नोकरी हवीये? मग रोबोटने घेतलेली मुलाखत क्रॅक करण्याची तयारी ठेवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 05:29 PM2019-06-13T17:29:52+5:302019-06-13T17:31:55+5:30
अर्ज करा, मुलाखतीला जा, मग मुलाखत क्रॅक करा हा काळही आता जुना व्हायला लागलाय. आता यापुढे व्हिडीओ/ऑडिओ रिझ्युम मागवले जातील. किंवा मुलाखत शूट केली जाईल. त्यातून कृत्रिम बुद्धिमत्ता असलेले रोबोट पहिल्या टप्प्यात ‘लायक’ उमेदवार निवडतील. त्या यंत्राच्या परीक्षेत पास झालात तर पुढे, नाही तर नो एण्ट्री!
-अनन्या भारद्वाज
जग किती वेगानं बदलतं आहे, हे वाक्यही आता जुनं झालं आहे. मात्र सध्या चर्चा आहे ती एका नव्या ट्रेण्डची. एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेची. यंत्रच माणसाची कामं करायला लागली तर माणसांचे रोजगार जातील अशी चिंता आहेच, त्यामुळे जॉब मार्केटवर परिणाम होण्याचीही चर्चा आहे. मात्र आता एआयच माणसांच्या मुलाखती घेतील आणि माणसांना नोकरी द्यायची की नाकारायची हे निदान पहिल्या टप्प्यातच ठरवतील. याही प्रक्रियेचा प्रारंभ झाला आहे. अनेक कंपन्या आता ‘एआय’चा सहायक म्हणून उपयोग करून घेत आहेत. म्हणजे रिक्रुटिंगच्या क्षेत्रातही एआय दाखल झाले आहेत आणि निदान पहिल्या टप्प्यात तरी उमेदवार निवडीची चाळणी ते लावत आहे. अंतिम निर्णय अर्थातच माणसांचा आहे. मात्र पहिल्या टप्प्यात तरी हे काम आता रोबोट रिक्रुटर करेल असं दिसतं आहे. त्याप्रमाणे अनेक कंपन्या कामही करून घेऊ लागल्या आहेत. विशेषतर् जिथं मास रिक्रुटिंग म्हणजे मोठय़ा प्रमाणात माणसांची निवड करायची असते तिथं हे तंत्र वापरलं जाऊ लागलं आहे. लिखित रिझ्युम, ऑडिओ, व्हिडीओच नाही तर गेम बेस्ड मूल्यमापनही एआयने करणं सुरु झालं आहे.
‘हायरव्ह्यू’ नावाची एक कंपनी आहे. मुख्यतर् ही कंपनी व्हिडीओ इण्टरव्ह्यू सॉफ्टवेअर वापरून जगभरातल्या विविध कंपन्यांसाठी मनुष्यबळ निवडीचं काम करते. या कंपनीनं अलीकडेच एक श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली. तिचं नाव आहे, ‘द नेक्स्ट जनरेशन ऑफ असेसमेण्ट’.
त्यात त्यांनी व्हिडीओ बेस्ट असेसमेण्टची गरज आणि त्यातून होणारे फायदे याची आवश्यकता नोंदवली आहे. उमेदवाराचे व्हिडीओ पाहून हे मूल्यमापन करण्यात येतं. त्यातही अनेक प्रकार आहेत, म्हणजे उमेदवाराचे व्हिडीओ मागवणं किंवा साधारण उमेदवारांची मुलाखत शूट करून, 15 ते 20 मिनिटांचे व्हिडीओ पाहून, त्याचे विेषण करून उमेदवारांचं मूल्यमापन केलं जातं. त्यात ते तीन गोष्टी शोधतात.
1. उमेदवार नेमकं म्हणतोय काय?
म्हणजे उमेदवार जी उत्तरं देत आहे, त्यात नेमका तपशील किती आहे? तो किती खरी, अभ्यासू माहिती देत आहे आणि किती वायफळ बडबड केली हे तपासलं जातं.
2. उमेदवार कशा पद्धतीनं बोलतोय?
त्याच्या बोलण्यातून काय ध्वनित होतं, होत नाही. त्याच्या भाषेचा टोन आणि बोलण्याचा टोन कसा आहे?
3. उमेदवार बोलताना करतोय काय?
उमेदवार बोलताना त्याचा आत्मविश्वास, तो बोलतोय तेव्हाचा संदर्भ, त्यातून व्यक्त होणार्या भावना हे सारं तपासलं जाणार आहे.
गरजच काय?
आता मूळ प्रश्न असा आहे की, हे सारं कशासाठी? म्हणजे माणसंच जर आजवर मुलाखती घेत आली तर आता मुलाखती घेण्यासाठी यंत्राची किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत घेण्याची गरजच काय आहे?
