राइट टाइम, राइट प्लेस हे जमायला हवं!
By Admin | Published: January 21, 2016 09:08 PM2016-01-21T21:08:14+5:302016-01-22T08:40:14+5:30
अभिनयाची आवड मला लहानपणापासूनच होती आणि घरून प्रोत्साहन मिळाल्याने मी शाळा-कॉलेजमध्ये असतानाच अनेक नाटकांत काम केलं.
>- अभिजित खांडकेकर
अभिनयाची आवड मला लहानपणापासूनच होती आणि घरून प्रोत्साहन मिळाल्याने मी शाळा-कॉलेजमध्ये असतानाच अनेक नाटकांत काम केलं. काही प्रायोगिक नाटकंही केली, पण ते हौस म्हणून! त्यानंतर काही काळ मी रेडिओ जॉकी म्हणूूनही काम केलं, पण तेही प्रोफेशनली काम करण्याचा मी विचार केला नव्हता, कारण डोक्यावर गॉडफादरचा हात असल्याशिवाय इथे काम होतं नाही, असं मला वाटत होतं.
एक वेळ अशी आली की अभिनय वगैरे सोडून द्यावं असाच विचार मी केला होता. पण सुदैवाने तेव्हाच माझ्यासमोर महाराष्ट्राचा सुपरस्टारच्या निमित्ताने मोठी संधी उभी राहिली आणि मी याच क्षेत्रात आलो.
खर सांगू तर स्ट्रगल हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा भाग असतो, तो कोणालाच चुकलेला नाही. नवीन आलेल्या प्रत्येकाला ओळख कमावण्यासाठी स्ट्रगल करावा लागतो. मीही अशाच थोड्याफार परिस्थितीतून गेलो असलो तरी महाराष्ट्राचा सुपरस्टारसारख्या मोठय़ा टॅलण्ट हट शोमुळे माझा स्ट्रगल थोडा कमी झाला. नवखे लोक जेव्हा ऑडिशन्स द्यायला जातात, तेव्हा त्यांना हे सिद्ध करावं लागतं की मी ही भूमिका यशस्वीरीत्या करू शकतो, तसेच ही मालिका माझ्या खांद्यावर सांभाळू शकतो. पण महाराष्ट्राचा सुपरस्टार करत असताना त्या काही महिन्यांत वाहिनीची माणसं आम्हाला निरखत होती, माणूस आणि अभिनेता म्हणून जोखत होती. त्यामुळे त्यांनी आम्हाला आधीच हेरून ठेवलं होतं, की ही मुलं डेली सोपवाली आहेत आणि आपण त्यांना कुठेतरी संधी देऊया. आणि त्यामुळे नंतरच्या ऑडिशन्समधून आम्ही चांगलं काम करून आमच्या भूमिका मिळवल्या. त्यामुळे इतरांच्या तुलनेत माझा प्रवास तसा सुकर होता असं मी म्हणेन.
अजून एक महत्त्वाची गोष्ट मी या प्रवासात शिकलो ती म्हणजे, "यू हॅव टू बी अॅट द राइट प्लेस, अॅट द राइट टाइम". मी मुंबईत येऊन स्ट्रगल करतोय असं म्हणत नुसतं बसून राहिलं तर काहीच होत नाही. त्यामुळे तुम्हाला चार ठिकाणी फिरावं लागतं, ओळखी बनवाव्या लागतात, तरच मग ऑडिशन्स आणि त्यातून भूमिका असा मार्ग सुरू होतो.
आणि तरीही हा प्रवास संपत नाही. शिकणं, स्वत:ला तपासणं आणि पुन्हा पुन्हा सिद्ध करणं हे सुरूच असतं!
मुलाखत व शब्दांकन : मीनाक्षी कुलकर्णी