रिक्षाचालकाच्या फुटबॉलर लेकाचा जबरदस्त गोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 07:59 AM2020-12-03T07:59:35+5:302020-12-03T08:00:12+5:30
कोल्हापूरचा युवा फुटबॉलपटू अनिकेत जाधव भारतीय फुटबॉल जगातला महागडा खेळाडू ठरतोय. त्याच्या जिद्दीची गोष्ट.
- सचिन भोसले
कोल्हापूरचा अनिकेत जाधव. महाराष्ट्राचा युवा फुटबॉलपटू. गेल्या वर्षापासून तो इंडियन सुपर लीग (अर्थात आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत जमशेदपूर एफसी संघाचं प्रतिनिधित्व करतो आहे. तत्पूर्वी २०१७ मध्ये भारतात प्रथमच भरलेल्या फिफा १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतही भारतीय संघात खेळला. जेमतेम विशीच्या अनिकेतने भारतीय फुटबॉल क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला आहे. त्यामुळे त्याला भारतातील अनेक नामांकित संघांकडून करारबद्ध होण्यासाठी मागणी वाढली होती. जमशेदपूर फुटबॉल संघाने त्याला आपल्या संघाकडून खेळण्यासाठी ४९ लाख रुपयांच्या पॅकेजची ऑफर दिली. त्यानुसार या प्रस्तावास त्याने होकारही दर्शविला आहे. जमशेदपूर संघाकडून खेळण्याचा दोन वर्षांचा करार सध्या सुरू असलेली स्पर्धा संपल्यानंतर संपुष्टात येणार आहे. त्यानंतर त्याला भारतातील अन्य एका बलाढ्य संघाने एक कोटी रुपयांच्या जवळपास करारबद्ध केल्याची चर्चा आहे. त्याने हा प्रस्ताव स्वीकारला तर तो देशातील तिसरा महागडा खेळाडू ठरेल. अर्थात, करारभंग नको म्हणून सध्या तो या विषयी फार बोलत नाही, मात्र भारतीय फुटबॉल जगात सध्या त्याच्या नावाची म्हणून चर्चा आहे.
यापूर्वी कोल्हापूरचा युवा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू गोलरक्षक सुखदेव पाटील यालासुद्धा दिल्ली डायनामोज एफसी संघाने ४७ लाखांच्या पॅकेजवर करारबद्ध केले होते, तर दुसरा फुटबॉलपटू निखिल कदम हाही देशातील अव्वल संघ कोलकात्याच्या मोहन बागानकडून चांगल्या मेहनतान्यावर खेळत आहे. एकूणच कोल्हापूरचा फुटबॉल या तिघांच्या रूपाने देशभरात पोहोचला आहे.
आज हे यश दिसत असलं तरी अनिकेतचा संघर्ष मोठा आहे. अनिकेतचे वडील कोल्हापुरात रिक्षा चालविण्याचा व्यवसाय करतात. याच व्यवसायावर त्यांनी अनिकेतला परिस्थिती नसतानाही क्रीडा प्रबोधिनीमध्ये दाखल केले. त्यानेही फुटबॉल खेळात प्रावीण्य दाखविले. यादरम्यान जयदीप अंगीरवार हे फुटबॉलचे प्रशिक्षक त्याला भेटले. त्यांनी अनिकेतला धडे दिले आणि त्याचा खेळ बहरत गेला आणि त्याची २०१६ मध्ये सतरा वर्षाखालील फिफा युवा चषक फुटबॉल स्पर्धेसाठी संभाव्य भारतीय संघात वर्णी लागली. पहिल्या २२ मध्ये तो होता. त्याच्यातील खेळाचे कौशल्य पाहून त्याला प्रथम राखीव आणि स्ट्रायकर म्हणून संघात स्थान मिळाले. महागडे किट्स घेण्यासाठी त्याला त्याचा मामा संदीप जाधव यांनीही मदत केली. अर्थात आज अनिकेत जरी मोठी उड्डाणं घेत असला तरी त्याचे वडील अजूनही नियमितपणे रोज कोल्हापूरच्या रस्त्यावंर नियमितपणे रिक्षा काढून व्यवसाय करतात.
अनिकेतची घोेडदौड मात्र जोरात सुरू आहे. तो सध्या जमशेदपूर एफसी संघाकडून स्ट्रायकर म्हणून खेळत आहे.
त्याआधी २०१२-१३ साली महाराष्ट्र राज्य संघातून सुब्रोतो चषक शालेय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली. २०१४ साली जर्मनीतील बार्यनमुनिच या व्यावसायिक फुटबॉल क्लबने त्याची निवड केली. बार्यनमुनिच संघाकडून त्याने जर्मनीतील अव्वल संघांविरोधात अनेक गोल केले. त्याच्या या कामगिरीसाठी ‘गोल्डन बूट’चा तो मानकरी ठरला. .
२०१५ ला, २०१७ ला भारतात होणाऱ्या युवा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय संभाव्य संघ निवडीसाठी देशभरातून चाचणी घेतली. परदेशी संघांविरोधात खेळण्याचा सराव व्हावा म्हणून भारतीय फुटबॉल महासंघाने त्याला जर्मनी, ब्राझील, इटली आदी देशांमध्ये सराव सामने खेळण्यासाठी पाठविले.
पुढे अर्थातच तो भारतीय संघातही खेळला. जर्मनी येथे सहा वेळा दौरा केला, तर आतापर्यंत त्याने वयाच्या साडेसोळा वर्षापर्यंत २३ देशांचा केवळ फुटबॉल सामने खेळण्यासाठी दौरा केला आहे.
(सचिन लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीत उपसंपादक आहे.)
sachinbhosale912@gmail.com
-----------------------------------------------------------------------------------------------------
भारतीय फुटबॉल संघात खेळायचं हे माझं स्वप्न आहे. सध्या जरी मी व्यावसायिक संघाकडून खेळत असलो तरी माझं ध्येय भारतीय संघाकडून खेळणं हेच आहे.
- अनिकेत जाधव