* सगळ्यात महत्त्वाची गरज म्हणजे निवडप्रक्रिया जलद करणं. जिथं शेकडो उमेदवार मुलाखतीला येणार असतात, तिथं लायक उमेदवार कमीत कमी वेळेत निवडण्यासाठी एआयची मदत घेणं सोयीचं होतं. वेळ वाचतो आणि अचूकता साधली जाते.
* मुळात आता जॉब्ज सर्वत्र कमी आहेत, त्यामुळे योग्य उमेदवाराची निवड होणं हे गरजेचं आहे. मानवी हस्तक्षेप किंवा कुठल्याच प्रकारचे सकारात्मक किंवा नकारात्मक बायस न ठेवता उमेदवार निवडीला महत्त्व देणं.
*टॉप जॉब्ज, महत्त्वाचे स्किल असलेले जॉब्ज, अत्यंत क्रिएटिव्ह गरज असलेले किंवा संवादकौशल्य, व्यक्तिमत्त्व असलेले जॉब यासाठी एआय मोठय़ा प्रमाणात वापरले जातात.
व्हिडीओ-बेस्ड मूल्यमापनाचा उपयोग काय?
उमेदवाराकडून आधीच त्याचा व्हिडीओ प्रोफाइल म्हणजेच त्याचा व्हिडीओ रिझ्युम मागवला जातो. एक मिनिट ते 10 मिनिटं किंवा कंपनीच्या आवश्यकतेप्रमाणे. त्यात तो त्याची माहिती सांगतो. आता त्या व्हिडीओंना पहिली चाळणी लावून अनेक एआय उपकरणं कमीत कमी 10 ते जास्तीत जास्त 100 प्रकारची माहिती त्या उमेदवाराविषयी देतात. मात्र नोकरीसाठी आवश्यक असलेल्या काही क्षमता त्यातून जोखल्या जातात. मात्र नोकरीसाठी आवश्यक क्षमता यात अधिक नेमक्या पद्धतीनं मोजल्या जातात. हे सारं मोजणं एरव्ही किचकट काम मात्र काहीशे उमेदवारांचे व्हिडीओ पाहून रोबोट त्याची माहिती पुढीलप्रमाणे देऊ शकतो.
1. टीमसह म्हणजे गटात काम करण्याची उमेदवाराची क्षमता कशी आहे?
2. त्याची समस्या सोडवण्याची क्षमता कशी आहे?
3. संवादकौशल्य कसं आहे?
4. परिस्थितीशी आणि भवतालाशी तो किती चांगल्या पद्धतीनं जुळवून घेतोय?
5. शिकण्याची इच्छा किती आहे.
6. विवेक कितपत जागा आहे.
7. जबाबदारी घेण्याची तयारी कितपत आहे.
8. उत्तम काम करण्याची जिद्द, पुढाकार घेऊन काही तडीस नेण्याची क्षमता किती आहे.
9. मानसिक स्थैर्य कसं आहे.
10. ताणतणाव कसे हाताळतो आहे.
आपल्याकडे ‘हे’ होईल का?
जग ज्या वेगानं बदलतं आहे ते पाहता रोबोट रिक्रुटमेण्ट आपल्याकडेही केल्या जातील. आजही काही कंपन्या ते करत आहेतच. मात्र हे सारं होणार असेल तर आपण तयार आहोत का हा प्रश्न आहे. अनेक जणांना अजून आपला रिझ्युम लिहिता येत नाही, तिथं तुमचा व्हिडीओ रिझ्युम पाठवा असं सांगितलं तर कसं पाठवणार? निदान यापुढे स्काइपसारख्या व्हिडीओ मुलाखतीची तरी तयारी करावीच लागेल. आपल्याला येणार्या कौशल्यासह संवाद कौशल्य सुधारणं हीदेखील मोठी गरज बनणार आहे.
***
एआय आता उमेदवार निवडीच्या प्राथमिक टप्प्यातच वापरलं जातं आहे. अंतिम निवडीचा निर्णय माणसंच घेत आहेत. मात्र पहिली चाळणी, रिझ्युममध्ये काय लिहिलं आहे, हे तपासण्याचं काम एआय करेल. स्पर्धा प्रचंड असताना उलट यामुळे लायक उमेदवाराला नोकरी मिळण्याची शक्यता वाढेल. नुस्ता रिझ्युम नाही तर उमेदवाराचा दृष्टिकोन, त्याचं वर्तन हे सारंही तपासलं जाईल. त्यामुळे अंतिम निवड योग्य उमेदवाराची अधिक अचूक होऊ शकेल.
- अमित टेकाळे, तंत्रज्ञान अभ्यासक
**
व्हिडीओ गेम बेस्ड मूल्यमापन?
