सांगोला ते सांगोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 01:20 PM2017-08-10T13:20:06+5:302017-08-10T13:21:02+5:30
दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो, त्या सांगोल्यातील एका छोट्याशा तिप्पेहाळी गावातून प्रवास सुरू झाला. किती शाळा बदलल्या. शिक्षणासाठी गावं बदलली आणि इंजिनिअर झालोच. त्या प्रवासात काय शिकलो काय सांगू..
- अजय अर्जुन नरळे
महाराष्ट्रातील दुष्काळी तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगोल्यातील एका छोट्याशा तिप्पेहाळी नावाच्या गावात माझं बालपण गेलं. शेतकरी कुटुंब. माझे वडील, चुलते दोघेही शेतीच करायचे. हा भाग कायम दुष्काळी पट्ट्यात येणारा. गावातील बहुतेक शेतकरी गरीबच. गावातील सांगोलकर वस्ती येथील प्राथमिक शाळेत माझ्या शिक्षणाचा श्रीगणेशा झाला. आत्ता लहान मुलांना पालक शाळेत सोडायला जातात अशी पद्धत त्यावेळी नव्हती. गाव असे की गावात बसही येत नाही. चौथीपर्यंत ही शाळा. मग पुढे पाचवीसाठी जुनोनी नावाच्या जवळच्या गावात जायला लागलो. घरापासून शाळेचे अंतर पाच किलोमीटर. दररोज सकाळी अनवाणी चालत जावं लागायचं आणि दुपारी उन्हातच परत घराकडे परतायचो. सातवीत गेल्यावर आम्हाला सायकल मिळाली. आठवीला मी घोरपडी नावाच्या गावी शिवाजीराव शेंडगे बापू विद्यालयात गेलो.
आमचं एकत्र कुटुंब. मी आणि चुलत भाऊ एकाच वर्गात. लहान भाऊ आणि लहान चुलत बहीण हे एकाच वर्गात. एकदा घेतलेल्या पुस्तकात सर्वांचं शिक्षण व्हायचं. दहावीत ८० टक्के गुण मिळाले. पुढे रयत शिक्षण संस्थेच्या सातारा जिल्ह्यातील देवापूर येथील ‘कमवा आणि शिका’ पद्धतीवर चालणाºया शाळेत जायचं ठरलं. त्यानुसार मी त्या महाविद्यालयात अर्ज केला. त्याचबरोबर जत, जि. सांगली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहातही अर्ज केला. माझ्या बरोबर माझा लहानपणीचा मित्र विष्णू सांगोलकर याला जत येथील वसतिगृहात प्रवेश मिळाला. त्या वसतिगृहात राहणं, जेवण, पुस्तके-वह्या मोफत मिळतं. पण जेवण मात्र असं असायचं की आमच्या आयुष्यात त्याची चव आम्ही कधीच विसरू शकणार नाही. वसतिगृहातील राहणीमान आणि जेवणाची परिस्थिती खूप काही चांगली नव्हती. पण माझ्या आयुष्याला खरं वळण मिळालं ते याच वसतिगृहात राहिल्यानं. माझ्याबरोबर असलेला या वसतिगृहात राहणारा एकही विद्यार्थी आज बेरोजगार नाही.
