धावणारी स्वप्नं : कविता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2018 12:21 PM2018-03-08T12:21:29+5:302018-03-08T14:36:23+5:30

आपल्याला माहीत आहे ती आॅलिम्पिकमध्ये धावलेली आदिवासी पाड्यावरची गरीब मुलगी. आॅलिम्पिकपर्यंतची काट्याकुट्यांची वाट आता मागे पडली; पण संघर्ष.. तो कुठं संपलाय?

Running Dreams: Kavita | धावणारी स्वप्नं : कविता

धावणारी स्वप्नं : कविता

Next

विशेषांक लेखन - समीर मराठे

(लेखक लोकमत वृत्तसमुहात उपवृत्त संपादक marathesam@gmail.com)

छायाचित्रे - प्रशांत खरोटे

स्पर्धेच्या मैदानावर जीव खाऊन पळणारे हे तरुण पाय ! वाटेत गरीबीचे अडथळे आणि अडचणी. अनेक जण तर थेट आदिवासी पाड्यावरल्या कुटुंबातून आलेले! लहानपणापासून मजुरी करण्यापासून ते अगदी शेळ्या-मेंढ्या चारण्यापर्यंतची कामं केलेली. कोणाचे आई-वडील आजही रोजंदारीवर मजुरीला जातात, कोणी रेताड, नापिक शेतात रक्ताचं पाणी करतात, तर कुणी छोटीमोठी नोकरी करून पोट भरतात. हातात पैसा नाही, सुविधा नाहीत. नशिबात कायम परवडच. पण या मुलांनी पायातली ताकद ओळखली आणि पळणं सुरु केलं..
आधी शहरही नव्हतं पाहिलं, वेस ओलांडली ती थेट आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घ्यायलाच!

ते आता पळतात मैदानातही, मैदानाबाहेरही. हे सगळेच खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळलेले... अनेक पदकं जिंकली. नवे रेकॉर्ड केले. मात्र त्यांच्याकडे आजही ना पैसा आहे, ना ग्लॅमर. त्यांना त्याचीही काही फिकीर नाही. ते फक्त पळतात... कुठे कुठे काम करून आपला खर्च भागवतात. बक्षिसाच्या रकमेतून गावपाड्यांतलं आपलं घरही चालवतात. धावण्याच्या मैदानावरील त्यांच्या जिद्दी संघर्षाची,
त्यांच्या वाटेतल्या अडथळ्यांची आणि हार न मानणा-या हट्टीपणाची एक वेगवान कहाणी..

अडचणी, अभाव, अडथळे यांना ओलांडण्याची हिंमत धरणा- या 10 तरुण स्वप्नांची वेगवान कहाणी
 

