एकेकाळचे प्रेमदिवाने ऋषी कपूरच्या अदांवर का फिदा  होते ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 07:30 AM2020-05-07T07:30:00+5:302020-05-07T07:30:02+5:30

ऐंशी-नव्वदच्या काळात तरुण पिढय़ांसाठी त्याचे सिनेमे म्हणजे प्रेमाची पाठशाळा होती. प्रेमात पडणं, प्रपोज करणं, जीव ओवाळून टाकणं, तिच्यासाठी जिवाचं रान करणं हे सारं ‘तो’ करायचा. प्रत्येकीच्या मनातील तो ख्वाबों का शहजादा होता. उन दिनों मे तो पसीना भी गुलाब हुआ करता था..

Rishi kapoor- eighties and nineties love story & romance of life. | एकेकाळचे प्रेमदिवाने ऋषी कपूरच्या अदांवर का फिदा  होते ?

एकेकाळचे प्रेमदिवाने ऋषी कपूरच्या अदांवर का फिदा  होते ?

Next
ठळक मुद्देआशिक बनाया आप ने.

लीना पांढरे

प्राप्तेषु षोडशे वर्षे म्हणजे सोळाव्या वर्षाच्या उंबरठय़ावर उभं राहिल्यावर प्रत्येकाच्या तनामनाला पंख फुटतात.
आभाळ अजून निळभोरं होतं आणि हिरव्यागार गवताची पाती अजून हिरवीगर्द होतात. प्रत्येक क्षण इंद्रधनुचे रंग लेवून येतो.
हे फुलायचे आणि झोपाळ्यावाचून झुलायचे दिवस असतात. 
ही सारी किमया सोळाव्या वर्षाची असते स्वीट सिक्सटीन.
दिल की धडकन वाढवणारा, अब पॉव जमीं पर नहीं ठहरते म्हणत प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा हा सुंदर चांदण्यांचा चुरा सांडणारा मदहोश काळ. 
उन दिनो मे हवां में शहद घुलता है. 
स्वप्नांचं वय. 
वाटतं की सूर्य आपल्यासाठीच उगवतो. चंद्र आपल्यासाठीच चांदणं बरसवतो. बरखा आपल्यासाठीच बहार घेऊन येते. 
 प्रत्येक मुलगी स्वप्न बघते परिकथेतील राजकुमाराचं. शुभ्र, डौलदार अश्वावर स्वार होऊन येणा:या राजकुमाराचं. 
तो येईल आणि आपल्याला फुलांच्या देशात घेऊन जाईल, असं तिला मनोमन वाटू लागतं.
तसा राजकुमार कसा असेल?
तर तो ऋषी कपूरसारखा, म्हणजे तो सिनेमात जसा लव्हर बॉय होता, जीव ओवाळून टाकायचा, जिच्यावर प्रेम करायचा तिच्यासाठी.
ऐंशी-नव्वदच्या दशकांमध्ये तमाम तरुण मुलींच्या मनावर अधिराज्य केलं ते या चॉकलेट हिरोनं. 
 खरं तर त्या काळामध्ये लव्हर बॉय म्हणून हिंदी सिनेसृष्टीवर राज्य होते राजेश खन्नाचं आणि त्यानंतर अँग्री यंग मॅन ‘दे ढीश्ॉव’ करणा:या अमिताभ बच्चनचं. 
राजेश खन्नाचे सिनेमे म्हणजेही प्रेमकथाच. पण त्याच्या प्रेमकथांना एक कारुण्याची शोकात्म किनार होती.
अमिताभ बच्चनच्या कहाण्यांना एक गंभीर करणारा सामाजिक आशय होता. 
पण या दोन्हीच्यामध्ये चपखल बसणारा चॉकलेट बॉय असेल तर तो ऋषी कपूर. 
आज आपल्या टेलिव्हिजनवर तरु ण मुलींना रोमेडी हे चॅनल बघायला फार आवडतं. कारण रोमेडीवरती सर्व निव्वळ रोमान्स दर्शवणा:या टीनएजर मुलामुलींच्या उमलत्या प्रेमकथा असतात.
थिरकायला लावणारं मादक संगीत असतं. या कथांना कुठलाही गंभीर आशय नसतो. पडद्यावरती त्या कथा घडत असताना नुसते गुलाबी, निळे, जांभळे रंग उधळले जात असतात. कुठं घनगंभीर होऊन आयुष्याचा विचार वगैरे अजिबात करायचा नसतो. वाहणा:या नदीच्या निळ्याशार पाण्यात नुसतं आपल्याला झोकून द्यायचं असतं. स्वत:ला पिसोळीसारखं हलकं करायचं असतं आणि वाहत वाहत जायचं असतं.
