धावणारी स्वप्नं : पूनम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2018 12:00 PM2018-03-08T12:00:31+5:302018-03-08T12:00:31+5:30
ती बुलडाणा जिल्ह्यातल्या एका खेड्यातली. तिचे आई-वडील शेतमजुरी करतात. धावण्याच्या ओढीनं नाशिकला आली. आणि आत्ता ती चीनला निघालीय.. परवा होणाºया एशियन क्रॉस कंट्रीसाठी!
नाशिकला भोसला मिलिटरी स्कूलच्या मैदानावर पूनम सोनूने या अॅथलिटला भेटलो तेव्हाही ती तिथे सरावच करत होती.
पण तिचं आयुष्यच धावण्यात गेलं आहे. लहानपणापासून ती धावतेच आहे. चार वर्षांपूर्वी ती नाशिकला आली, आता नाशिकचीच झालीय. बारावीत शिकतेय. पण खरं तर ती बुलडाणा जिल्ह्यातल्या सागवन या लहानशा खेड्यातली. तिचे आई-वडील दोन्हीही शेतमजूर आहेत. शेतातच राबतात. गावापासून दोन किलोमीटर अंतरावर शेतातच पत्र्याच्या शेडचं दोन रूमचं त्यांचं घर आहे. गावात सातवीपर्यंत शाळा आहे. पाचवीपर्यंत गावीच तिचं शिक्षण झालं. पण आणखी चांगलं शिक्षण मिळावं यासाठी सहावीपासून ती बुलडाण्याला आली. तिच्या गावापासून शाळा तीन-चार किलोमीटर अंतरावर. रोज पायीच शाळेत जायची. शाळेच्या मैदानावर पळायची. शाळेच्या लहान-मोठ्या स्पर्धांत भाग घ्यायची. सुरेंद्र चव्हाण या क्रीडाशिक्षकानं हे पाहिलं आणि स्वत:च्या पैशांतून तिला एक जुनी सायकल घेऊन दिली. पूनम त्यावेळी सातवीत होती. त्यानंतर घर ते शाळा असा सायकलनं तिचा प्रवास सुरू झाला. आठवीत असताना या प्रवासाला अचानक कलाटणी मिळाली.
त्या वर्षी कांदिवलीत धावण्याची एक राज्यस्तरीय स्पर्धा होती. त्यावेळी एका सरांनी नाशिकचे अॅथलेटिक कोच विजेंद्रसिंग यांच्याशी तिची ओळख करून दिली. विजेंदसिंग सरांची, ज्या मोठमोठ्या खेळाडूंना ते ट्रेनिंग देतात, त्यांची माहिती सांगितली. कविता राऊतचे फोटो पूनम वर्तमानपत्रांतून ओळखतच होती. त्याच क्षणी तिला वाटलं, आपणही नाशिकला जावं. पूनम सांगते, ‘डोक्यात नाशिकचा किडा तर वळवळायला लागला, पण ते इतकं सोपं नव्हतं. पैशाचा तर मोठ्ठाच प्रश्न, शिवाय शिकायचं कुठे, राहायचं कुठे, आपल्याला ट्रेनिंगसाठी सर परवानगी देतील की नाही, शिवाय ‘मुलगी’ असण्याचे तोटे! एकट्या मुलीला परक्या शहरात कसं पाठवायचं, असे प्रश्न...’
पूनमच्या डोक्यात दिवसरात्र नाशिकचाच विचार. घरीही तिनं वडिलांना पटवून ठेवलं; पण जायचं कसं? बुलडाण्यात पाटील म्हणून होमगार्डचे एक सद्गृहस्थ होते. त्यांच्या ओळखीनं पूनमनं मग विजेंद्रसिंग सरांशी फोनवर संपर्क साधला. त्यानंतर पूनम वडिलांसह नाशिकला विजेंद्रसिंग सरांना भेटायला आली. ‘मला ट्रेनिंगसाठी घ्या’ म्हणून त्यांना विनंती केली.
सरांनी परवानगी दिली आणि दहावीत, २२ फेब्रुवारी २०१४ रोजी पूनम नाशिकमध्ये दाखल झाली. ती तारीख तिला चांगलीच लक्षात आहे!
