पळा पळा..
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2017 06:16 PM2017-07-28T18:16:10+5:302017-07-28T18:37:05+5:30
एकदा का अशी पळायला सुरु वात केली की थांबावंसंच वाटत नाही! ही या बागेची जादू आहे की पळण्यातली?
- प्रसाद सांडभोर
एकदा का अशी पळायला सुरुवात केली की थांबावंसंच वाटत नाही!
ही या बागेची जादू आहे की पळण्यातली?
गेटमधून आत आल्यावर वॉर्म अप म्हणून हळूहळू, एक एक पाय उचलून टाकत ब्रिस्क वॉक सुरू करायचं.
या अशोकाच्या झाडापर्यंत पोहोचेपर्यंत वेग पकडायचा.
डावा पाय मग उजवा पाय - पुन्हा डावा मग उजवा. पायांना सुसंगत अशी आपोआप होणारी हातांची हालचाल.
या दोन सुरु च्या झाडांमधून पुढे गेलं की या चार पायºया. डावीकडे हिरवळ आणि फुलांची बाग. पायºयांचा उतार मिळून हात-पाय अशी मस्त लय पकडतात ना की बस्स! थांबायलाच नको!
अजून जोरात! अजून जोरात! - मन म्हणतं.
हृदयाची धडधड वाढत जाते.
अगदी हाता-पायात-कानांत ऐकू येऊ लागते.
स्पीड लिमिट क्र ॉस्ड! आता यापुढे वेग वाढवता येणार नाही.
अशा वेळी वाटतं, ‘यार कुठेतरी बाटलीत वगैरे काढून ठेवूयात का या हृदयबुवांना आत्तापुरतं? मन भरून पळून झालं की पुन्हा आत टाकू!’ पण ते जमत नाही.
ही बाग अगदीच घराजवळ असल्यानं कधी कोणती काळ-वेळ बघावी लागत नाही इथे यायला. रनिंग शॉर्ट्स आणि शूज घातले की झालं! कधी अगदीच रिकामं डोकं घेऊन येतो मी इथे सोबत पळवायला! इथले रंग-ऋतू पाहून आपोआप सुचत जातं काही ना काही. कधी खूप कामं एकाचवेळी करायचं टेन्शन असेल तर बागेतलं पळणं ‘टू डू लिस्ट’ बनवायला मदत करतं. कधी स्वत:चबद्दल, कधी काही स्वप्नांबद्दल खोल-सखोल विचार करायला लावतं. काही नको असलेले - भुणभुणणारे विचार पळता पळता सहज विरघळतात. घामावाटे झिरपून शरीरातून निघून जातात. अगदीच हलकं हलकं वाटतं मग. अजून जोरात पळता येतं. अजून जोरात!
मन मग मेंदूला खुराक पुरवू लागतं. कशापासून दूर पळतोयस? कशाच्या दिशेने पळतोयस? की काही नेमकं ठरवलेलं असं नाहीयेस अजून?
नुसतंच पळतोयस?
नुसतेच प्रश्न.
पुन्हा आलं अशोकाचं झाड.
म्हणजे अजून एक राउंड पूर्ण.
प्रत्येक राउंड म्हणजे एक आवर्तन.
एक परिवर्तन
आज किती बरं राउंड्स करावेत?