रेडिमेड भावनांचं दुकान

By admin | Published: March 21, 2017 02:59 PM2017-03-21T14:59:43+5:302017-03-21T14:59:43+5:30

आजचा जो विषय आहे , तो खरं तर समाजातला काही गहन प्रश्न वगैरे नाही. पण प्रश्न आहे आणि अनेकांच्या आयुष्यात तो गंभीर होतो आहे.

Readymade Emotion Shop | रेडिमेड भावनांचं दुकान

रेडिमेड भावनांचं दुकान

Next

 
- आजचा जो विषय आहे , तो खरं तर समाजातला काही गहन प्रश्न वगैरे नाही. पण प्रश्न आहे आणि अनेकांच्या आयुष्यात तो गंभीर होतो आहे. सोशल नेटवर्किंगचा आपल्यावर इतका जबरदस्त प्रभाव आहे. आपण आपल्या चांगल्या वाईट भावना व्यक्त करण्यासाठीसुद्धा हल्ली सोशलनेटवर्किंगचाच वापर करत आहोत आणि याबाबत विचार करणंसुद्धा तितकंच महत्वाचं आहे
उदाहरण द्यायचं झालंच तर गेल्याच आठवड्यात माझं एका मैत्रिणीशी भांडण झालं. आता मैत्री म्हटली की भांडण होतातच. पण राग आलाय हे दाखवण्यासाठी तिनं चक्क तिचा व्हाट्सअ‍ॅपचा डीपीच काढून टाकला. नंतर लोकांना ( अर्थातच मला हे दाखवून द्यायचं होतं तिला की) तिची कशी काळजी नाही, ती कशी एकटी आहे आणि तिच्या आयुष्यातून कोणी मित्र अथवा मैत्रीण निघून गेल्यावर तिला कसा काही फरक पडत नाही वगैरे वगैरे..असं सांगणारी बरेच स्टेटस आणि फोटो तिनं बदलत ठेवले.


ही कुठली राग दर्शवण्याची पद्धत? छोटंसं भांडण झालं तर डीपी काढा आणि जर मोठं भांडण झालं तर सरळ ब्लॉकच करुन टाका. असं केल्यानं त्यांना नक्की कसलं उच्च कोटीचं समाधान मिळतं हेच मुळी मला समजत नाही. कधीकधी या सगळ्या गोष्टींची मला भारी गंमत वाटते. म्हणजे बघा ना, एखादयाबरोबर भांडण झालं की करा लगेच डीपी काढून टाका. एकदम दर्दभरी स्टेटस ठेवा म्हणजे मग लोक तुम्हाला विचारणार, नुसती सहानुभूती दाखवणार, तुम्ही कसे बरोबर आहेत हे सांगणार (चूक तुमची असली तरीही) आणि मग शेवटी काय तर ज्याच्यामुळे तुम्ही डीपी काढलाय त्यानं त्याची बाजू पटवून देण्या आधीच तो दहा बारा जणांच्या मनामध्ये व्हिलन झालेला असतो.


फेसबुकने तर हे काम अजूनच सोपं केलंय. नुसतं फिलिंग सॅडइतकं टाकलं कि सर्व जगाला कळलेलं असतं की तुमचं काहीतरी बिनासलंय. मग त्यावर लाईक्स. मुलींना आणखी लाईक्स. आणि मग त्यावर मिळणारे फुकटचे सल्ले. इतकंच नाही नुसतं फिलिंग...असं टाईप केलं की आपला सध्याचा मूड कसा आहे हे सिलेक्ट करण्यासाठी अनेक आॅपशन्सही येतात.


तुम्ही रागवा, रु सा कुणावर त्या बद्दल माझा मुळीच आक्षेप नाही. पण आपला राग दाखवण्यासाठी व्हाट्स अ‍ॅप , फेसबुकसारख्या कुबड्या वापरण्यापेक्षा समोरासमोर बोलून जर आपण आपले प्रॉब्लेम्स सोडवले तर ते प्रॉब्लेम्स लवकरही सुटतील. आपण ज्या व्यक्तीवर रागावलो होतो त्याच व्यक्तीने आपला राग घालवला याचा आपल्याला आनंदही वाटेल. बघा एकदा प्रयत्न करून..
नाहीतर काय आहेत, फिलिंग..अमूकतमूक..
- प्रतिक प्रवीण म्हात्रे

Web Title: Readymade Emotion Shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.