ऐंशी-नव्वदच्या काळात तरुण होत जाणा:या पिढय़ांसाठी नेमकं हेच घडत होतं ऋषी कपूरच्या सिनेमांमध्ये.
त्या स्वप्नांच्या दुनियेत तो तमाम तरुण मुलामुलींना घेऊ जायचा.
प्रत्येकीच्या मनातील तो ख्वाबों का शहजादा होता.
या राजकुमाराचा सिनेमा पाहताना पडद्यावर दिसणारी नायिका अदृश्य व्हायची आणि तिथे प्रत्येक तरुण मुलगी स्वत:ची कल्पना करायची. मग येणा:या प्रत्येक क्षणाला चांदीचं घुंगुर जडवलं जायचं. हथेलीवरील मेहंदीचे रंग गडद होत जायचे. हळवेपणाने क्षणात डोळ्यात पाणी दाटायचं तर क्षणात जाई जुई मोग:याचं खळाळणारं हसू ओठांमधून उमलायचं. उन दिनों मे तो पसीना भी गुलाब हुआ करता था.
मेरा नाम जोकर मधला तो, आपल्या सुंदर शिक्षिकेच्या प्रेमात पडलेला, सोळा वर्षाचा माउथ ऑर्गन वाजवणारा राजू नावाचा तरुण स्वप्नाळू मुलगा. त्याच्या जखमेवर फुंकर घालणारी, त्याला आत्मविश्वास देणारी, त्याला आनंदाने जगायला शिकवणारी त्याची आवडती टीचर मेरी विवाहबद्ध होऊन निघून जाते. राजूला शेवटच्या श्वासार्पयत सांभाळण्यासाठी एक सुगंधी जखम देऊन जाते.
सा:या चित्नपटात उंच गेलेले देवदार वृक्ष, हिमाच्छादित पर्वत शिखरे, हिरवीगर्द कुरणं, वळणावळणाच्या वाटा मंगळुवरी कौलांचं भव्य कॉन्व्हेण्ट स्कूल, चर्चमधील निनादणा:या घंटा, निळसर धूर सोडत जाणारी आगगाडी आणि मेरीला गुडबाय करून तिने परत केलेल्या जोकरचा भावाला हातात धरून उभा असणारा निळसर डोळ्यांचा, गोब:या गालांचा, गोरापान राजू.
जाने कहॉँ गये वो दिन, कहते थे तेरी राहों मे नजरों को हम बिछायेंगे अशी याद काळजात दडवून ठेवते.
हे मिसरूड फुटायचं वेडं वय. आपली प्रिय व्यक्ती आपल्याला सोडून निघून जाते तेव्हा व्याकूळ झालेलं मन, तो पहिलावहिला प्रेमभंग प्रत्येकानेच आपल्या काळजात सांभाळलेला असतो.
मला आठवतं, मी सातवी-आठवीत असताना बॉबी झळकला होता. माङया वर्गातल्या मायाने तो माङयासाठी स्पॉन्सर केला होता. शाळेमध्ये रविवारी जादा तास आहेत अशी थाप मारून आम्ही दोघीजणी नदी पल्याडच्या त्या जुन्या, पत्र्याचे छप्पर असणा:या टॉकीजमध्ये भर दुपारी 3 वाजता सिनेमा बघायला गेलो होतो. एक रु पया पाच पैशाचं तिकीट काढून पिटातल्या पोरांबरोबर बसलो होतो. डोक्यावर तापणारे पत्रे, फिरणा:या पंख्यांचा येणारा खडखडाट, खुच्र्यामधून चावणारे ढेकूणं आणि घामेजलेली अंग या सा:याचा क्षणार्धात विसर पडला होता जेव्हा आपल्या जन्मदिनाच्या पार्टीत जिन्यावरून उतरून येत असताना दाराजवळ उभ्या असणा:या लाज:याबुज:या डिंपलला म्हणजे बॉबीला त्या ‘डिब्ब्याने’ पाहिलं होतं. लव अॅट फस्र्ट साइट तिथेच घडून आलं होतं. बॉबी लवकर निघून गेली होती; पण तो तिच्यासाठी सूर आळवत होता, मै शायर तो नही मगर ये हसीं, जब से देखा मैने तुझको, मुझको शायरी आ गई..


