रुपा आणि रितू
By admin | Published: December 3, 2015 10:31 PM2015-12-03T22:31:42+5:302015-12-03T22:31:42+5:30
एकतर्फी प्रेम, खानदानी दुश्मनी याचा वचपा काढायचा म्हणून मुलींच्या चेहऱ्यावरच तेजाब फेकणाऱ्यांना
Next
एकतर्फी प्रेम, खानदानी दुश्मनी
याचा वचपा काढायचा
म्हणून मुलींच्या चेहऱ्यावरच
तेजाब फेकणाऱ्यांना
सणसणीत उत्तर देणाऱ्या बहाद्दर मुली,
त्या म्हणतात,
‘असला नसला चेहरा लपवून
फिरण्याची आम्हाला गरज नाही!’
चेहऱ्यावर साध्या पुटकुळ्या आल्या तरी मुलींना घोर टेन्शन येतं.
जरा रंग काळवंडला, जरा पिंपल्स वाढले की अनेकजणी कासावीस होतात.
आपला रंग काळा-सावळाच आहे, म्हणून कुढणाऱ्या तर कितीतरी जणी!
त्या साऱ्यांनी एकदा ‘या’ दोघींना भेटावंच!
खरं तर त्यांना आणि त्यांच्यासारख्या अनेकींनाही..
खानदानी दुश्मनी, एकतर्फी प्रेम याचा सूड उगवायचा म्हणून
पाशवी वृत्तीची काही माणसं सरळ या मुलींच्या अंगावर अॅसिड फेकतात..
आणि चेहऱ्यासह सारं जळून खाक होतं त्या हल्ल्यात!
एरवी फरशी पुसताना जरा जमिनीवर पडलं हे अॅसिड तर फसफसतं,
ती फसफस पाहवत नाही की तो उग्र वास नाकाला सहन होत नाही..
तेच अॅसिड चेहऱ्यावर पडलं तर हाडाला चिकटलेली त्वचाही जळून कोळसा होते..
इतक्या वेदना, इतका ठणका आणि इतकी आग घेऊन जेव्हा जगणं वाट्याला येतं,
तेव्हा खरंतर किती विखार भरायला हवा आयुष्यात!
पण जे घडलं ते मागे टाकून आणि विरूप झालेला चेहरा स्वीकारून,
ताठ मानेनं आणि त्याच चेहऱ्यानं काही मुली समाजाला सामोऱ्या जातात.
आमच्यावर कुणी अॅसिड फेकलं हा आमचा दोष नाही,
मग आम्ही का तोंड लपवायचं असा सवाल त्यांची कृती करतेच,
पण त्याचसोबत स्वत:ला स्वाभिमानानं उभं करत या मुली
अॅसिड हल्ल्यांविरोधातही काम करतात.
खुल्या बाजारात अॅसिड विक्रीवर बंदी यावी म्हणून लढे उभारतात..
आणि त्यांना मदत करते, स्टॉप अॅसिड अॅटक म्हणजेच ‘सा’ नावाची एक संस्था.
त्या संस्थेशी संबंधित या दोन मुली.
रूपा आणि रितू.
अलीकडेच पुण्यात झालेल्या ‘लोकमत विमेन समिट’ला आल्या होत्या.
त्यांच्याशी तिथं सविस्तर बोलणं झालं तेव्हा उलगडलं अॅसिड अॅटॅक होऊनही
फायटर ठरलेल्या या मुलींचं वेगळं आणि लढाऊ जगणं!
अॅसिड हल्ला झालेल्या या मुली अनेकदा स्वत:ला अंधार कोठडीत डांबून घेतात.
स्वत:चा चेहराच गमावल्याने त्यांना
समाजापुढे येण्याचं धारिष्ट्यच उरलेलं नसतं.
एकलकोंड्या, घुम्या होत स्वत:पासूनही दूर होतात.
अनेकींना तर घरचेही नाकारतात.
अनेक जणी जगण्याची आसच सोडून आला दिवस ढकलत राहण्याचा प्रयत्न करू लागतात. ‘सा’ नावाचे हे कॅम्पेन या मुलींना नव्यानं जगण्याची ऊर्मी आणि जिद्द देण्याचा प्रयत्न करते.
त्यातल्याच या दोघी.
