रॉबिन हूड आर्मी! गरजू लोकांपर्यंत अन्न पोहचविण्यासाठीचा स्तुत्य उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 03:53 PM2018-02-07T15:53:36+5:302018-02-08T08:45:20+5:30

लग्नसमारंभात, हॉटेलात भरमसाठ अन्न उरतं तेच गरजू लोकांपर्यंत पोहचवलं तर? याच विचारातून सुरू झालेला एक उपक्रम.

Robin Hood Army! Precious venture to deliver food to the needy | रॉबिन हूड आर्मी! गरजू लोकांपर्यंत अन्न पोहचविण्यासाठीचा स्तुत्य उपक्रम

रॉबिन हूड आर्मी! गरजू लोकांपर्यंत अन्न पोहचविण्यासाठीचा स्तुत्य उपक्रम

Next

- इंदुमती गणेश

आपण भारतीय तसे उत्सवप्रिय. निमित्त काहीही असो आपण साजरं करायला एका पायावर तयार. साजरं करायचं म्हणजे पार्टी आलीच, त्यात जेवण हवं. तेही भरपूर. पदार्थ अनेक हवेत. देशी हवेत, पारंपरिक हवेत तसेच चायनिज, इटालियन, मॅक्सिकन असं नवनवीनही हवंच. समारंभ काय यापेक्षा जेवण कसं होतं याच्याच चर्चा पुढे अनेक दिवस रंगतात. मात्र ‘बुफे’ करकरून जेवणात अन्न वाया जातं ते जातं. ते कमीच म्हणून भरमसाठ अन्न उरतंही. तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय की, त्या उरलेल्या अन्नाचं पुढं काय होतं?
उरलेल्या अन्नापैकी काही अन्न आचारी, मदतनीस घेऊन जातात. ग्रामीण भागात अजूनही शेजारी-पाजाऱ्यांच्या घरात भांडी भरून जेवण पाठवलं जातं; पण शहरात ही सोय नाही. फ्लॅट संस्कृतीत तर अवघड परिस्थिती. शेवटी अन्न खराब होतं आणि टाकून दिलं जातं. विवाहसोहळा, उपहारगृहे, हॉटेल्स, सामाजिक व कौटुंबिक कार्ये अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात अन्न वाया जातं. युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या मते, भारतात तयार केलेल्या, शिजवलेल्या अन्नापैकी ४० टक्के अन्न वाया जाते. भारतामध्ये सुमारे २१ दशलक्ष टन गहू वाया जातो. कृषी मंत्रालयानुसार देशात दरवर्षी ५० हजार कोटींच्या किमतीचं अन्न वाया जातं. हे चित्र एकीकडे, दुसरीकडे अनेक माणसं अन्नाविना झोपतात.

