धावणारी स्वप्नं : ताई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2018 12:18 PM2018-03-08T12:18:40+5:302018-03-08T14:24:55+5:30
आदिवासी भागातली लाजरीबुजरी मुलगी. तिचे आई-वडील मजुरी करतात. एवढुशी पोर. बुजरीच. पण, सध्या ती आॅलिम्पिक ‘गोल्डमॅन’ उसान बोल्टकडे जमैकात प्रशिक्षण घेतेय...
एकदम साधीसुधी मुलगी. केसांच्या दोन वेण्या.
अंगात युनिफॉर्म. खाली मान घालून बाकावर बसलेली.
आपण जेवढं विचारू तेवढ्यापुरतीच मोजकी उत्तरं ती देत होती.
आवाज अतिशय हळू. बुजरी.
ताई बाह्मणे तिचं नाव. तिला भेटायला तिच्या शाळेत नाशिकच्या भोसला विद्यालयात गेलो. तेव्हा भेटलेली ही मुलगी.
त्यानंतर दोन-तीन दिवसांनीच दिल्लीत ‘खेलो इंडिया’च्या स्पर्धा होत्या.
‘खेलो इंडिया’ हा भारत सरकारचा अत्यंत महत्त्वाकांक्षी उपक्रम. आंतरराष्टÑीय आणि आॅलिम्पिकसारख्या स्पर्धांत भारतीय खेळाडूंनी उत्तम कामगिरी करावी यासाठी देशभरातल्या सर्वोत्तम खेळाडूंची निवड करून त्यांना त्यासाठीचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. २०२० आणि २०२४ च्या आॅलिम्पिकपर्यंत त्यांना दत्तक घेऊन वर्षाला सुमारे पाच लाख रुपयांची शिष्यवृत्तीही दिली जाणार आहे.
त्यासाठीच्या प्राथमिक निवडीनंतर अंतिम सिलेक्शनसाठी ताई दिल्लीला आलेली होती. देशातल्या सर्वोत्तम अॅथलिटमधून निवड होणार होती.
या मॅचेस टीव्हीवरही दाखविल्या जाणार असल्यानं मी सकाळी टीव्हीसमोर जाऊन बसलो; पण परवा मला भेटलेली लाजरीबुजरी ताई आणि इथे मैदानावरची ताई यांच्यात जमीन-अस्मानाचा फरक होता! ताई मैदानात इतकी कॉन्फिडण्टली वावरत होती, तिच्या पायातल्या वेगावरचा विश्वास तिच्या नजरेत दिसत होता. हीच का ती ताई, असाच प्रश्न मला पडला!
अर्थातच सगळ्या स्पर्धकांना मागे सारत ताईनं दोन्हीही स्पर्धांत पहिला नंबर पटकावला!
‘आॅलिम्पिक दर्जाचे खेळाडू घडवण्यासाठी केंद्र सरकारनं जसा ‘खेलो इंडिया’ उपक्रम सुरू केला आहे, तसाच उपक्रम ‘गेल इंडिया’ कंपनीनंही सुरू केला आहे. ‘गेल इंडियन स्पोर्ट्स स्टार’ आणि ‘नॅशनल युवा को-आॅपरेटिव्ह सोसायटी’ (एनवायसीएफ) यांच्यातर्फे देशपातळीवरील ११ ते १७ वयोगटातील उदयोन्मुख खेळाडूंना हुडकून त्यांना प्रशिक्षण दिलं जात आहे. त्यासाठी झालेल्या ‘एनवायसीएस गेल रफ्तार’ टॅलेन्ट सर्च स्पर्धेतही ताई अव्वल ठरली आणि आता तिला थेट ‘आॅलिम्पिक गोल्डमॅन’ उसान बोल्टकडे प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आलं आहे. उसान बोल्टनं जमैकात नुकत्याच स्थापन केलेल्या ‘रेसर्स ट्रॅक क्लब’मध्ये एक महिन्याचं प्रशिक्षण तिला मिळणार आहे.