आपल्यावर अॅसिड हल्ला कसा झाला हे तर त्या सांगतातच,
पण त्या वेदनांना कवटाळत न बसता,
अशा प्रश्नांवर समाजानं उपाय कसे शोधायचे याविषयीही बोलतात.
स्वत:च्या चेहऱ्यावर प्लॅस्टिक सर्जरीसाठी नऊ शस्त्रक्रिया होऊनही
नव्या उभारीनं जगाला सामोरं जातात.
आणि ज्यानं आपल्यावर अॅसिड फेकलं, त्याच्यासमोर कोर्टात उभं राहून,
आपल्यावर झालेल्या अन्यायाची दादही मागतात.
हे सारं सोपं नाही.
जगाच्या नजरा काही केल्या पाठ सोडत नाहीत,
आणि त्या काही नजरांमधली हेटाळणीही दिसल्याशिवाय राहत नाही.
मात्र त्या साऱ्या नजरांना न मोजता,
स्वत:चं जगणं बेधडक जगणाऱ्या आणि
चेहऱ्यावाचून काही अडत नाही म्हणत नवं आयुष्य सुरू करणाऱ्या,
रूपा आणि रितूची ही भेट जगण्याचा एक जिद्दी चेहरा जरूर दाखवेल!
- रितू
आपल्याच माणसांनी
राख केलं सारं!
दोन वर्षांची होते तेव्हा माझी आई वारली. वडिलांनी दुसरे लग्न केले. सावत्र आई घरात आली. तिला माझ्याविषयी काय इतकी घृृणा होती ठाऊक नाही पण तिनं अनेकदा मला मारण्याचा प्रयत्न केला होता. हे सारं नको म्हणून आजी-आजोबांनी मला त्यांच्यासोबतच ठेवलं. ते काकांच्या घरी मुज्जफराबादला राहत. आजी-आजोबांच्या निधनानंतर मात्र सावत्र आईनं मला गोड बोलून पुन्हा गावी आणले. काही दिवसातच माझ्या आजी-आजोबांनी माझ्या लग्नासाठी ठेवलेले पैसे आणि दागिनेही माझ्या काकांकडून भांडून आणले. त्या काळात वडीलही दिल्ली येथे कामाला जात. आणि मी घरकामात राबत असे. दरम्यान, आईचे गावातील एका व्यक्तीबरोबर अफेअर सुरू झाले होते. मला त्याची माहिती झाल्याने ती माझ्यावर पाळत ठेवू लागली होती. मला कोणाशीही बोलू देत नव्हती. मी घुमी झाले होते.
२ आॅगस्ट २००८ या तारखेला आईने मला रात्री एकटीलाच आतल्या खोलीत झोपवले. काही झालंच तर पळून कसं जाणार या भीतीने मी खोलीतून बाहेर येऊन सगळ्यात बाहेर उघड्या अंगणात झोपले. रात्री अडीचच्या सुमारास तोंडावर काहीतरी पडल्याचं जाणवलं. उठून सैरभैर पळायला लागले. तोंडावरून हात फिरवला तर हातात चेहऱ्याची त्वचेसारखं काहीतरी जळायला लागलं. मी ओरडू लागले. सगळं गावं जमा झालं. मी पाणी द्या म्हणून ओरडत राहिले. पण कुणी पाणीही दिलं नाही. मी तशीच तडफडत राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता काका आले. त्यांनी नजीकच्या दवाखान्यात नेलं. त्यावेळेस डॉक्टरांनी माझा चेहरा धुवून काढला. खांद्यावर कपडे चिकटले होते. त्यानंतर पुन्हा दिल्लीला नेण्यात आले. प्रत्यक्ष उपचाराला सुरुवात करेपर्यंत ५ वाजून गेले होते.
मी जिथे झोपले होते, तिथली जमीनही अॅसिडने जळाली होती म्हणजे ते किती ज्वलंत असेल. दीड वर्ष मला स्वत:चा चेहरा पाहण्याची हिंमत झाली नव्हती. मी स्वत:चा चेहरा पाहिला तर स्वत:चीच भीती वाटली. त्यानंतर कधी आईला पाहिलेही नाही. वडील यायचे भेटायला पण बोलावेसे वाटले नाही. त्यांना पाहून अधिक चिडायला होते. आता त्यांच्यापासून स्वत:ला पूर्णपणे तोडले आहे. शिरोज हॅँगआउटमध्ये ड्रेस डिझाइन करून मी बुटीक सांभाळते आहे.
