धावणारी स्वप्नं : किसन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2018 12:16 PM2018-03-08T12:16:08+5:302018-03-08T12:16:28+5:30
डोंगराळ, आदिवासी भागात गुराढारांमागे तो धावायचा. जंगलात त्यांना चरायला न्यायचा. आता आंतरराष्ट्रीय ट्रॅकवर सुसाट सुटलाय...
किसन तडवी.
लहानपणापासून त्यानं पाहिले ते फक्त डोंगर-दºया, जंगल, शेळ्या-मेंढ्या, गुरंढोरं, अंगावर फडतुरंही नसलेले, जंगलाच्या आधारानं जगत असलेले आदिवासी, घरातल्या सगळ्यांचंच दिवसरात्र राबराब राबणं, साधं दोनवेळचं खायलाही न मिळणं आणि अठराविसे दारिद्र्य..
शिवाय कुटुंबही मोठं. पाच भाऊ, तीन बहिणी, आई, वडील.
किसन सर्वांत धाकटा.
अशा मुलांच्या आयुष्यात जे येतं तेच त्याच्याही आयुष्यात आलं.
केवळ चार-पाचशे आदिवासी लोकवस्तीचं बर्डी हे त्याचं जन्मगाव. तालुका अक्कलकुवा, जिल्हा नंदुरबार.
डोंगरावरची थोडीफार कोरडवाहू शेती. वडील त्यातच राबतात. अर्थातच त्या डोंगराळ जमिनीतून पीक फारसं येत नाहीच. मग बाहेर मजुरी.
लहानपणापासूनच किसनही शेतात कामाला जायचा.
त्याच्या कुटुंबात दहा माणसांशिवाय खाणारे अजूनही काहीजण होते.
पाच बकºया, चार बैलं आणि दोन गायी!..
दिवसभर या गुरांच्या मागे तो हिंडायचा, पळायचा, ही गुरं कुठं गेली की त्यांना गोळा करून आणायचा. घरी स्वत:लाच खायला नाही, तर या गुरांना कुठून पोसणार? या सगळ्या गुरांना घेऊन तो दूर जंगलात त्यांना चरायला घेऊन जायचा. जिथं खायला मिळेल तिथं गुरं पांगायची. संध्याकाळी या साºया गुरांना घरी परत घेऊन यायचं हे सर्वांत मोठं काम. त्यांच्यामागे पळून, त्यांना हुडकून या साºया गुरांना संध्याकाळी तो बरोब्बर परत घरी घेऊन यायचा. लहान असला तरी हे काम त्याला जमायचं.
बरीच वर्षं हे असंच चाललं होतं.
शिकण्याची ऐपत नव्हती, म्हणून जवळच्याच आश्रमशाळेत किसनचं नाव घातलं. तेवढंच घरातलं खाणारं एक तोंड कमी होणार! राहणं, खाणं-पिणं, कपडेलत्ते, शिक्षण, सगळं परस्पर होऊन जायचं.. त्याची इतर भावंडं तर जवळपास अशिक्षितच. जी काही थोडंफार शिकली, तिही आश्रमशाळेतच. फुकट! परिस्थितीमुळे तिसरी-चौथीच्या पुढे कोणीच गेलं नाही.
किसनचा भाऊ नाशिकला राहायचा.
तिसरीत असताना त्यानं किसनला नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरीला आणलं. तिथे मिशन बोर्डिंग होस्टेलमध्ये किसन राहायचा. शेकडो अडचणींशी सामना करत किसननं तिसरी, चौथी इथंच कसंबसं केलं.
याचवेळी किसनच्या आयुष्यात एक मोठी घटना घडली.
कुठेतरी टपरीवर किसनच्या मोठ्या भावानं ‘लोकमत’ वृत्तपत्रात एक छोटीशी बातमी वाचली.. ‘आदिवासी विद्यार्थ्यांना नाशिकच्या भोसला विद्यालयात प्रवेश देण्यात येणार!’
भाऊ लगोलग दिंडोरीला आला आणि किसनला घेऊन नाशिकला पोहोचला.
ते वर्षं होतं २००८.
जवळपास पाचशेच्या वर आदिवासी मुलं आली होती. त्यांच्यातून ४५ जणांची निवड करायची होती. धावणं, लांब उडी, उंच उडी.. वगैरे अनेक चाचण्या घेण्यात आल्या. किसनसाठी सर्वार्थानं तो खेळच होता. पाचशे मुलांमधून तो सातवा आला. त्याचं सिलेक्शन झालं आणि भोसला विद्यालयात पाचवीत त्याची अॅडमिशन झाली. राहाणं, खाणं-पिणं तिथेच होस्टेलवर.
नाशिकला एका सिलेक्शन ट्रायलमध्ये कोच विजेंद्र सिंग यांनी त्याला पळताना पाहिलं. त्यांनी त्याला सांगितलं, उद्यापासून मैदानावर रोज सरावाला येत जा. किसन अगोदर शॉट डिस्टन्स म्हणजे शंभर मीटर, दोनशे मीटर स्पर्धांत पळायचा. सिंग सरांनी त्याला लॉँग डिस्टन्ससाठी तयार केलं.
पाचवीत असताना काही दिवसांतच राज्य स्पर्धेसाठी त्याचं सिलेक्शन झालं. सहावी-सातवीत नॅशनलसाठी सिलेक्शन आणि त्यात ब्रॉँझपदकही! आठवी-नववीतही तोच कित्ता. थेट गोल्ड!
