रोज तेच्च ते! -ऑफिसला जाण्याचा कंटाळा आलाय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 03:42 PM2019-11-14T15:42:30+5:302019-11-14T15:43:11+5:30

आपण नोकरी करतो, आनंदानं करतो का? रोज ऑफिसला जाताना आनंदी असतो का? की मारून मुटकून करतो?

routine life ? are you making excuse? | रोज तेच्च ते! -ऑफिसला जाण्याचा कंटाळा आलाय?

रोज तेच्च ते! -ऑफिसला जाण्याचा कंटाळा आलाय?

Next
ठळक मुद्देतुम्हाला आवडेल असंच काम निवडा, परंतु नावडतं काम करावं लागलं तर ते नावडतं काम आवडीने करायला शिका!

- डॉ. भूषण केळकर

मी आता इकडे कॅलिफोर्नियाहून न्यूयॉर्कच्या विमानात बसण्याकरता रांगेत उभा होतो. लांबवरच्या काउंटवरच्या एक ऑफिसरने मला बोलावले, ‘चेक इन’ करायला मदत करते म्हणाली. सर्व कागदपत्रे पाहून बॅग्जचे वजन केल्यावर एका बॅगेचे वजन 54 पाउंड आणि दुसरीचे 40 पाउंड भरले. विमानात दोन बॅगा प्रत्येकी 50 पाउंडर्पयत चालतात. त्यामुळे ‘तुम्ही जरा बाजूला उभे राहून बॅग्जचे वजन अ‍ॅडजस्ट करून या’ म्हणाली. हे सगळं स्मितहास्य चेहर्‍यावर ठेवून! कपाळावर आठय़ा पाडून नव्हे!
पुढे सिक्युरिटीमध्ये माझ्या हातातल्या सामानात मित्राने दिलेला ‘बाकलावा’ नावाचा खाण्याचा (चिक्कीसारखा) गोड पदार्थ होता. त्याबद्दल खात्री करून मला पुढे जायला परवानगी देताना तिथली सिक्युरिटीची मुलगी म्हणाली, यू आर गुड टू गो, बट डोण्ट फरगेट टू ब्रश व्हेन यू इट धिस!   चिक्कीसारखा गोड पदार्थ असल्याने, खाल्ल्यावर ब्रश करायला विसरू नको हे सांगण्याचा सहजपणा, त्यातला नर्म विनोद ही सारी वरकरणी दिसायला अत्यंत साधी उदाहरणं आहेत.
पण मला महत्त्वाची जाणवलेली गोष्ट म्हणजे त्या दोघींची आपलं काम  एन्जॉय करण्याची वृत्ती. 
आपल्याकडं कसं चित्र दिसतं? जो तो आपापल्या विवंचनेत! काम करताना आपण दुसर्‍यावर उपकार करतोय, पोट जाळायला करावंच लागतं म्हणून करतोय किंवा अन्य पर्यायच नाही म्हणून हे करतोय असे दुमरुखलेले, कंटाळलेले, कटकटलेले चेहेरे, तशीच देहबोली. त्यासह सुरू असलेलं काम.
ही गोष्ट खरी आहे की भारतात विवंचना आणि प्रश्न, त्याचं स्वरूप, याची व्याप्ती वेगळी आहे. इथल्या परिस्थितीशी सरसकट तुलना पाश्चिमात्य देशांशी करणं चूकच आहे, तरीसुद्धा आपल्याला सॉफ्ट स्किल्समध्ये शिकायची गोष्ट आहे. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं सूत्र म्हणजे, एन्जॉय व्हाट यू डू! 
परदेशात तुम्ही पहाल तर अनोळखी लोक तुम्हाला सहजपणे  गुड मॉर्निग म्हणतील! आपण मात्र काही कारण असेल तरच दुसर्‍याकडे पाहून हसतो!
तुम्हाला गंमत म्हणून एक गोष्ट सांगतो. अर्थात, ती सॉफ्ट स्किलशी निगडित आहे. मोबाइल नसलेल्या काळातली ही गोष्ट. एका फॅक्टरीत एक स्त्री काम करत असते. तिथं येणार्‍या अनेक कर्मचार्‍यांमधील हीच स्त्री फक्त त्या फॅक्टरीच्या सिक्युरिटी गार्डला  सकाळी न चुकता गुड मॉर्निग म्हणत असे. काम संपवून घरी जाताना तशीच सुहास्यमुद्रेने गुडबाय म्हणायची आणि घरी जायची.
एक दिवस ही स्त्री ओव्हरटाइम करते आणि कामावरून तिला घरी जायला उशीर होतो. खरंतर खूप उशीर होतो. इतका की तिच्या युनिटची सर्व दारं बंद केली जातात. ती आत फॅक्टरीत अडकते. खायला-प्यायला नाही, घरच्यांना कळवता येत नाही. अत्यंत काळजीत असताना तो सिक्युरिटी गार्ड नेमका दारं उघडून आत येतो आणि तिला म्हणतो, ओह, देअर यू आर!’ 
कुठलीही सूचना मिळालेली नसताना तो फॅक्टरी उघडून तिचं युनिट तपासतो कारण त्याला आठवतं की सकाळी तर या बाई आत कामाला गेल्या पण आज जाताना दिसल्या नाहीत, गुडबाय म्हणाल्या नाहीत आणि तिचं युनिट तर बंद आहे. इतर सर्व घरी गेलेत. म्हणजे ती नक्कीच अडकली आहे!
गोष्ट सोपी, पण साधं सॉफ्ट स्किल्स माणसांना कसं कनेक्ट करतं आणि त्याचा काय फायदा होतो हे सांगणारी.
आपलं काम आनंदानं करणं, नम्रतेनं बोलणं हे एक महत्त्वाचं सॉफ्ट स्किलच आहे. 
विवेकानंद म्हणत तुम्हाला आवडेल असंच काम निवडा, परंतु नावडतं काम करावं लागलं तर ते नावडतं काम आवडीने करायला शिका!

Web Title: routine life ? are you making excuse?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.