अनवणी पावलांनी डोंगर-दºयात धावणारी, एका लहानशा आदिवासी गावातली ताई थेट जमैकात कशी गेली याची कहाणीही विलक्षण चित्तथरारक आहे.
आठवीत शिकणारी ताई आत्ताशी १५ वर्षांची आहे.
नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हजार, पंधराशे लोकवस्तीचं दलपतपूर हे ताईचं गाव. पत्र्याच्या शेडचं, दोन अंधाºया खोल्यांचं छोटंसं तिचं घर. घरात आजही जवळपास नऊ-दहा जण राहतात. पाच भावंडं, आई, वडील, दोन्ही आज्या..
ताईचे आई-वडील; दोघं आजही मोलमजुरी करतात. दुसºयांच्या शेतावर जाऊन काम करतात. दिवसाला दीड-दोनशे रुपये मिळतात. त्यावर त्यांच्या कुटुंबाचा चरितार्थ चालतो. गावात काम मिळेनासं झाल्यावर बºयाचदा ते नाशिकलाही कामासाठी येतात. द्राक्षबागेत, कुठं कुठं काम करतात.
ताईला विचारलं, ‘धावण्याच्या शर्यतींकडे तू कशी काय वळालीस?’
त्याचा रंजक किस्साच ताई सांगते..
ताईची मोठी बहीण गावाजवळच्याच ठाणापाडा आश्रमशाळेत शिकायची. ‘सावरपाडा एक्स्प्रेस’ कविता राऊतही याच शाळेत शिकलेली. बहीण घरी आल्यावर सांगायची, कविता राऊत काय जबरी पळते.. एकदम मोटारगाडीसारखी!’
ताईलाही वाटायला लागलं, आपणही मोटारगाडीसारखं पळावं!
पळायचं बीज तिच्यात पहिल्यांदा रोवलं गेलं ते तिथेच.
शाळेत पहिलीपासून ती पळायची. अर्थातच त्यांच्या ‘स्पोर्ट्स डे’ला! पहिला नंबर तिनं कधीच सोडला नाही. ताई सांगते, ‘त्यावेळी मी दुसरीत होते. शिक्षकांनी पहिली ते सातवीच्या साºया मुला-मुलींना गोळा केलं आणि एकत्रच पळायला लावलं. त्यावेळीही मी सगळ्यांना बºयाच अंतरानं हरवलं आणि पहिली आले!’
त्यानंतर जिल्हा परिषदेचे क्रीडाशिक्षक भगवान हिरकूड यांनी ताईला सांगितलं, रोज पळायला येत जा. प्रॅक्टिस कर. ताई हिरकूड सरांच्या मार्गदर्शनाखाली पळायला लागली. तिला झोपेतून उठवण्यासाठी हिरकूड सर भल्या पहाटे साडेचार-पाच वाजता तिला मिस्ड कॉल द्यायचे. त्या अंधारातही काही मिनिटांतच ती सरावासाठी हजर असायची!
तिसरीत असताना ताईनं कविताला पहिल्यांदा प्रत्यक्ष पाहिलं आणि मग तिचा हुरूप आणखीच वाढला.
तिसरीतच राज्य स्तरावरचं पहिलं मेडल तिनं पटकावलं.
नाशिकच्या ‘एकलव्य अॅथलेटिक्स अॅण्ड स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटतर्फे दरवर्षी खेडोपाडी ‘कविता राऊत टॅलेन्ट सर्च’ उपक्रम राबवला जातो. त्यातूनच ताईचं सिलेक्शन झालं आणि पाचवीत ती नाशिकला आली. भोसला विद्यालयात शिक्षण घेऊ लागली. तिथेच होस्टेलमध्ये राहण्याची सोय झाली आणि विजेंद्र सिंग यांंच्यासारखे कोचही मिळाले. वनवासी कल्याण आश्रमाचीही तिला खूपच मदत झाली. गावपाड्यांतल्या मुलांना देशपातळीवर आणण्यासाठी त्यांच्यातर्फे दरवर्षी ‘राष्टÑीय खेल कूद स्पर्धा’ घेतली जाते. आजवर अनेक आदिवासी, ग्रामीण भागातल्या मुलांना त्याचा फायदा झाला आहे.
