पृथ्वीनं बदला घ्यायचं ठरवलं तर?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 05:56 PM2018-10-25T17:56:54+5:302018-10-25T17:58:23+5:30
रिव्हेंज ऑफ गाइया हे पुस्तक वाचून पाहा, पृथ्वीची वेगळीच गोष्ट कळेल!
प्रज्ञा शिदोरे
मागच्याच आठवडय़ात आयपीसीसी अर्थात इंटर-गव्हम्रेण्टल पॅनल फॉर क्लायमेट चेंजने एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालानुसार पृथ्वीचं तपमान पुढच्या 30 वर्षात आणखी 1 अंशानं वाढणार आहे. तपमान वाढलं तर आपल्याला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणखीनच प्रकर्षाने जाणवायला लागेल. पण तो त्याचा फार छोटा परिणाम आहे. तपमान वाढल्यामुळे नद्या वाटतील, भूगर्भातलं पाणी आटायला लागेल, ध्रुवांवरचा बर्फ वितळायला लागल्यामुळे समुद्राकाठची शहरं धोक्यात येतील.
शास्त्नज्ञांच्या मते हा बदल ‘नैसर्गिक’ आहे, आणि पृथ्वीचं तपमान असंच वाढत राहत. पण काहींच्या मते मानवाच्या कृतींमुळे हा बदल आणखी वेगानं होतो आहे. आणि यामुळे जर पृथ्वीवरची जीवसृष्टी धोक्यात आली तर त्याला मुख्यतर् मानवच जबाबदार असेल.
याविषयी जेम्स लव्हलॉक नावाच्या निसर्गतज्ज्ञानं एक थेअरी किंवा शक्यता मांडली. त्याने त्याच्या ‘गाइया’ या पुस्तकात अशी मांडणी केली की पृथ्वी ही एक सजीव प्राणी आहे. ही मांडणी तो अनेक उदाहरणांच्या साहाय्याने करतो. तो म्हणतो की जसं एखाद्या जीवाला आपलं बरं वाईट कळतं, तसंच पृथ्वीचंही आहे. त्याच्या पुढच्या पुस्तकात, ज्याचं नाव ‘द रिव्हेंज ऑफ गाईया’ तो म्हणतो, मानवाच्या कृतीमुळे पृथ्वीचा र्हास होतो आहे आणि त्यामुळे आपली पृथ्वी आता प्रतिकार करते आहे. हा प्रतिकार म्हणजे आपण जे वातावरणातले बदल अनुभवतो किंवा टोकाचं ऋतुमान अनुभवतो, ते हे सारं, त्याचाच भाग आहे.
अनेक शास्त्नज्ञांनी हे ‘प्सुडो सायन्स’ म्हणून ठरवलेली ही थिअरी, सध्या जगात पुन्हा चर्चेत आहे.
तेव्हा ही दोन्हीही पुस्तकं नक्की वाचण्याजोगी आहेत.