- रूपा
शिरोज हॅँगआउट
शिरोज हॅँगआउट हे अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या तरुणींनीच स्वत: उभे राहण्यासाठी केलेला लढा आहे. शिरोज हॅँगआउट हे एक कॅफे आहे. आग्रा येथील हे कॅफे अॅसिड हल्ल्यातील तरुणी चालवत आहेत. या कॅफेतील प्रत्येक जण स्वत:ला ‘फायटर’ म्हणून संबोधून घेणे पसंत करते. आपल्या चेहऱ्यावरचं स्वत:सोबत घेऊन पुढची वाटचाल करते. शिरोज हॅँगआउट हे २०१३ मध्ये स्टॉप अॅसिड अॅटॅक या कॅम्पेनने सुरू केले. या कॅफेमध्ये चहा-कॉफीचे कोणतेही पैसे आकारत नाहीत. भेट देणाऱ्यास जे द्यावेसे वाटेल त्यांनी द्यावे. यामागे त्यांचा मुख्य हेतू, समाजाने अॅसिड हल्लाग्रस्तांशी नाते जोडावे, त्यांच्याशी बोलावे आणि अशा प्रकारच्या घृणास्पद कृतींना समजून घ्यावे, अशी अपेक्षा असते. याशिवाय येथे ग्रंथालय आहे. पुस्तके वाचण्यासाठी घेतली जाऊ शकतात. मुलींना संगणक, मोबाइलचे प्रशिक्षण दिले जाते. त्याच्या जोडीला कायदे जागृतीही केली जाते. तसेच तेथे शिरोजमध्ये तरुणी हस्तकलेचा वापर क रून वस्तू बनवितात त्यांचे प्रदर्शन व विक्रीही या कॅफेत होते.
कितीही आवडत नाही आपलं रंगरूप असं वरवर म्हटलं तरी आपल्याला आपल्या चेहऱ्याविषयी प्रेम वाटतंच! पण एखाद्या दिवशी आपल्याला आपलाच चेहरा पाहण्याची भीती वाटली तर? आपल्याला काही रूपच उरले नाही किंबहुना चेहराच उरला नाही, त्याला काही आकारउकार उरला नाही, तर पाहू शकू स्वत:ला आपण आरशात?
पण त्या दोघींच्या वाट्याला असं भेसूर वास्तव एक दिवस खरंच आलं. नुकतीच कुठं १५-१७ च्या अल्लड वयाने हाक मारायला सुरुवात केलेली, खरंतर आपल्या रंगरूपाची फिक्र करण्याचंच ते वय. पण त्यांच्या बाबतीत काहीतरी निराळंच घडलं. स्वत:ला आरशातच पाहू नये असं कित्येक महिने वाटत राहिलं. आरशाचीच काय स्वत:चीच भीती बसली मनात. तारुण्यात येऊ घातलेल्या वयात आपलं सौंदर्य ओरबाडून गेल्याचा धसका किती मोठा असेल, कल्पना करा! एकीने तब्बल दीड वर्ष आरशासमोर उभे राहण्याची हिंमत केली नाही, तर एकीला आरसा पाहताच वाटलं ‘यापेक्षा मी मेले असते तर अधिक बरं नसतं का झालं?’
घरचे वाद आणि बदल्याची आग अॅसिड बनून त्यांच्या चेहऱ्यावर पडली आणि अवघ्या पंधराव्या वर्षी रूपाचं अन् सतराव्या वर्षी रितूचं जग पार पालटून गेलं.
अलीकडेच ‘लोकमत’च्या वतीने आयोजित ‘वूमन समिट’मध्ये सहभागासाठी या दोघी आल्या आणि त्यांच्याशी गप्पा मारताना एक वेगळीच गोष्ट उकलत गेली. रूपा आता २२ वर्षांची आहे, तर रितू विशीची! या दोन्ही मुली अतिशय कॉन्फिडण्ट, बोलक्या आणि आपल्या चेहऱ्याच्या विस्कटलेल्या घडीची जराही तमा न बाळगणाऱ्या, आपण जे आहोत, जसे आहोत तसंच स्वत:ला स्वीकारून बेधडक वागणाऱ्या!