नाशिकला आल्यानंतर मग ताईनं मागे वळून पाहिलंच नाही. राज्य आणि राष्टÑीय स्पर्धांत पदकांचा धडाकाच लावला. अंडर फोरटीन नॅशनल कॉम्पिटिशनमध्ये दोन गोल्ड, ६०० मीटरमध्ये नवं नॅशनल रेकॉर्ड! हे रेकॉर्ड आधी नाशिकच्याच अंजना ठमकेच्या नावावर होतं. गेल्या वर्षी झालेल्या अंडर सेव्हनटीन नॅशनल स्पर्धेतही दोन गोल्ड आणि पुन्हा नवं नॅशनल रेकॉर्ड! या दोन्ही वर्षी ‘बेस्ट अॅथलिट आॅफ इंडिया’ म्हणून तिला गौरवलं गेलं!
ज्युनिअर नॅशनल अंडर सिक्सटीनमध्ये सलग दोन वर्षे गोल्ड, यंदा जानेवारीत झालेल्या अंडर सिक्सटीन नॅशनल क्रॉस कंट्री चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड!...
गेल्या वर्षी २०१७ मध्ये फ्रान्सला झालेल्या वर्ल्ड स्कूल चॅम्पियनशिपसाठीही तिचं सिलेक्शन झालं. फ्रान्समधल्या या स्पर्धेत मात्र तिचा अनुभव कमी पडला.
ताई सांगते, ‘या स्पर्धेपूर्वी रोहतक इथल्या नॅशनल कॅम्पमध्ये मी सहभागी होते. कॅम्पमधल्या सर्व रूम एसी होत्या. एसीमध्ये असताना तहान लागत नाही, त्यामुळे मी फारच कमी पाणी पित होते; पण बाहेर मात्र ४८ अंश सेल्सिअसचं उकळतं ऊन. त्या उन्हात प्रॅक्टिस केल्यामुळे पायांत क्रॅम्प्स आले. तिथून लगेचच मी फ्रान्सला रवाना झाले. तिथेही दिवसभरात साधी पाण्याची एक बाटलीही मी संपवली नाही. त्यामुळे या स्पर्धेतही क्रॅम्प्स आले आणि अपेक्षित कामगिरी मला करता आली नाही; पण मी शिकते आहे. हा माझ्यासाठी मोठाच अनुभव होता..’
साºया अडचणींवर मात करून ताई पुढे जाते आहे. राष्टÑीय, आंतरराष्टÑीय पातळीवर नाव गाजवते आहे. म्हटलं तर ही शाळकरी चिमुरडी स्वत:चं घरही चालवते आहे.
विविध स्पर्धांतून मिळवलेल्या बक्षिसांची रक्कम ती घरी पाठवते. नुकत्याच झालेल्या काही स्पर्धांमधून जवळपास वीस हजार रुपये तिला बक्षीस मिळाले. त्यातले जरुरीपुरते तिनं स्वत:साठी ठेवले आणि बाकीचे घरी पाठवले!
अतिशय साधीभोळी बुजरी ताई मैदानावर मात्र अतिशय आक्रमक असते. तिचे कोच विजेंद्र सिंगही सांगतात, ‘ये लडकी दिखती भोेलीभाली है, सब खिलाडीओंमें छोटी है, लेकिन सबसे लडाकू!’
ताई परवाच जमैकाहून भारतात परतली; पण दिल्लीहून ती थेट गेली ते पतियाळाला. आज, आत्ता तिथे कॉमनवेल्थ गेम्ससाठीचं सिलेक्शन सुरू आहे.
आपली कारकीर्द घडवण्यासाठी या ‘लडाकू’ताईकडे अजून खूप वर्षे आहेत. आपल्यासाठी आॅलिम्पिकचे दरवाजे ती नक्कीच उघडेल, अशी तिच्या कोचसहित साºयांचीच खात्री आहे..!
विशेषांक लेखन - समीर मराठे
(लेखक लोकमत वृत्तसमुहात उपवृत्त संपादक marathesam@gmail.com)