‘सावरपाडा’ या हजार-बाराशे लोकवस्तीच्या छोट्याशा आदिवासी पाड्यावरची कविता राऊत. लहानपणी दोन वेळेचं जेवणही कसंबसं मिळणारी. मैलोन्मैल डोक्यावर पाण्याचे हंडे वाहणारी. शाळेत जाण्यासाठी काट्याकुट्यांतून, फुफाट्यांतून सात सात किलोमीटर अंतर पायी तुडवणारी, अनवाणी चालणारी, तशीच धावणारी.. यशाच्या एकेक पाय-या चढत आंतरराष्ट्रीय पातळीवर तिनं आपली छाप सोडली. अगदी आॅलिम्पिकपर्यंत पोहोचली..
इथपर्यंतचा तिचा प्रवास तसा सगळ्यांना माहीत आहे; पण पुढे काय?..
आज जवळपास तेवीस वर्षं झाली, कविता राऊत अजूनही मैदानावर आहे.
इतकी वर्षं स्वत:ला स्पर्धात्मक पातळीवर टिकवून ठेवणं, प्रत्येक वेळी नव्यानं स्वत:ला सिद्ध करणं, इतरांच्या आणि स्वत:च्याही अपेक्षांना पुरे पडणं.. कुठून येते ही शक्ती? त्यासाठी कोणकोणत्या दिव्यातून जावं लागतं?..
अनवाणी पायांनी डोंगर-दºयांतून, काट्याकुट्यांतून धावणारी कविता आता कधीच मागे पडली आहे. बºयापैकी आर्थिक संपन्नता आता तिच्याकडे आली आहे; पण म्हणून या प्रवासातले कष्ट, टेन्शन, टिकून राहण्यासाठी करावी लागणारी मेहनत संपलीय का?..
नाही, ती आणखी वाढलीय. जितक्या उंचीवर आपण पोहोचतो, तितकं त्या उंचीवर टिकून राहणं आणि तिथून आणखी पुढे जाणं हे त्यापेक्षा कैक पटीनं अवघड आणि आव्हानात्मक असतं. कवितानं तर प्रत्येक क्षणी त्याचा अनुभव घेतला.
एक आॅलिम्पियन होणं किती कष्टाचं असतं आणि किती वेळा तुम्हाला स्वत:लाच तलवारीच्या धारेवर उभं करावं लागतं हे कविताच्या अनुभवांतून लक्षात येतं..
२०१६च्या रिओ आॅलिम्पिकनंतर आणि आज वयाच्या तेहेतिशीतही कविताचा मैदानावरचा प्रवास अजून संपलेला नाही. आपल्या पायातले शूज तिनं अजून उतरवलेले नाहीत. सध्या काय करतेय ती? आजवरचा तिचा अनुभव कसा होता?..
कविता तशी मनमोकळी असली तरी स्वत:च्या अडचणींचे गा-हाणे आणि रडगााणे गात बसायला तिला कधीच आवडत नाही. त्यामुळेच तिच्या सुरुवातीच्या खडतर प्रवासाशिवाय इतर अनेक गोष्टी अनेकांना माहीतच नाहीत. तिच्याशी गप्पा मारताना अचानक कधीतरी नवीनच गोष्टी कळतात..
परवाच कविताला पुन्हा भेटलो. गेले काही दिवस ती आजारी आहे. अंथरुणावरच होती. सगळ्या तपासण्या वगैरे सुरू आहेत. डॉक्टरांकडे आली असताना तिला गाठलं...
गप्पांच्या ओघात तिला विचारलं, आॅलिम्पिक झालं, आता पुढे काय?..
कविता सांगते, ‘पुढच्या आॅलिम्पिकचं तर मी आत्ताच काही सांगू शकत नाही; पण या वर्षअखेरीस आॅक्टोबर २०१८मध्ये होणाºया आशियाई स्पर्धेत मात्र मी खेळणार आहे.’ अर्थातच त्याआधी राष्टÑीय स्पर्धांतील चाचणींतून तिला जावं लागेल. क्वॉलिफाय टाइम उत्तम देत पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करावं लागेल...
प्रत्येक खेळाडूच्या आयुष्याचं हे चक्रच आहे. प्रत्येक वेळी स्वत:ला सिद्ध करत करत पुढे जावं लागतं. अडथळ्यांवर, अडचणींवर मात करत ध्येय गाठावं लागतं.
कविताच्या आयुष्यात तर असे कितीतरी प्रसंग आले. त्या त्या प्रत्येक टप्प्यावर तिला निराशेचा सामना करावा लागला. टीकाकारांची बोलणी झेलावी लागली. ‘कविता आता तू संपलीस..’ असं तोंडावर सांगणारेही कमी नव्हते. पण प्रत्येक वेळी कवितानं त्यांना खोटं ठरवलं आणि पुढे निघाली.
खेळाडूंच्या आयुष्यात छोट्या-मोठ्या इंज्युरीज येतच असतात. कविताच्याही आयुष्यात आल्या. पण काही मोठ्या दुखापती अशा होत्या, ज्यामुळे तिचं करिअर अकालीच संपतं की काय, अशीही शक्यता निर्माण झाली.
कविता आपली आठवण सांगते, ‘२००६ची गोष्ट. त्यावेळी बंगळुरूच्या नॅशनल कॅम्पमध्ये मी होते. मैदानावर सराव करत असताना अचानक पायाखाली गोल्फचा एक बॉल आला. मी पडले. डाव्या पायाला फ्रॅक्चर झालं. सहा आठवडे पूर्णपणे बेड रेस्ट आणि त्यानंतर हाड जुळण्यासाठी चार महिने! जवळपास सहा महिने त्यात वाया गेले!’
२०१४मध्ये कविताला पुन्हा एक अपघात झाला. त्याच पायाला; पण दुसºया ठिकाणी. कदाचित ओव्हर वर्कलोडचा, ओव्हर प्रॅक्टिसचाही तो परिणाम असावा. पुन्हा फ्रॅक्चर, पुन्हा बेड रेस्ट, पुन्हा सराव शून्यावर. यावेळीही जवळपास सहा महिने गेले.. पुन्हा कुजबुज सुरू झाली.. कविता संपली!