त्यांना भेटल्यापासून जाणवत होतं की, रितू बोलक्या स्वभावाची, तर रूपा अगदीच मितभाषी. ‘स्टॉप अॅसिड अॅटॅक’ या कॅम्पेनने या दोघींना आणि यांच्यासारख्या अनेक तरुणींना उभारी दिली. ही कॅम्पेन अॅसिड हल्ल्याच्या विरोधात तर उभी राहिलीच, पण त्याहून अधिक अॅसिड अॅटॅकग्रस्त मुलींना समाजात ताठ मानेने उभं राहता यावं म्हणून मदतीलाही सरसावली!
गेल्या काही वर्षांच्या आपल्या भेदक प्रवासाविषयी सांगताना रूपा म्हणाली, ‘अॅसिड अॅटॅक कॅम्पेनशी संबंध नव्हता तेव्हा मी घराबाहेरही पडायचे नाही आणि आज पाहा, मी माझं राज्य सोडून दुसऱ्या राज्यात आलेय. एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बसलेय. पण आधी मी मुळातच बुजरी होते अन् हल्ल्यानंतर तर पारच कोलमडले. कशीबशी हॉस्पिटलच्या ट्रिटमेंटसाठी बाहेर पडायचे. घरातही फारसे कोणाशी बोलायचे नाही. स्वत:चाच चेहरा आरशात पाहण्यासाठी मला दीड वर्ष लागलं. पण पहिल्यांदा आरशासमोर उभी राहिले तेव्हा पायाखालची जमीन सरकली. घराबाहेर पडले तरी तोंडाला ओढणी लपेटून, सगळं शरीर झाकून बाहेर पडायचे. आपला चेहरा इतरांना दाखवायची लाज-भीती वाटायची. पण नंतर लक्षात आलं की आपण असा काय गुन्हा केलाय की आपल्यावर तोंड लपवायची पाळी आली? मग सारं बळ एकवटलं आणि झुगारून टाकली तोंडावरची ओढणी.’
ती जे म्हणत होती ते दिसत होतं. खरंच त्या दोघींना आता त्यांच्या विद्रूप झालेल्या चेहऱ्याची लाज वाटत नव्हती. पंचतारांकित चकाचक वातावरणातही त्या अत्यंत आत्मविश्वासानं वावरत होत्या. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून लोकांच्या नजरेत होणारे बदल त्यांनाही दिसतात. पण त्या नजरांना आता त्या मोजत नाहीत.
रितू जेव्हा सांगते की, मला माझा चेहरा खूप आवडतो तेव्हा कौतुकच वाटतं तिनं नव्यानं कमावलेल्या आत्मविश्वासाचं! खरंतर अॅसिड हल्ल्यात तिचा डावा डोळा पूर्णपणे गेला. त्या खोबणीत उजव्या डोळ्यापेक्षा थोडा मोठा निळ्या रंगाचा खोटा डोळा बसवण्यात आला. त्या डोळ्यातील शून्यता आपल्यालाच जाणवत राहते. आणि त्याचं शल्य रितूही सांगते. ती व्हॉलिबॉल खेळायची. पण डोळाच गेल्यानं तिला हा खेळ खेळताच येत नसल्याची खंत तिने बोलून दाखवली. त्या अॅसिडनं डोळा जळून खाक झाला पण तिच्यातलं ‘स्पोटर््समन स्पिरीट’ मात्र त्या आगीत राख झालं नाही. उलट ते वाढलं. आणि म्हणून ती मोठ्या विश्वासानं चटकन म्हणून गेली, ‘व्हॉलिबॉल नाही तर नाही, दुसरा एखादा खेळ खेळण्याचा प्रयत्न मी करणार आहेच. एक ट्राय तो बनता है!’
अशा उत्साहानं बोलणाऱ्या, धडाडीच्या या मुली. त्या बोलायला लागल्या की त्यांच्या चेहऱ्याकडे नजरही जात नाही. पण म्हणून त्यांचं वास्तव बदलत नाही. त्या वारंवार सांगत होत्या, आमच्यावर जेव्हा अॅसिड हल्ला झाला तेव्हा कोणीच मदतीला आलं नाही. लोकांनी बघ्याची भूमिका घेतली. रितूवर भर रस्त्यात हल्ला झाला. तासाभराने तिच्या भावाला माहिती मिळाली नी ती दवाखान्यात दाखल झाली. रूपावर रात्री अडीच वाजता हल्ला झाला, पण तिला दुसऱ्या दिवशी साडेपाच वाजता उपचारासाठी दाखल करण्यात आलं. अशा बघ्या वृत्तीची त्यांना आज मनस्वी चीड वाटते. त्या सांगतात, ‘आम्ही आमचे चेहरे उघडे घेऊन यासाठीच फिरतो की अशा राक्षसी वृत्तीचा परिणाम लोकांना दिसावा. भर रस्त्यात कुणावरही असे हल्ले या देशात होऊच नये, पण झाला तर निदान त्या मुलींना मदत तरी करा तातडीनं!’