पण इथे आल्यावरचा प्रवास आणखीच खडतर होता. भोसला विद्यालयात दहावीला तिनं अॅडमिशन घेतली. त्यासाठी दहा हजार रुपये लागले. नाशिकच्याच रचना विद्यालयाच्या होस्टेलमध्ये प्रवेश घेतला. होस्टेलची फी अगोदर अडीच हजार, नंतर तीन हजार रुपये महिना...
कसेबसे पैसे जमवले.. त्यानंतरही वडील उधार उसनवारी करून पूनमला खर्चासाठी पैसे पाठवत होते. दोन वर्षं अशीच खूप ओढग्रस्तीत, पाच पाच पैसे वाचवून तिनं काढले.
तिकडेही लोकं वडिलांना टोचून बोलतच होते, ‘तुम्ही एवढे लॅण्डलॉर्ड लागून गेलेत का?.. ऐपत नसतानाही बाहेरगावी मुलीला शिकवता.. शेवटी मुलगी परक्याचंच धन आहे..’ ..पण वडिलांनी कोणाचंच ऐकलं नाही आणि पूनमलाही काहीही झालं तरी नाशिक सोडायचं नव्हतं. मैदानावर एवढी घाम गाळायची, पण त्यानंतरही बºयाचदा तिचा आहार असायचा एक कप चहा आणि दोन बिस्किट!
२०१६ मध्ये हा प्रवास थोडा सुसह्य झाला. भोसलाच्या होस्टेलवर राहायची तिला परवानगी मिळाली. एकलव्य अॅथलेटिक्स स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा यांसारख्या स्पॉन्सर्सकडून काही मदत मिळाली.
भोसलातच शिकायचं आणि तिथल्याच मैदानावर प्रॅक्टिसही करायची!
पूनमची दगदग बºयापैकी कमी झाली, रोजचं टेन्शन थोडं कमी झालं आणि मग तिचा मैदानावरचा परफॉर्मन्सही झपाट्यानं सुधारला.
गेलं, २०१७ हे वर्षं तर तिनं अक्षरश: गाजवलं.
पुण्यात बालेवाडीला झालेल्या अंडर नाइनटीन स्कूल नॅशनलमध्ये तिनं थेट दोन गोल्ड मेडल्सना गवसणी घातली.
हैदराबादला झालेल्या युथ नॅशनलमध्ये सिल्व्हर मेडल पटकावलं.
गेल्याच वर्षी बॅँकॉक येथे झालेल्या युथ एशियन चॅम्पियनशिपसाठीही तिचं सिलेक्शन झालं आणि त्यात चौथ्या क्रमांकापर्यंत तिनं झेप घेतली. तिचं ब्रॉँझ मेडल थोडक्यात हुकलं.
यंदा दोन महिन्यांपूर्वीच गोव्यात झालेल्या नॅशनल क्रॉस कंट्री स्पर्धेतही तिनं गोल्डवर आपलाच हक्क सांगितला.
मैदानावरच्या अफलातून कामगिरीमुळे चीनमध्ये होणाºया एशियन क्रॉस कंट्री स्पर्धेसाठीही तिचं सिलेक्शन झालंय. त्यासाठी ती रवाना होतेय..
याच आठवड्यात १५ मार्चला चीनमध्ये ही स्पर्धा आहे..
पूनम सांगते, मी जेव्हा नाशिकला आले, त्यावेळी नॅशनलपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे, एवढंच मिनिमम ध्येय मी समोर ठेवलं होतं. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आपण कधी खेळू असा विचारही माझ्या मनात कधी आला नव्हता. त्या तुलनेत चांगला पल्ला मी गाठला आहे; पण मुळातच फार पुढचा विचार मी करत नाही. आज, आत्ता बेस्ट करायचं एवढंच ध्येय मी डोळ्यांसमोर ठेवते. आॅलिम्पिक खेळायला कोणालाही आवडेल; पण आत्ता तरी माझ्या डोळ्यांसमोर आहे ते एशियन क्रॉस कंट्री.. त्यात उत्तम कामगिरी मला करायचीय. पुढंच पुढे पाहू..’
विशेषांक लेखन - समीर मराठे
(लेखक लोकमत वृत्तसमुहात उपवृत्त संपादक marathesam@gmail.com)