नंतर कॉलेजची लायब्ररी, समुद्रकिनारे, बागा, निळेशार पोहण्याचे तलाव आणि काश्मीरमधील गर्द वृक्षराजी, धुक्यांचे लोट या सा:यातून नृत्य करत, गाणी गात गळ्यात गळे घालून मुक्तपणो संचार करणारी ही देखणी दो हंसो की जोडी.
बॉबीमध्ये ऋषी-डिंपलची केमिस्ट्री अशी जुळून आली होती की बस्स. त्याचा परिणाम होऊन ख:याखु:या आयुष्यात ऋषीची प्रेयसी यास्मिन त्याला कायमचा अलविदा करून निघून गेली. तिकडे डिंपल ऋषीच्या रंगीत प्रेम कहाण्या रंगू लागल्या. त्याचं गॉसिप छापलं जाऊ लागलं. 
पण डिंपलही राजेश खन्नाबरोबर विवाह करून चालती झाली. नंतर डिंपल आणि ऋषी एकत्न आले ते सागर या चित्नपटात. बॉबीमधील अल्लड टीनएजर प्रेमाच्या पुढील थोडंसं प्रगल्भ होऊ पाहणारं, पूर्ण उमललेल्या फुलाप्रमाणो असणारं प्रेम सागरमध्ये भेटलं. 
गिटार हातात घेऊन डिंपलच्या मधाळ डोळ्यात डोळे घालून तो गात असतो, ‘सागर जैसी आँखों वाली, ये तो बता तेरा नाम है क्या.?’
- आहाहा ! तेव्हा प्रत्येकीनं स्वप्न पाहिलं असेल की आपल्या  प्रियकराने आपल्याला असंच रोमॅण्टिकपणो प्रपोज करावं. (भले प्रत्यक्षात कांदा-पोहे-चहा आणि देणीघेणी यांच्या सौद्यावर लग्नगाठ बांधली गेली असेल तरीसुद्धा.) 
सा:या जगाला मिनीस्कर्टची देणगी भले जॅकलीन केनडीने दिली असेल; पण आपल्या हिंदी सिनेमात पहिल्यांदा मिनी स्कर्ट घालून वावरली ती डिंपलच. 
आमच्या शाळेमधल्या दुष्ट हेडमास्तरीणबाई आमचे स्कर्ट जर गुडघ्याच्या खाली नसतील तर सपासप पायांवर छडय़ा मारायच्या. त्यावर उपाय म्हणून माझी मैत्रीण माया पार कमरेच्या खाली ओढून, गुडघ्याच्या खाली स्कर्ट आणून शाळेमध्ये वावरायची शाळा सुटल्यानंतर तिला अविनाश भेटायला यायचा.
खास त्याची बुलेट घेऊन शाळेसमोर तो थांबलेला असायचा. 
शाळा सुटल्यावर सायकलवर बसताना माया कमरेच्या खाली ओढलेला स्कर्ट पार उंच छातीपर्यंत घेऊन जायची आणि मग तिचे गोरेपान गुलजार उघडे पडलेले गुडघे लयबद्ध हालचाल करत सायकलच्या पायडल वरती फिरू लागायचे.
अर्थात त्याकाळी एवढा मोकळेपणा नव्हता, त्यामुळे फक्त दोघेच फिरताहेत म्हणून कुणी हटकलं तर कशाला रिस्क घ्या याकरता कबाब मे हड्डी बनवून मलाही सोबत नेलं जायचं.