या मुली हे सारं असं कळवळून सांगत असतात तेव्हा आपल्याही मनात प्रश्न येतोच की, यांच्यावर अॅसिड हल्ला का झाला असेल? कोणी केला असेल? पण हे सारं विचारणं म्हणजे त्यांच्या वेदनांचा पट पुन्हा समोर ठेवायला लावणं, तितकंच क्रूर! विषय मात्र निघालाच तसं कमी बोलणारी रूपाच म्हणाली, ‘दिवसातून शंभरदा जरी तुम्ही आम्हाला विचारलं ना तरी आता आम्ही सांगू. पूर्वी हा विषय निघाला तरी रडायला यायचं, तोंडातून शब्द फुटायचा नाही. पण मग लक्षात आलं की, आपल्यावर जे बितलं ते इतरांना सांगून अशा घटना रोखता येऊ शकतात. लोकांना समजू शकते अशा पाशवी वृत्तीतून मुलींच्या वाट्याला येणारी वेदना. म्हणून आम्ही सांगतो सगळं.’ रूपाच्या या म्हणण्याला दुजोरा देत रितू म्हणाली, ‘हल्ल्यानंतर तीन महिन्यांनी मी स्वत:चा चेहरा पाहिला तेव्हा वाटलं, या अशा चेहऱ्यापेक्षा मेले असते तर बरं झालं असतं. पण आज वाटतं, या नव्या जन्मात मी कोणा एकाचं जरी भलं करू शकले तरी भरून पावले. त्यामुळे जे घडलं ते सांगताना आताशा वेदना होत नाहीत. उलट अॅसिड अॅटॅक होऊ नयेत म्हणून जनजागृतीच होईल! म्हणून आम्ही सर्वत्र जातो, बोलतो!’
त्या बोलतात तेव्हा त्यांच्या हिमतीची दाद द्यावीशी वाटते. मात्र अजून त्यांच्या वेदना संपलेल्या नाहीत. या दोघींवर आत्तापर्यंत ८-९ आॅपरेशन्स झालेली आहेत. पूर्वीपेक्षा आता बराच चेहरा बदलला आहे. प्लॅस्टिक सर्जरी करण्याविषयी सल्ला दिला जातो, पण ते एकाच वेळी होत नाही. त्यामुळे अनेकवेळा शस्त्रक्रिया होतात. मात्र प्रत्येक सर्जरी हल्ल्याच्या तीव्र वेदनांची आठवण करून देतेच, असं रूपानं सांगितलं.
अजून एक गोष्ट त्यांना छळते, बोचते ती म्हणजे लोक त्यांना पीडित/बळी म्हणतात. रितू सांगते, ‘आम्हाला कोणी पीडित, बळी अगदी ‘सर्व्हायव्हर’ म्हटले तरी भयंकर राग येतो. चीड येते. पीडित काय म्हणता? आम्ही आमच्यावरच्या हल्ल्याविरुद्ध शारीरिक, मानसिक लढा देत आहोत. संघर्ष करत आहोत. ताठ मानेनं उभ्या आहोत. आम्ही फायटरच आहोत. अन् लोकांनीही तसंच आमच्याकडे पाहावं असं आम्हाला वाटतं. उगीच दयाही नको आणि आमची कीवही कुणी करू नये असं वाटतं. त्यापेक्षा साथ द्या. आपल्या अवतीभोवती असे प्रकार होणार नाहीत याची काळजी घ्या. हे असे अॅसिडचे हल्ले मुलींना काय वेदना देतात हे कायम लक्षात ठेवा!’
या मुली हे सारं सांगतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर मात्र वेदना दिसते..
समाजाच्या अतिरेकानं दिलेली वेदना.