तापर्यंत सुमारे 51000 पिल्लांना पाण्यात सोडण्यात यांना यश आलं आहे. ही सगळी माहिती सगळे जण शांतपणे ऐकत होते. माहिती देऊन झाल्यावर एका स्वयंसेवकाने आता आपण एक-एक टोपली उघडून पाहू आपल्याला आज किती पिल्लं दिसतात ते. त्याने पहिली टोपली उघडली काही नाही. दुसरी उघडली त्यातही काही नाही. अर्र्र्र गर्दीचा आवाज आला. तिसरी आणि शेवटची टोपली उचलली आणि 6-7 पिल्लं वाळूतून बाहेर येऊ लागली. वेळासच्या मातीत नव्या जीवनाची सुरु वात झाली होती. पिल्लांना समुद्राचा आवाज ऐकू येत होता आणि त्यांची धडपड चालू झाली समुद्रात जायची.
स्वयंसेकांनी अगदी हळुवार त्या सगळ्या पिल्लांना एका टोपलीत ठेवलं आणि समुद्रापासून 5-6 फूट लांब वाळूत सोडलं. समुद्रात जायच्या एकच उद्देशाने प्रत्येक पिल्लू झपाझप झपाझप चालत होतं. हे सगळं दृश्य इतकं भारावून टाकणारं होतं. जेव्हा पहिलं पिल्लू समुद्राच्या लाटेवर स्वार होऊन त्याच्या नव्या विश्वात गेलं तेव्हा तिथे असलेल्या प्रत्येकाने उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवल्या.
उगवत्या सूर्याबरोबर 6 नवीन आयुष्यांची सुरु वात होत होती. एक-एक करत सहाही पिल्लं समुद्रात दिसेनाशी झाली. तरीही सगळ्यांचे डोळे समुद्रात शोध घेत होते अजूनही त्यांची काही झलक पाहायला मिळते का ते बघण्यासाठी. इतक्यात मी ज्याच्याकडे राहत होते त्या छोट्या ओंकारने मला पाठीमागून हाक मारली. ताई चल पक्षी बघायला जायचंय ना? मी भानावर आले आणि सुरु च्या बनातं पक्षांच्या शोधात निघाले .
लहानपणीची ससा कासवाची गोष्ट आठवली आणि हसू आलं कारण गोष्टी प्रमाणेच इथेही कासव जिंकलं होतं!