कविता सांगते, २०१४ हे वर्ष माझ्यासाठी अत्यंत खडतर आणि क्षणाक्षणाला माझी सत्त्वपरीक्षा पाहणारं होतं. ज्या ज्या म्हणून मोठ्या अडचणी असतील, त्या त्या माझ्या समोर येत होत्या. मला खचवत होत्या. माझ्या ध्येयापासून मला परावृत्त करीत होत्या. २०१६च्या आॅलिम्पिकचं स्वप्न मी पाहात होते; पण हे स्वप्न प्रत्यक्षात उतरू नये, अशाच घटना एकामागोमाग एक घडत होत्या..
२०१४ ची ती घटना तर कविता आजही विसरू शकत नाही. त्या घटनेनं तिला अंतर्बाह्य हलवलं होतं. तिच्या स्वप्नांचा प्रवास जवळजवळ संपलाच होता..
२०१३ला कविताचं लग्न झालं. त्यानंतर नवºयाबरोबर त्याच्या एका डॉक्टर मित्राकडे दोघंही सहजच भेटायला म्हणून गेले होते. कविताला तो दिवस आजही लख्ख आठवतो. आॅगस्ट २०१४. गप्पा मारत असताना कवितानं मान वळवल्यावर डॉक्टर मित्राच्या लक्षात आलं, कविताच्या गळ्याजवळ कसलीतरी गाठ होती. कविताला आजवर ते फारसं कधी जाणवलं नव्हतं; पण डॉक्टरांच्या तीक्ष्ण नजरेनं ते ताबडतोब हेरलं. त्यानं लगेच कविताकडे चौकशी केली, गाठ कसली आहे? काही तपासणी वगैरे केलीय का? कविता अर्थातच त्याबाबत अनभिज्ञ होती.
एका वाईट शंकेची पाल क्षणार्धात सगळ्यांच्या डोळ्यांपुढे चमकून गेली! ही गाठ कॅन्सरचीही असू शकत होती!
डॉक्टर मित्रानं कविताला सराव वगैरे ताबडतोब बंद करायला सांगितला. आधी सगळ्या तपासण्या. आॅपरेशन करून गाठ काढली गेली. त्याची खूण आजही कविताच्या मानेवर दिसते. ही गाठ कॅन्सरची आहे किंवा काय, यासाठी बायोप्सी केली गेली. अनेक प्रकारच्या तपासण्या केल्या गेल्या. या साºया प्रक्रियेत दीड दोन महिने गेले. सुदैवानं रिपोर्ट निल आला..
कविता सांगते, माझ्या अपघातांमुळे, दुखापतींमुळे ‘कविता संपल्याची’ ओरड तर लोक करीतच होते; पण या घटनेनं मी स्वत:च जणू काही संपले. अक्षरश: खचले. माझ्या स्वप्नांचाच जणू चक्काचूर होत होता आणि मला तर माझं आॅलिम्पिकचं स्वप्न असं अर्ध्यातच सोडून द्यायचं नव्हतं. कितीतरी दिवस आणि रात्री मी रडतच काढल्या. अनेकदा रडत रडतच घरी यायचे. रिपोर्ट निल आल्यानंतर हायसं वाटलं; पण मी खरंच खचले होते. डिप्रेस्ड झाले होते. आजवरच्या साºया अडथळ्यांवर मी जिद्दीनं आणि न डगमगता मात केली होती. पण हा आघात पचवायला मला फारच जड गेलं.. माझा सराव सुरू होता. स्पर्धांतही भाग घेत होते; पण बºयाचदा धावता धावता अचानक स्पर्धाही मी मधूनच सोडून देत होते. यातून बाहेर कसं पडायचं म्हणून सारे प्रयत्न मी करीत होते. सारखा विचार करीत होते. (कै.) क्रीडामानसोपचार तज्ज्ञ भीष्मराज बामसरांची मला यासाठी खूपच मदत झाली, पण असतील नसतील ते सारेच उपाय मी करून पाहात होते. ध्यानधारणा, श्वसनाचे व्यायाम करत होते. पण या अवस्थेतून बाहेर पडायला खूप दिवस लागले. माझा परफॉर्मन्स तर अगदी शून्यावर आला होता. अक्षरश: ज्युनिअर मुलांबरोबर मी सराव करीत होते...’
याच काळात मग कवितानं आपलं खूप वर्षांपासून अडलेलं शिक्षण पुढे चालू केलं. कविता २००२मध्ये दहावी पास झाली होती. त्यानंतर २००४मध्ये बारावीला असताना ऐन परीक्षेच्या दिवशीच कविताची एशियन क्रॉस कंट्री स्पर्धा होती. ही तिची पहिलीच इंटरनॅशनल स्पर्धा होती. साहजिकच तिला बारावीची परीक्षा देता आली नाही. त्यानंतरही बºयाचदा असं झालं, बारावीची परीक्षा ती देऊ शकली नाही आणि तिचं शिक्षण थांबलं ते थांबलंच.
काहीच होत नाहीए तर निदान बारावी तरी पूर्ण करूया म्हणून कवितानं मग अभ्यासात डोकं घालण्याचा प्रयत्न केला. २००२ला दहावी झालेली कविता रिओ आॅलिम्पिकच्या आदल्या वर्षी म्हणजे मार्च २०१५मध्ये बारावीची परीक्षा पास झाली!
आदिवासी गावपाड्यांतून आणखी ‘कविता’ तयार व्हाव्यात यासाठी कविता आता प्रयत्नशील आहे. त्यासाठी केवळ अ‍ॅथलेटिक्सच नाही, तर सर्वच खेळांना प्रोत्साहन मिळावं आणि खेळाडू तयार व्हावेत यासाठी ‘कविता राऊत फाउण्डेशन’ची स्थापना तिनं केलीय. कविता म्हणते, ‘खेळत असताना माझं शिक्षणाकडे दुर्लक्ष झालं; पण खेळाइतकंच शिक्षणही महत्त्वाचं आहे. माझ्या संस्थेच्या माध्यमातून मी तोच प्रयत्न करणार आहे.’
कविता त्यासाठी गाव आणि तालुका पातळीवर जाऊन गावपाड्यांतलं टॅलण्ट शोधते आहे. उत्तम खेळाडू घडवण्यासाठी प्रयत्न करते आहे. तिच्या या उपक्रमाला सुरुवात झाली आहे..