असं उरलेलं चांगलं अन्न आपण गरजूंपर्यंत पोहचवलं तर?
त्यातूनच तयार झाली रॉबिन हूड आर्मी. रॉबिन हूड हे तसं काल्पनिक कॅरेक्टर. कोण होता हा रॉबिन हूड? जसे कार्टूनमधले छोटा भीम, शक्तिमान तसाच हा. हा रॉबिन हूड श्रीमंतांना लुटायचा आणि ही लुटलेली संपत्ती गरिबांमध्ये वाटायचा. या संकल्पनेचा आधार घेऊन नील घोष आणि आनंद सिन्हा यांनी २६ ऑगस्ट २०१४ साली दिल्लीत रॉबिन हूड आर्मीची स्थापना केली. धर्मादाय अंतर्गत त्याची नोंदणी करण्यात आली. फरक इतकात की इथं कुणालाही लुटायचं नाही तर मोठ्या कार्यक्रमानिमित्त तसंच हॉटेल्समध्ये उरलेलं अन्न घ्यायचं आणि गरजूंमध्ये वाटायचं. भुकेलेल्या नागरिकांची सेवा या हेतूने संस्थेनं काम सुरू केलं. रॉबिन हूड आर्मी नवी दिल्ली, कोलकाता, मुंबई, हैदराबाद, बंगळुरू, जयपूर, जबलपूर, पानिपत, गुरगाव, पुणे, देहरादून, फरीदाबाद अशा अनेक शहरांसह श्रीलंका, चिली, युगांडा, पेरू अशा अन्य १३ देशांमध्ये काम करते. अगदी पाकिस्तानमध्येही संस्थेचे काम चालते. संस्थेचे काम व्हॉट्सअ‍ॅप गु्रपसारख्या सोशल मीडियाद्वारे काम करते. या माध्यमातून ५३ शहरांमधील १४ हजार सदस्य कार्यकर्ते निर्माण झाले आहेत. हिरव्या रंगाचा टी-शर्ट ही या कार्यकर्त्यांची ओळख.
महाराष्ट्रात अमित जैन आणि योगेश कोळी यांनी पुण्यात रॉबिन हूड आर्मी या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपची सुरुवात केली. फेसबुक, व्हिडीओद्वारे या ग्रुपची माहिती व्हायरल झाली आणि कोल्हापुरातल्या काही तरुणांनी अमित जैन आणि योगेश कोळी यांच्याशी संपर्क साधून ग्रुपची माहिती विचारली. या चळवळीचा एक भाग बनत ३० एप्रिल २०१७ या दिवशी रॉबिन हूड आर्मी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार झाला. सुरुवातीला त्यात पंधरा ते वीसच सदस्य होते. ग्रुपचं काम नागरिकांपर्यंत आणि हॉटेल्सपर्यंत पोहोचवण्याचे आव्हान होतं. त्यामुळे सदस्यांनी स्वत:च भाजी-चपातीची आॅर्डर देऊन त्याचे पॅकेट बनवून गरजू कुटुंबांत वाटायला सुरुवात केली. दरम्यान, दोन-तीन जणांची टीम एका परिसराची जबाबदारी घेऊन तेथील मोठे हॉटेल्स, रेस्टॉरण्ट्सना भेटी देऊ लागली. दुसरीकडे कुठल्या लग्न व अन्य समारंभात गेले की तेथील मुख्य कुटुंबासह आचाºयांना भेटून संस्थेचे काम सांगायचे आणि अन्न उरलं तर आम्हाला कळवा, असा निरोपच ठेवून यायचे.
दुसºयाच आठवड्यात दुपारी एक फोन आला. जवळपास चाळीस लोकांचे जेवण शिल्लक होते. व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज पडला आणि काही मिनिटांत सदस्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणाहून जेवण डब्यांमधून भरून घेतले. पुढच्या तासाभरात ते अन्न रस्त्याकडेला राहणाºया वस्तीत पोहोचलेसुद्धा. अशारितीने कामाची सुरुवात झाली. ज्या परिसरातून फोन आला तिथं काम करणारे किंवा राहणारे काहीजण या ग्रुपशी जोडले गेले. अवघ्या नऊ महिन्यात या ग्रुपशी दोनशे सदस्य जोडले गेले. डॉक्टर, इंजिनिअर, कार्पोरेट क्षेत्रातील नोकरदार, महाविद्यालयीन युवक-युवतींपासून गृहिणी आणि साठीतले निवृत्त काका, आजोबा आज्जीसुद्धा मोठ्या उत्साहानं हे काम करतात. सकाळी उठल्यापासून रात्री साडेदहा वाजेपर्यंत अन्नाचं संकलन करण्यासाठीचे फोन स्वीकारले जातात. रात्री उशिरा फोन आलाच तर अन्न फ्रीजमध्ये ठेवा किंवा गरम करून ठेवण्यास सांगितलं जातं. सकाळी ६ वाजताच हे अन्न गरजूंपर्यंत पोहोचवलं जातं.
आता गु्रपचं काम इतक्या चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत आणि हॉटेल्सपर्यंत पोहोचले आहे की सरासरी दिवसाला किमान दोन फोन येतात. कोल्हापुरातील तावडे हॉटेल परिसर, शिंगणापूर, पाचगाव, गिरगाव आश्रमशाळा, मणेरमळा, मुडशिंगीसह रस्त्याकडेला असलेल्या झोपडपट्ट्यांसह विविध वस्त्यांत ५१ हजारांहून अधिक लोकांपर्यंत जेवण पोहोचवलं आहे. एक वेगळा उपक्रम आकार घेतो आहे.
 

Web Title: Robin Hood Army! Precious venture to deliver food to the needy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.