घरची परिस्थिती हलाखीची असूनही घरच्यांनी शिक्षणासाठी कधीच काही कमी पडू दिलं नाही. माझे वडील आणि लहान चुलते यांनी कर्ज काढून, रोजगार हमीवर कामं करून, शेतमजुरी करून आमचं शिक्षण पूर्ण केलं. बारावी पूर्ण करून डी.एड. करायचं आणि प्राथमिक शिक्षक व्हायचं असं मी ठरवलं होतं. त्याच्यापेक्षा मोठी स्वप्नं कधी पाहिलीच नव्हती. परंतु बारावीत असताना अनपेक्षितपणे माझ्या घरी एके दिवशी तानाजी टोणे नावाची व्यक्ती आली व त्यांनी मला इंजिनिअर होण्यासाठी प्रोत्साहन दिलं. बारावीनंतर इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्रवेशादरम्यान त्यांनी मला खूप मोठी मदत केली. मला डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे, जि. रायगड येथे यंत्र अभियांत्रिकी शाखेत प्रवेश मिळाला. प्रवेशाची प्रक्रि या पूर्ण होईपर्यंत माझे चुलते शिवाजी नरळे यांनी मला मदत केली. आणि मी उच्च शिक्षण घेण्यासाठी पुन्हा एकदा घरापासून दूर गेलो. पण यावेळी जरा जास्तच दूर म्हणजे जवळ जवळ ३०० ते ३५० किलोमीटर. पुढील चार वर्षांचा काळ तसा मजेत गेला आणि खूप काही शिकायला मिळालं. या चार वर्षांत मी इंजिनिअरिंगबरोबरच वाचन करायला आणि बाहेरच्या जगात कसं राहायचं हेही शिकलो. घरातून बाहेर पडताना वडिलांनी एकच वाक्य सांगितलं होत की, तू स्वत: कुणाच्याही नादी लागायचं नाही, जग खूप विचित्र आहे. नीट राहा. माझ्या अशिक्षित वडिलांनी सांगितलेली गोष्ट मला माझ्या आयुष्यात वारंवार अनुभवायला मिळाली हे खरं.
इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर मी खासगी कंपनीत नोकरी करण्याऐवजी शासकीय सेवेत रुजू व्हायचं ठरवलं. परंतु शासकीय नोकरी मिळेपर्यंत मला काहीतरी काम करून आर्थिक कमाई करणे नितांत आवश्यक होते. म्हणून मी विटा येथील आदर्श इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून नोकरी सुरू केली. परंतु तिथे फक्त पंधरा दिवसच काम करून सातारा येथे एका खासगी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून रुजू झालो. तिथे मी साधारणपणे आठ महिने काम केलं. तो माझा बाहेरच्या जगात काम करण्याचा पहिला अनुभव. शासकीय नोकरीसाठी तयारी मात्र चालूच होती. खासगी नोकरी करताना अभ्यास करायला वेळ मिळत नव्हता. मग नोकरी सोडून पुढील चार महिने मी घरीच अभ्यास करायचं ठरवलं. पुण्यासारख्या ठिकाणी राहणं किंवा क्लासेस लावणं परवडणारं नसल्यानं घरीच राहून दिवसरात्र अभ्यास चालू होता. परंतु चारच महिन्यात आपण काहीतरी कमावल्याशिवाय फक्त अभ्यास करत राहणं शक्य नाही हे लक्षात आलं आणि मी पुन्हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील दुसºया एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून रुजू झालो. जुन्नरला असताना महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडील अहमदनगर जिल्ह्यातील नगरपरिषदाकरिता अभियंतापदाची जाहिरात आली. त्यासाठी माझी निवड झाली. पहिली शासकीय नोकरी मिळाल्यानं मी खूप आनंदाने त्या पदावर रुजू झालो. हा दिवस माझ्या शासकीय सेवेतील पहिलाच दिवस. मी ज्या दिवशी पदाचा कार्यभार घेतला त्याच दिवशी नगरपरिषदेवर मोर्चा आला होता. कामाचं एक वास्तव भान त्या दिवसापासूनच येऊ लागलं. तिथे मी एकूण पंधरा महिने सेवा केली. शासकीय सेवा करताना लोकांच्या अडचणी, त्यांची कामं, शासकीय योजना हे सारं जवळून पाहू लागलो. पंधरा महिन्यांतच माझी माझ्याच जिल्ह्यात सांगोले नगरपरिषद येथे त्याच पदावर नियुक्ती झाली. आता इथं काम करतोय, पुढं जाण्यासाठी मेहनत घेतोय, अभ्यास करतोय. प्रवास सुरूच आहे..
(लेखक सोलापूर जिल्ह्यातील सांगोले नगरपरिषदेत नगरपरिषद अभियंता पदावर कार्यरत आहेत)