‘आयसीयू’ ते आॅलिम्पिक!
कविताच्या मागे लागलेलं अडचणींचं शुक्लकाष्ट थांबता थांबत नव्हतं. आॅलिम्पिक अगदी तोंडावर आलेलं असतानाही ते थांबलं नव्हतं.
२१ जानेवारी २०१६ला कविताच्या सास-यांचा मोठा अ‍ॅक्सिडेंट झाला. अगदी जिवावरचं दुखणं होतं. बरेच दिवस ते आयसीयूत आणि बेशुद्ध होते. कविता हॉस्पिटलमध्ये राहत सकाळी आयसीयूतूनच जमेल तशी प्रॅक्टिसला जात होती.. साऊथ एशियन गेम्स त्यावेळी अगदी तोंडावर होते. ही स्पर्धा कवितासाठी सर्वस्व होती. तिनं आयुष्यभर जपलेलं स्वप्न याच स्पर्धेवर अवलंंबून होतं. कारण याच स्पर्धेतल्या कामगिरीतून काही महिन्यांत होणाºया रिओ आॅलिम्पिकसाठी सिलेक्शन होणार होतं. कवितासाठी हा शेवटचाच चान्स होता. लंडन आॅलिम्पिकसाठीही तिनं जिवापाड प्रयत्न केले होते; पण त्यावेळी आॅलिम्पिकचं तिचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नव्हतं.. १२ फेब्रुवारी २०१६ला साऊथ एशियन गेम्स होते. त्यात भाग घेण्यासाठी ६ फेब्रुवारी रोजी आयसीयूतूनच कविता स्पर्धेसाठी रवाना झाली. ४२ किलोमीटरची फूल मॅरेथॉन!
या स्पर्धेत कवितानं गोेल्ड जिंकलं आणि रिओ आॅलिम्पिकसाठीही तिचं सिलेक्शन झालं! ही स्पर्धा जिंकल्यानंतर कविताला आपल्या अश्रूंना बांध घालता आला नाही..


‘कविता’ पुढेही घडतील!
चौथीत असताना १९९५मध्ये कवितानं स्पर्धात्मक करिअरला सुरुवात केली. आज २०१८! गेली २३ वर्षे आणि वयाच्या ३३व्या वर्षीही तिचा हा प्रवास अव्याहत सुरूच आहे..
कविता सांगते, अजून किती वर्षं मी ट्रॅकवर असेन हे आताच सांगता येत नाही, पण ट्रॅकशी असलेलं माझं नातं आयुष्यात कधीच संपणार नाही. या खेळातील आत्यंतिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेशन्स. त्यामुळेच मी इतका प्रदीर्घ काळ, इतका मोठा पल्ला गाठू शकले. पण ज्या अ‍ॅथलेटिक्सनं मला ओळख दिली, ते मी कधीच विसरू शकणार नाही. माझ्यापेक्षाही टॅलेन्टेड ‘कविता’ आणि खेळाडू घडविण्यासाठी मी पुढेही प्रयत्नशील राहीन.’
 


 

Web Title: Running Dreams: Kavita

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.