आपण मुलाखतीला गेलो आणि आपल्याला गेम खेळायला सांगितले असं होऊ शकतं का? तर आगामी काळात होऊ शकतं. विदेशात अनेक कंपन्या आता गेम बेस्ड अॅसेसमेण्ट करतात. कारण तरुण मुलं व्हिडीओ गेम्स खेळायलाही सरावली आहेत. त्यामुळे मुलाखतीसाठी खास गेम्स तयार केले जातात. 30 ते 45 मिनिटांच्या या गेममधून उमेदवारांचा आवश्यक तो स्किल सेट तर तपासला जातोच. मात्र त्यांची निर्णयक्षमता, स्मरणशक्ती, एकाग्र होण्याची क्षमता, मनोवस्था, दृश्यमीमांसा क्षमता, नेतृत्व, चिकाटी, जिद्द असं बरंच काही तपासून लायक उमेदवारांचा शोध घेतला जातो.
त्यामुळे यापुढे व्हिडीओ गेम हा फक्त टाइमपास उरणार नाही, हे लक्षात ठेवलेलं बरं !
****
.आधी रिझ्युम लिहायला शिका!
ऑडिओ-व्हिडीओचा विचार नंतर करा,
आधी कागदावर अनुभव मांडून पहा !
जगभरात सध्या अभ्यास प्रसिद्ध होत आहेत. एआय मुलाखतींची चर्चा आहे. तरीही एक लक्षात ठेवायला हवं की मानवी हस्तक्षेपाला आणि निर्णयाला काहीच पर्याय नाही. आणि आपल्याकडे भारतात यापद्धतीनं रिक्रुटमेण्ट व्हायला अजून बराच काळही लागेल. ज्या नोकर्या पूर्णतर् टेक्नॉलॉजी ड्रिव्हन आहेत, तिथं अशा एआय मुलाखती होतात. सरसकट सगळीकडे काही अशा एआय आधारित मुलाखती होत नाहीत. त्यामुळे उगीच काळाच्या आधी काठी बडवू नये असं मला वाटतं.
मात्र हे म्हणत असताना आपल्या तरुण मुलांनी काही गोष्टी नीट समजून घ्यायला हव्यात. मी दिवसाला किमान 5 ते 50 रिझ्युम बघतो. ते लायक की नाहीत हे ठरवायला मला अर्धा सेकंद लागतो कारण त्यात असलेल्या चुका किंवा न सांगितलेल्या गोष्टी. त्यामुळे जिथं अनेकांना हातानं नीट रिझ्युम लिहिता येत नाहीत, ते ऑडिओ-व्हिडीओ रिझ्युम कसे करणार? तेवढं कम्युनिकेशन स्किल तरुणांकडे आहे का?
आयटी किंवा आयटीशी संबंधित कॉल सेंटरमध्ये ऑडिओ रिझ्युम मागवले जातात. ते आवाज, इंग्रजी भाषा, अॅक्सेण्ट, भाषेचा फ्लो हे सारं तपासण्यासाठी. त्यामुळे बाकीच्यांनी फार पुढचा विचार न करता आधी आपला कागदावरचा रिझ्युम तरी नीट लिहायला शिकायला हवं. ते तंत्र तरी शिकून घ्यायला हवं. मुळात रिझ्युम कसा लिहावा हेदेखील अनेकांना माहिती नसतं, त्यातून ते स्वतर्ची संधी घालवतात.
1. रिझ्युममध्ये आपली जन्मतारीख स्पष्ट असावी. शिक्षणाचे टप्पे नीट एकामागोमाग लिहावे. गॅप दिसली तर त्याकाळात तुम्ही काय करत होतात हे स्पष्ट आणि नेमकं लिहावं.
2. मुळात नेमकं लिहिणं ही रिझ्युमची गरज आहे. तुम्ही काम काय करता हे स्पष्ट लिहा. म्हणजे अमुक कंपनीत तमुक पदावर नाही तर त्या कंपनीत कोणती डिव्हिजन, काय काम, तुमचा रोल काय, तुम्ही नेमकं काय काम करून, काय रिझल्ट दिले हे सारं लिहा.
3. तुम्ही जे काम केलं त्यानं कंपनीत काय व्हॅल्यू अॅडिशन केली. ते काम व्हॅल्यूत कसं बदललं ते लिहा.
4. तुम्ही नेमकं काय काम करता हे समोरच्याला वाचून क्षणात कळलं पाहिजे. तुमचा अनुभव नेमका कळला पाहिजे.
5. रिझ्युम नेमका लिहायला शिकणं ही आत्यंतिक महत्त्वाची गरज विसरू नका. मग पुढच्या टप्प्यांचा विचार करा.
- गिरीश टिळक, मनुष्यबळ विकास तज्ज्ञ