किसनचा सराव वाढत होता आणि त्याचबरोबर आत्मविश्वासही.
२०१३ ला झालेल्या स्कूल नॅशनल स्पर्धेत तर या आदिवासी मुलानं धमाका केला. तीन किलोमीटर, पाच किलोमीटर आणि क्रॉस कंट्री या तिन्ही स्पर्धांत गोल्ड!
त्यावर्षीचा सर्वोत्कृष्ट अॅथलिट म्हणून किसनला गौरवण्यात आलं. त्यानंतर गोव्यात झालेल्या ज्युनिअर नॅशनल स्पर्धेतही गोल्ड मेडल पटकावताना त्यानं थेट नॅशनल रेकॉर्डच आपल्या नावे केलं! किसन थांबायचं नाव घेत नव्हता. देशातल्या प्रत्येक राष्टÑीय स्पर्धेत आपल्या नावाचा झेंडा त्यानं रोवला.
पण नुसत्या राष्टÑीय पातळीवरील कामगिरीतून त्याचं समाधान होत नव्हतं.
आंतरराष्टÑीय स्पर्धाही त्यानं गाजवायला सुरुवात केली!..
थायलंड येथे झालेल्या युथ एशियन आॅलिम्पिकमध्ये तीन किलोमीटर स्पर्धेत त्यानं सिल्व्हर मेडल पटकावलं.
२०१५ पासून पुढची तिन्ही वर्षं तर जणू त्याचीच होती. या काळातल्या सगळ्या आंतरराष्टÑीय स्पर्धा त्यानं गाजवल्या आणि त्यावर आपली छाप सोडली!
२०१५ मध्ये दोहा, कतार येथे झालेल्या युथ एशियन अॅथलेटिक चॅम्पियनशिप स्पर्धेत तीन किलोमीटरमध्ये गोल्ड, त्याच वर्षी चीनमध्ये झालेल्या वर्ल्ड स्कूल गेम्समध्येही गोल्ड, कोलंबियात झालेल्या वर्ल्ड युथ गेम्समध्ये सहावा क्रमांक, बारावीत असताना बहारीन येथे झालेल्या एशियन क्रॉस कंट्री स्पर्धेत सातवा क्रमांक, त्याच वर्षी व्हिएतनाम येथे झालेल्या ज्युनिअर एशिया अॅथलेटिक चॅम्पियनशिप स्पर्धेत ब्रॉँझ आणि गेल्या वर्षी २०१७ मध्ये वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स या आत्यंतिक प्रतिष्ठेच्या स्पर्धेत १३ व्या क्रमांकापर्यंत झेप..
या काळात राष्टÑीय पातळीवर किती पदकांची त्यानं लयलूट केली त्याची तर संख्याही मोजता येणार नाही!
किसन सांगतो, ‘सुरुवातीचा काळ खूपच स्ट्रगलचा होता. धावण्यापेक्षाही त्या शहराची, त्या देशांचीच भीती वाटायची. डोंगराळ, आदिवासी भागात गुराढारांमागे धावणारा मी, शहरात आलो, तेव्हा थोडा बावरलोच. नाशिकला आल्यावर शहरीकरणाला थोडा सरावलो; पण पहिल्यांदा जेव्हा देशाबाहेर पाऊल ठेवलं, तेव्हाही असाच बिचकलो. मात्र मैदानावर पाऊल ठेवलं की मग माझ्या मनातली भीती, दडपण कुठल्या कुठे पळून जात. आता तर देश-विदेशांतल्या अनोळखी मैदानांवर धावतानाही मला काही वाटत नाही.’
२०२० चं टोकिओ आॅलिम्पिक हे किसनचं ध्येय असलं तरी आता थोड्याच दिवसात जपानमध्ये होणाºया एशियन गेम्सकडे त्याचं अधिक लक्ष आहे..
शेळ्या-मेंढ्या चारणाºया या आदिवासी तरुणानं आता जागतिक पातळीवर आपली कीर्ती पोहोचवलीय; पण अजूनही त्याची ‘परिस्थिती’ फारशी बदललेली नाही. स्पॉन्सर्सकडून मिळालेल्या मदतीवर त्याचा खर्च चालतो. पण, बºयाचदा स्पर्धेत धावल्यानंतर जे रोख पैसे मिळतात, ते घरी पाठवल्यावरच त्यांचा रोजचा गाडा पुढे सरकतो..
नाशिकच्या भोसला महाविद्यालयात किसन एसवाय बीए करतोय. पाचवीपासून तिथल्याच होस्टेलवर राहतोय. अबोल. बोलते ती फक्त त्याची कामगिरी.
किसन सांगतो, ‘मी खरं तर नाशिकला आलो होतो, ते केवळ शिक्षणासाठी. भाऊ, घरचे त्यांच्यामुळे हे झालं. पळत राहीन, थांबणार नाही.’
किसनचं वय पाहता अजून त्याच्या हातात जवळपास आठ-दहा वर्षं आहेत. मेहनत केली तर आॅलिम्पिकपर्यंत त्याची झेप नक्कीच जाईल असा त्याच्या प्रशिक्षकांनाही विश्वास आहे...
विशेषांक लेखन - समीर मराठे
(लेखक लोकमत वृत्तसमुहात उपवृत्त संपादक marathesam@gmail.com)