तर थोडक्यात या जोडीच्या कृपेने मी बरेच ऋषी कपूरचे सिनेमे त्याकाळात पाहिले. 
प्रेमात पडायचं असेल आणि पोरगी पटवायची असेल तर कुठलं ना कुठलं तरी वाद्य वाजवता यायला पाहिजे हे कम्पल्शन ऋषी कपूरने आमच्या पिढीवर केलं.
त्याच्या सर्व सिनेमांमध्ये तो कधी गिटार तर कधी ट्रम्पेट, माउथ ऑर्गन काहीच नाही तर डफली घेऊन तुफान नाचलेला आहे.
अमर अकबर अॅन्थनीमधला अकबर तर काय सांगावा.
‘परदा है परदा’ ही कव्वाली त्यानं एकदम मस्तमौला अंदाजात पेश केली होती. समोर बसलेली लाजरी बुरख्यातील नीतू सिंग, बेभान होऊन पाहत राहतो आपण ती नजरांची जुगलबंदी.
असं म्हणतात की याच सिनेमाच्या सेटवर  शरारती ऋषीने नितूच्या चेह:याला काजळ ही फासलं होतं. त्या दोघांची जोडी अनेक सिनेमांमध्ये हिट झाली आणि अर्थात आयुष्यामध्येपण.
नीतू सिंग आणि ऋषी कपूरचं लग्न झालं त्या रात्री माङया किती वर्गमैत्रिणींनी आसवांनी भिजवून आपल्या उशा ओल्या केल्या असतील ते देवच जाणो.
मग आला चांदनी. हा श्रीदेवीबरोबरचा चित्नपट भावमधुर कविताच आहे. 
सा:या चित्नपटभर नुसती चांदण्याची आणि इंद्रधनुष्यी रंगाची, रिमङिामत्या पावसाची बरसात आहे.
या चित्नपटातील चुलबुल्या श्रीदेवीला साथ देणारा अवखळ रोहित. तिच्यावर जीव ओवाळून टाकणारा. अपघातानंतर तो व्हीलचेअरला खिळतो तेव्हाचा रोहित मात्र वेगळा दिसतो.
फिल्मी रूपावर त्याच्या दिवान्या झालेल्या अशा अनेक असतील.
त्याचा नायक म्हणून काळ सरला. इकडे त्याकाळी तरुण असलेलेही आपापल्या संसारात रमले.
अधेमधे आठवण काढत असतील ती ही त्याची नाही, आपल्या तरुण दिवसांचीच.
आता तो गेला. फरक कोणाला पडलाय?
तुम्हाला आम्हाला?
काही काळापुरता ..
वीरान जिंदगी झालेली आहे ती त्याच्या मेहबूबाची नीतू सिंगची.
ही दर्द भरी दास्तां आणि हीनाचे उतरलेले रंग, या आठवणींच्या क्षणांना हृदयात गिरफ्तार करून तिला एकटीनंच चालायचं आहे.. 



( लेखिका प्राध्यापक आहेत.)
 

Web Title: Rishi kapoor- eighties and nineties love story & romance of life.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.